Saturday, June 22, 2019

अनाथाचा बंधू विठ्ठल कृपासिंधू ।


अनाथाचा बंधू विठ्ठल कृपासिंधू ।

          आषाढ महिना चालू झाला कि वेध लागतात आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाचे. मग पाय आपोआप वळतात पंढरीच्या वाटेकडे. पांडुरंग किंवा विठ्ठल महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे. गोर-गरिबांचा, संतांचा आवडता देव आहे. पांडुरंग, विठ्ठल, विठू माउली, विठोबा अशा अनेक नावाने हे दैवत पंढरपुरात विसावले व संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान बनले. हे दैवत म्हणजे सात्विकतेचे प्रतीक आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी जायचे म्हणजे मोह, माया, मत्सर, राग, लोभ, वासना अशा दुर्गुणांचा त्याग करावा लागतो. मनात फक्त शुद्ध व निर्मळ भक्तिभाव ठेवावा लागतो. 
            पंढरपूर विठ्ठलाचे वस्तीस्थान. तिथे आहे पांडुरंगाचा निवास. कटीवर कर(हात) ठेवून प्रेमभावेने विठ्ठल आपल्या भक्तांकडे बघत युगानुयुगे विटेवर उभा आहे. त्याचे सावळे, सुंदर, मनोहारी रूप बघितले कि डोळे सुखावतात. धन्य झाल्यासारखे वाटते. गळ्यात तुळशीमाळा आहेत. मस्तकावर मुकुट धारण केला आहे. कानात मकरकुंडले घातली आहेत. पीतांबर नेसला असून भरजरी शेला पांघरला आहे. कपाळावर कस्तुरी मळवट भरला आहे. असे विठ्ठलाचे विलोभनीय, मनोहारी रूप बघितले कि भक्तजन विठ्ठलाच्या प्रेमात पडतात. त्याच्या रूपावर भाळतात. त्याचे रूप डोळ्यात साठवतात. आपल्या अंतर्मनात त्याच्या रूपाचा ठसा उमटवतात. देहभान विसरून, स्वतःला विसरून विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहात बसतात. त्या रूपाशी एकरूप होतात. विठ्ठलमय होऊन जातात. 
               विठ्ठल हा गरिबांचा अनाथांचा देव आहे. त्याची मनापासून भक्ती केली कि तो आपल्या भक्तांना संकटातून सोडवतो. जो कोणी भक्त विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करेल, त्याचे नामःस्मरण घेईल त्यालाच विठ्ठल मदत करतो. त्याच्यावर आपले कृपाछत्र धरतो. मग तो कितीही गरीब असो, अनाथ असो विठ्ठल अशा भक्तांबाबत कनवाळू, कृपाळू असतो. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात कि, "अनाथाचा बंधू विठ्ठल कृपासिंधु ।" म्हणजेच "विठ्ठल अनाथ, गोर-गरिबांचा बंधू असून त्यांच्याबाबत कृपेचा सागर (कृपासिंधु ) आहे." विठ्ठलाची भक्ती केल्याने संसारातील साऱ्या चिंता मिटून जातात. सर्व पाशातून मुक्तता मिळते. 'मी' व 'माझे' पणाचा नाश होतो म्हणजे माझे कुटुंब, माझी संपत्ती, 'मी केले आहे', 'मी मिळवले आहे.' हा गर्व झालेला असतो तो विठ्ठलभक्तीमुळे गळून पडतो. 
               तुकाराम महाराजांना संसारात अनेक यातना भोगाव्या लागल्या. कष्ट सोसावे लागले. म्हणून ते विठ्ठलनामात दंग होऊ लागले. विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले. भजन-कीर्तन करू लागले. विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. त्यांचे जीवनच विठ्ठलमय झाले. म्हणूनच ते म्हणतात कि, "बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।" म्हणजेच आपले मुखात सतत विठ्ठलाचे नाव असावे. त्याचे सावळे सुंदर रूप डोळ्यासमोर आणून त्याचे नामस्मरण करावे. विठ्ठलाला आपल्या अंतःकरणात स्थान द्यावे. त्याची मनापासून भक्ती करावी. विठ्ठलावर मनापासून प्रेम करावे. आपल्या मनातच विठ्ठलाला साठवावे. त्याच्यावर श्रद्धा ठेवावी.



















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...