Friday, June 7, 2019

कथा -- त्याग

 
कथा -- त्याग 

          नेहमीप्रमाणेच उन्हाळ्याच्या सुट्टया संपून कॉलेज भरल होतं. पुढच्या वर्गात गेल्याचा आणि नवे मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. 
           ज्योती आणि प्रकाशही असेच दोघे मित्र. प्रकाशची आई दुसऱ्याचे घरकाम करून त्याला शिकवत होती प्रकाश शिकून कलेक्टर व्हावा, असे त्याच्या आईचं स्वप्न होतं.  ज्योती श्रीमंत घरची मुलगी. प्रकाशला ज्योती आवडू लागली होती. तिचीही त्याला साथ होती. साहजिकच दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तिनं त्याच्या परिस्थितीसह त्याला स्वीकारलं होतं. दोघे रोज भेटत राहिले. रोज प्रेमाच्या गप्पा होऊ लागल्या. तो न विसरता तिच्यासाठी गुलाबाचं फुल आणत असे. ते फुल ती आनंदाने स्विकारत असे. कधीही तिनं त्याच्याकडून अपेक्षा केली नव्हती. त्याला सतत वाटत असे की ज्योती श्रीमंत घरची मुलगी  आहे त्यामुळे तिची अपेक्षा मी पुर्ण करू शकणार नाही. तिच्याबरोबर भावी आयुष्याची रंगवलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेडा झाला होता. सोबत त्याला ज्योतीची साथ होतीच. 
          एक दिवस अचानक ती अंधारून आल्यासारखी त्याच्या जीवनातून निघून गेली. त्यानं तिला खुप शोधलं पण त्याचा शोध व्यर्थ ठरला. शेवटी त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार घोंघावू लागले. त्याला वाटले, कदाचित ती आपल्या परिस्थितीमुळं सोडून गेली असावी. या विचाराने त्याच्या मनात थैमान घातले. तो ईर्षेने पेटून उठला व ध्येयपूर्तीसाठी झगडू लागला. आटोकाट प्रयत्न करू लागला. रात्रंदिवस मेहनत करू लागला. अभ्यास करत राहिला. एक दिवस त्याच्या आशेचा सूर्य उगवला. कलेक्टर झाल्याची बातमी त्याला कळली. तो एक प्रशासकीय अधिकारी झाला होता. त्या आनंदाने तो हुरळून गेला. ज्योतीच्या आठवणीवर जगणारा प्रकाश उरला नव्हता तर तो एक अधिकारी झालेला प्रकाश होता. त्याला त्याच्या अधिकारपदाचा अभिमान होता, गर्व होता. या गर्वातच तो ज्योतीचे प्रेम, तिची साथ विसरला होता. 
          एक दिवस अचानक प्रकाश रस्त्याने स्वतःच्या गाडीतून जात असताना एक वृध्द जोडपं रस्त्याच्या कडेला दिसतं. तो त्यांना न्याहाळतो; तर ते ज्योतीचे आईवडील असल्याचे कळते. तो त्यांना गाडीत बसण्याची विनंती करतो. ते गाडीत बसतात. तो आपली ओळख सांगतो. आपण कलेक्टर झाल्याचेही गर्वाने सांगतो. तो ज्योतीविषयी त्यांच्याकडे चौकशी करतो. ज्योतीचे आईवडील त्याला आपल्या घरी घेऊन येतात. घरी आल्यावर प्रकाश घर न्याहाळतो तर एका भिंतीवर ज्योतीचा हार घातलेला फोटो दिसतो. तो ज्योतीविषयी चौकशी करतो. वडील त्याला सांगतात, "तिला दोन वर्षापूर्वीच ब्लडकॅन्सर झाला होता. तिला हे माहित होते. त्यातच तिचे निधन झाले." हे ऐकून प्रकाश सैरभैर झाला. त्याला काय बोलावे सुचेनाच. आपल्या ध्येयपूर्तीच्या आड येऊ नये म्हणून तिने आपल्याला हे सांगितले नाही. आपल्यापासून लपवून ठेवले. त्याला आपल्या स्वार्थी वागण्याचा पश्चाताप व्हायला लागला. त्याला अपराधीपणासारखं वाटू लागलं. आपल्यासाठी ज्योतीने केवढा त्याग केला व आपण तिला दूषणे देत बसलो याचे त्याला दुःख वाटू लागले. तिच्या त्यागाबद्दल फोटोपुढे नतमस्तक झाला.



















 



















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...