लढवय्या खेळाडू युवराज सिंग
विश्वचषक स्पर्धा ऐन रंगात आली असताना युवराज सिंगच्या निवृत्तीची बातमी धडकली. एकेकाळी आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे युवराज सिंगने भारतीय संघात स्थान मिळवले. आपल्या उत्कृष्ठ खेळीने युवराज सिंग भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला होता. त्याने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही चमक दाखवली. भारतीय संघ अडचणीत असला कि युवराज सिंग मदतीला धावून यायचा. म्हणूनच कर्णधाराचा त्याच्यावर विश्वास असायचा.
क्रिकेटचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले. त्याचे वडील योगराज सिंग भारतासाठी क्रिकेट खेळले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच युवराज तयार झाला. युवराज डावखुरा फलंदाज आहे. त्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. त्याने २००२ मध्ये इंग्लंड मध्ये नेटवेस्ट चषकमध्ये अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळी करत भारताला कप जिंकून दिला. २००७ मध्ये t -२० विश्वचषक स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात सलग ६ चेंडूवर ६ षटकार ठोकून विक्रम केला. २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळीने चार वेळा मॅन ऑफ द मॅच व मालिकावीर असे पुरस्कार पटकाविले. युवराजसिंगच्या १७ वर्षाच्या कारकिर्दीत ३०४ एकदिवशीय सामने खेळून १४ शतके व ५२ अर्धशतकांच्या जोरावर ८७०१ धावा आहेत. ४० कसोटी सामने खेळून ३ शतके ११ अर्धशतकांच्या जोरावर १९०० धावा आहेत तर t-२० मध्ये ५८ सामन्यात ८ अर्धशतकांच्या जोरावर ११७७ धावा आहेत. युवराजसिंगने तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात आपला ठसा उमटवला आहे.
युवराज सिंगने कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी सामना केला आहे. त्याने क्रिकेटमध्ये मैदानावर लढत राहण्याची जी जिद्द दाखवली तशीच जिद्द त्याने कर्करोगाशी सामना करताना दाखवली. या जिद्दीमुळेच तो कर्करोगासारख्या भयानक रोगातून मुक्त झाला व परत त्याने क्रिकेट मैदानावर पाय ठेवले. क्रिकेट बरोबरच कर्करोगाशी तो अखेरपर्यंत लढत राहिला. म्हणूनच तो एक लढवय्या खेळाडू आहे.
No comments:
Post a Comment