तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ।
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।। १ ।।
येणें सोसें मन झाले हावभरी । परत माघारी घेत नाही ।। २ ।।
अर्थ :- 'विठ्ठल
बोलावा व विठ्ठल पाहावा आणि विठ्ठलच जिवाभावाने प्रिय करावा. ह्या
सोसानेच मन हवभरी झाले आहे. ते तेथून संसाराकडे परत होत नाही.'
भावार्थ :- तुकाराम महाराजांना संसारात अनेक यातना भोगाव्या लागल्या.
कष्ट सोसावे लागले. त्यांच्या वाण्याच्या व्यवसायात खोट बसून धंदा बुडाला.
दुष्काळाने त्यांच्या जवळील पैसे धान्य संपले. अन्नान्न करून बायको गेली.
अशा त्यांच्यावर एकामागून एक आपत्ती कोसळल्यामुळे त्यांचे संसारातील मन
उडाले. भंडारा डोंगरावर जाऊन एकांतात बसू लागले. विठ्ठलनामात दंग होऊ
लागले. जेथे जातील तेथे विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले. भजन कीर्तन करू
लागले. असे ते विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. त्यांना जिकडे तिकडे विठ्ठलच
दिसू लागला. त्यांच्या अंतःकरणात पूर्णपणे विठ्ठल विसावला आहे. तुकाराम
महाराजांचे जीवनच विठ्ठलमय झाले आहे. म्हणूनच ते म्हणतात कि ''बोलावा
विठ्ठल। पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।" म्हणजेच आपले मुखात सतत
विठ्ठलाचे नाव असावे. त्याचे सावळे सुंदर रूप डोळ्यांसमोर आणून त्याचे
नामस्मरण करावे. विठ्ठलाला आपल्या अंत:करणात स्थान दयावे. त्याची मनापासून
भक्ती करावी. विठ्ठलावर मनापासून प्रेम करावे. आपल्या मनात विठ्ठलाला
साठवावे.
तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाची भक्ती केल्याने,
त्याचे नामस्मरण केल्याने मन भरून आले आहे. विठ्ठलमुळेच संसारातील सारी
दु:खे बाजूला पडली. विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे मन आनंदाने भरून गेले आहे.
मनात आता संसाराबद्दल कुठलेही किल्मिष उरले नाही. मन आता विठ्ठल भक्तीतच
रामू लागले आहे. विठ्ठलभक्तीमुळे संसाराची ओढ कमी झाली आहे. मन संसाराकडे
परत ओढले जात नाही.
बंधनापासूनी उकलली गाठी । देतां आली मिठी सावकाश ।। ३ ।।
तुका म्हणे देह भरीला विठ्ठलें । काम क्रोधे केलें घर रितें ।। ४ ।।
बंधनापासूनी उकलली गाठी । देतां आली मिठी सावकाश ।। ३ ।।
तुका म्हणे देह भरीला विठ्ठलें । काम क्रोधे केलें घर रितें ।। ४ ।।
अर्थ :- "संसारबंधनाच्या गाठी सुटल्यामुळे मोकळा झालो व त्या योगाने स्वस्थपणे
हरीला मिठी मारता आली. तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरण व देह
विठ्ठलस्वरूपाने भरून गेल्याने कामक्रोधादि वृत्ती अंतःकरणापासून नाहीश्या
झाल्या."
भावार्थ :- तुकाराम महाराज विठ्ठलनामात, त्याच्या भजन कीर्तनात
दंग राहू लागले. तिन्ही त्रिकाळ विठ्ठलभक्ती शिवाय त्यांना काही सुचेनासे
झाले. विठ्ठलाचे नामस्मरण करावे, त्याचे भजन कीर्तन गावे असा त्यांचा
दिनक्रम चालू झाला. यामुळे त्यांचे संसारातील मन उडू लागले. संसारामुळे
विटलेले मन विठ्ठलभक्तीमुळे आनंदित होऊ लागले. संसाराची ओढ कमी होऊ लागली.
विठ्ठलभक्तीमुळे मान अपमान याचे त्यांना काही वाटेनासे झाले. त्यांचे
अंतःकरण पवित्र, निर्मळ होऊ लागले. मनातील राग, लोभ, मत्सर, वासना ह्या
वृत्ती नाहीश्या झाल्या. विठ्ठलभक्तीमुळे त्यांचा देहच विठ्ठलरूप झाला.
म्हणूनच ते म्हणतात कि संसारबंधनातून सुटल्यामुळे हरीला (विठ्ठलाला) मिठी
मारता आली.
No comments:
Post a Comment