बारा राशींवर कविता
मेष...
सरळस्वभावी असे रोखठोक
मतप्रदर्शन करिती बिनधोक
घेतले तर ह्यांच्याशी वाकडे
करिती एक घाव दोन तुकडे..
वृषभ...
सौन्दर्यप्रधान असे शृंगारिक
आनंद वेचती बारीकसारीक
कामात विलंब असे दडलेला
ह्यांचा आळस ह्यांना नडलेला..
मिथुन...
सतत सतत असते बोलणारी
मनमोकळी जीवनी चालणारी
नको तिथे नको तेव्हा बोलतात
स्वतः हुशार समजून चालतात..
कर्क...
असती हे लोक भावनाप्रधान
सत्यात उतरवती हे विधान
विश्वासात येऊन होती राजी
मग सहज दर्शवती नाराजी..
सिंह...
असती हे लोक रुबाबदार
वाणीस असे ह्यांच्या धार
भरलेला असतो अहंकार
क्षुल्लक प्रतिष्ठेचे बंद दार..
कन्या...
वाटे सर्वांना हवीहवीशी
बाब ह्यांच्यात नवीनवीशी
शंकेखोर ह्यांचा स्वभाव
विश्वासाचे पुसती हे नाव..
तुळ...
जीवनी असे समतोलपणा
आपुले मानिती सर्वजना
एकदा जर आला ह्यांना गर्व
अहंकाराचे सुरु होते पर्व..
वृश्चिक...
कधी हवी कधी नकोनकोशी
रहस्यमय स्वभाव पाठीशी
ह्यांचे मन नाही येत कळून
ह्यांचा जोडीदार जातो पळून..
धनु...
हौशी वृत्ती निर्भीड स्वभाव
लढाऊपणाचा नसे अभाव
मी पणा असतो दडलेला
नात्यांत धूळ खात पडलेला..
मकर...
काटकसरी ह्यांचा स्वभाव
स्वावलंबी जीवनाचे नाव
छोटयाश्या गोष्टीवर निराशा
चिकाटीची वेगळी भाषा..
कुंभ...
अचाट ह्यांची बुद्धिमत्ता
कार्यक्षेत्रात ह्यांची सत्ता
प्रेमरस असतो दुरावलेला
एकांतवासात स्थिरावलेला..
मीन...
धार्मिक प्रेमळ वृत्ती असे
द्वेषभाव कधी मनी नसे
असती सारे विसरभोळे
कानी हे कापसाचे गोळे..
No comments:
Post a Comment