Sunday, February 24, 2019

मराठी कविता -- पहिला पाऊस




मराठी कविता -- पहिला पाऊस 

पहाट झाली, 
नभ दाटून आले,
पावसाच्या हलक्या सरीत, 
मन भिजूनी गेले । 

सगळीकडे पसरला गारवा, 
वारं लागलं झोंबायला,
सगळीकडे हिरवळ पसरली,
मनात छोटीसी पालवी फुटली ।

पहिला पाऊस,
खूप काही देऊन गेला,
मन लागले,
भरून यायला ।

वरून राजाच्या सान्निध्यात,
मन लागले भिजायला,
आनंद मिळाला,
मनातला राजकुमार भेटल्यासारखा ।।












 











 

Saturday, February 23, 2019

सौन्दर्यवती लावण्य -- मधुबाला




सौन्दर्यवती लावण्य -- मधुबाला 

          मधुबाला हि हिंदी चित्रपटसृष्टीला दैवाने दिलेली सौन्दर्याची देणगी आहे. मधुबाला आपल्या दैवजात सौन्दर्याने व अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात कोटयावधी प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेली अभिनेत्री आहे. 
वैयक्तिक जीवन --
          मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. तिचे मूळ नाव मुमताज जहाँन बेगम दहलवी. डॉ. सुशीलाराणे पटेल यांनी तिचे मधुबाला असे नामकरण केले. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी १९४२ मध्ये वसंत या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 'ज्वारभाटा' या चित्रपटाच्या सेटवर दिलीपकुमार आणि मधुबालाची पहिली भेट झाली तेव्हा ती १८ वर्षाची होती. तिचे दिलीपकुमारवर प्रेम जडले व त्याच्याबरोबर विवाह करायचा निर्णय घेतला परंतु दिलीपकुमारने तिला नकार दिला. १९६० मध्ये तिने गायक किशोरकुमारशी विवाह केला. 
कारकीर्द  --
          १९४७ मध्ये 'नीलकमल' या चित्रपटात ती नायिका म्हणून चमकली. या चित्रपटातील तिचा नायक होता राजकपूर. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने व सौन्दर्याने तिला 'व्हीनस ऑफ स्क्रीन' केले. या चित्रपटानंतर तिने माघे वळून बघितलेच नाही. चितोड, विजय, लाल दुपट्टा, अमरप्रेम, मेरे भगवान, अपराधी या चित्रपटात ती नायिका म्हणून चमकली. बॉम्बे टॉकीजच्या 'महल' या चित्रपटात तिची मुख्य भूमिका होती. कमाल अमरोही यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला. यातील 'आयेगा आनेवाला' हे गाणे तर प्रचंड गाजले. या चित्रपटाने मधुबालाला यशाच्या शिखरावर पोचवले. अशोक कुमार, दिलीपकुमार, देवानंद, भारत भूषण, किशोर कुमार या दिग्गज कलाकारांबरोबर तिने नायिकेच्या भूमिका केल्या. मधुबालाने आपल्या कारकिर्दीत ७२ चित्रपटात भूमिका केल्या. मधुबालाच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा चित्रपट म्हणजे 'मुगल-ए-आझम'. या चित्रपटाने तिला प्रचंड कीर्ती मिळवून दिली. दिलीप कुमार व पृथ्वीराज कपूर या दिग्गज अभिनेत्यांबरोबर तिने भूमिका केली. या अभिनेत्यांबरोबरच  तिचाही अभिनय प्रचंड गाजला. या चित्रपटातले तिच्यावर चित्रित झालेले 'प्यार किया तो डरना क्या' हे गाणे प्रचंड गाजले. 
          मधुबालाने सहज सुंदर अभिनयाने चित्रपट रसिकांवर भुरळ घातली. तिने अवखळ, खटयाळ नायिका चित्रपटात रंगवल्या. तिच्या सौन्दर्याने व मोहक हसण्याने प्रेक्षक तिच्यावर फिदा असायचे. तिने भूमिका केलेले 'गेट वे ऑफ इंडिया', बरसात कि रात', 'महल', 'फागुन', 'संगदील', 'चलती का नाम गाडी', 'सिरी फरहाद', 'मुगल-ए-आझम' हे चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटातील तिच्यावर चित्रित झालेली गाणी लोकप्रिय झाली. संगदील मधले 'यह हवा, यह रात, यह चाँदनी', सिरी फरहाद मधले 'गुजरा हुआ जमाना' व 'यह वादा करो चाँद के सामने', बरसात कि रात मधले 'जिंदगीभर नही भुलेंगी बरसात कि रात', चालती का नाम गाडी मधले 'एक लडकी भिगी भागिसी', मुगल-ए-आझम मधले 'प्यार किया तो डरना क्या', गेट वे ऑफ इंडिया मधील 'दो घडी वो जो पास आ बैठे' हि अवीट गोडीची गाणी प्रचंड गाजली. मधुबालाला तिच्या सौन्दर्यामुळे व अभिनयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत कीर्ती, लोकप्रियता मिळाली. मधुबाला सौन्दर्याची खाणच होती. 
मृत्यू -- 
          या सौन्दर्यवतीचा काळ फारच अल्पायुषी ठरला. आपल्या अवखळ, खटयाळ अभिनयाने व मोहक हास्याने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या या अभिनेत्रीचे २३ फेब्रूवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले व हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी तारका अनंतात विलीन झाली.












 

























 





















          

Friday, February 22, 2019

तुकाराम महाराज गाथा अभंग -- राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।

 


 तुकाराम महाराज गाथा अभंग -- राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ।। १ ।।
कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ।। २ ।।
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतले सकळही ।। ३ ।।
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ।। ४ ।।
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ।। ५ ।।

          तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या प्रेमापोटीच पांडुरंगाला मदनाच्या पुतळ्याची उपमा दिली त्यामुळे त्यांना असे वाटते कि त्याच्या तेजापुढे सूर्यचंद्राच्या प्रभा (किरणे) लोपून गेल्या आहेत. मनात फक्त पांडुरंगाची भक्ती असल्यानेच त्याच्यापुढे सूर्य-चंद्रसुध्दा फिका वाटतो. कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला आहे. चंदनाची उटी अंगास लावलेली आहे. ज्याच्या कंठात (गळ्यात) वैजयंती माळ रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले धारण केली आहेत. कमरेला जरीकाठी पीतांबर नेसलेला आहे व अंगावर भरजरी शेला आहे. असे तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचे वर्णन करून पांडुरंगाला मेघाच्या नीलवर्णाची (निरभ्र निळे आकाशाची) उपमा दिली आहे. असे श्रीमूख पाहिल्याखेरीज तुकाराम महाराजांच्या जीवाला धीर निघत नाही इतकी त्यांची पांडुरंगावर श्रद्धा आहे. 

























मराठी कविता -- आई बाबा




मराठी कविता -- आई बाबा 

बाबा, आयुष्यात चालता चालता 
खूप ठेचकाळलेले असतात,
पण दाखवताना मात्र 
काहीच न झाल्यासारखं दाखवतात ।

त्यांच्याबरोबर चालता चालता 
आई पण ठेचकाळलेली असते,
पण चेहरा मात्र 
नुकतीच उमललेली कळी असते ।

कोणतेही काम केव्हाही सांगा 
ती नेहमी तयार असते,
मनातले दुःखं दुसऱ्याला सांगताना 
मोठ्यांचा मान मात्र ठेवते ।

बाबा नेहमीच 
यशाची शिखरं पादाक्रांत करतात,
पण मिळालेल्या अपमानाची 
पावती दयायला टाळतात ।

त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी 
कधीच अपुरी पडत नाही,
केलेल्या त्या दोघांनी कौतुक बघताना 
आनंदाश्रू थांबतच नाहीत ।

अशा मोठया मनाच्या आई-बाबांना 
आम्ही मनापासून केलेला नमस्कारसुद्धा 
त्यांचे ऋण फेडायला कमी पडतो,
त्यांच्यावर अजून किती प्रेम करावं 
हाच नेहमी प्रश्न पडतो ।।














 

Monday, February 18, 2019

तुकाराम महाराज गाथा अभंग -- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।

 

तुकाराम महाराज गाथा अभंग -- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।। १ ।।
तुळशीहार गळा कसे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ।। २ ।।
मकर कुंडले तळपती श्रावणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ।। ३ ।।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ।। ४ ।।

          संत तुकाराम महाराजांचे दैवत कुठले तर पांडुरंग. त्यांनी आपली सगळी भक्ती श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली. त्यांच्या मुखात सतत पांडुरंगाचे नाव असायचे. भजन कीर्तन सुद्धा पांडुरंगाचेच गायचे. त्यांच्या भक्तीत पांडुरंग एवढा साठवला आहे कि त्यांना ठायी-ठायी पांडुरंग दिसत आहे. त्यांनी या अभंगात पांडुरंगाचे वर्णनसुद्धा किती सुंदर केले आहे. कमरेवर हात ठेवलेले असे पांडुरंगाचे सुंदर ध्यान विटेवर उभे आहे. तुळशीचा हार गळ्यात घातला असून कमरेला पीतांबर नेसलेला आहे. कानात माश्याच्या आकाराप्रमाणे मकर कुंडले झळकत असून, गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. असे तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचे वर्णन केले असून पांडुरंगाच्या भक्तीतच आपले सुख मानले आहे त्यामुळेच ते पांडुरंगाचे सुशोभित मुख आवडीने पाहीन असे म्हणतात. 

 









 

Sunday, February 17, 2019

अवीट गोडीचे गाणे -- ज़िन्दगी कैसी है पहेली



अवीट गोडीचे गाणे -- ज़िन्दगी कैसी है पहेली 

           'ज़िन्दगी कैसी है पहेली हाये'  हे आनंद चित्रपटातील सुमधुर गीत आहे. आनंद चित्रपट १९७१ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक व लेखक ऋषिकेश मुखर्जी आहेत. या चित्रपटाला फिल्मफेयरचे ६ पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. या चित्रपटात राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ह्या चित्रपटातील राजेश खन्नाने म्हणलेली बाबू मोशाय हि उपाधी प्रचंड गाजली व अनेक संभाषणांमध्ये दिसून आली. कॅन्सर झालेल्या राजेश खन्नाने जीवन कसे जगावे हे 'बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये; लंबी नही...' ह्या डायलॉगमधून अमिताभला सांगितले आहे. 
          ह्या चित्रपटातील सर्व गाणी सुंदर व ऐकण्याजोगी आहेत. त्यातीलच हे एक गीत. ह्या गाण्याचे गीतकार आहेत योगेश. ह्या गाण्याला सलील चौधरी यांनी संगीत दिले आहे. मन्ना डे यांच्या आवाजातील हे गीत राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झाले आहे. हे गीत पुढीलप्रमाणे आहे. 

ज़िन्दगी कैसी है पहेली हाये 
कभी तो हँसाए, कभी ये रुलाये 

कभी देखो मन नहीं जागे,
पीछे-पीछे सपनों के भागे | 
एक दिन सपनों का रही, 
चला जाये सपनो के आगे कहाँ || 
ज़िन्दगी कैसी है पहेली हाये 
कभी तो हँसाए, कभी ये रुलाये 

जिन्होंने सजाये यहाँ मेले,
सुख-दुःख संग-संग ज़िले | 
वही चुनकर ख़ामोशी,
यूँ चले जाएँ अकेले कहाँ || 
ज़िन्दगी कैसी है पहेली हाये 
कभी तो हँसाए, कभी ये रुलाये


























Saturday, February 16, 2019

तुकाराम महाराज गाथा अभंग -- विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी माता ।।





श्रीकृष्ण यशोदा माता

गोपिकांबरोबर रासक्रीडा करताना श्रीकृष्ण

तुकाराम महाराज गाथा अभंग -- विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी माता ।।

विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी माता ।। १ ।।
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ।। २ ।। 
निष्काम निराळा । गोवी लावियेल्या चाळा ।। ३ ।।
तुका म्हणे आले । रूपा अव्यक्त चांगले ।। ४ ।। 

          'विश्व निर्माण करणारा परमात्मा सामान्य यशोदेला आई म्हणतो. ह्याप्रमाणे हा भक्ताचा अंकित आहे. जशी भक्तामध्ये त्याच्याविषयी प्रिती असेल तसे तो देव आपल्यामध्ये भक्ताविषयीचे प्रेम ठेवतो.' या ओवीतून तुकाराम महाराजांना असे सांगायचे आहे कि, विश्व निर्माण करणारा परमात्मा भगवान श्रीकृष्ण कितीही मोठा असला, त्याने सर्व विश्वाचा भार आपल्या खांद्यावर वाहिला असला, विश्वाचा पालनकर्ता असला तरी यशोदेच्या भक्तीपुढे, प्रेमापुढे तो नतमस्तकच होतो. यशोदेची भक्ती, प्रेम पाहून विश्वाचा परमात्मा श्रीकृष्ण यशोदेला आई म्हणतो. म्हणजेच आपल्यापेक्षाही यशोदेला मोठे मानतो व तिला आईपणाचा मान देतो. यावरून असे दिसून येते कि, यशोदेला श्रीकृष्णाविषयी वात्सल्य निर्माण झाले. म्हणूनच श्रीकृष्ण यशोदेला आपण देव असूनही सर्वात मोठा म्हणजे आईचा मान देतो. देव भक्ताचा प्रेमभाव, त्याने केलेली भक्ती बघूनच आपल्या अंतःकरणात भक्ताला स्थान देतो. त्याच्याविषयी प्रेम ठेवतो. 
          'जो परमात्मा सर्व कामनारहित आणि सर्व उपाधीहून वेगळा असूनही त्याने आपल्याविषयीचा छंद गोपिकांना लावला. तुकाराम महाराज म्हणतात, अव्यक्त परमात्मस्वरूप उत्तम साकार रूप धारण करते झाले.' तुकाराम महाराजांच्या मते श्रीकृष्ण परमात्मा (विश्वाचा निर्माण करता) असूनही त्यांनी कधी गोपिकांकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता व त्या सगळ्यांपेक्षा वेगळा (देव, परमात्मा) असूनही त्यांना भक्तिमार्गाने आपलेसे केले. श्रीकृष्ण त्यांच्यात खेळू लागला, त्यांच्याबरोबर गायी घेऊन रानात जाऊ लागला, त्यांची मडकी फोडून व दहीलोणी चोरून त्रास देऊ लागला. त्यांच्याबरोबर रासक्रीडा करू लागला. गोपिकांना सुद्धा त्याने त्रास दिलेले आवडायचे. आपल्या बासरी वादनाने देव गोपिकांना मंत्रमुग्ध करायचा. साऱ्या गोकुळाला देवाने वेड लावले होते. खरे तर देवाचे परमात्मा रूप पण गवळी व गोपिकांचे प्रेम व भक्ती बघून त्यांनी त्यांचेच म्हणजे गवळ्याचे रूप धारण केले.(अव्यक्त परमात्मस्वरूप उत्तम साकार रूप धारण करते झाले.)












 

























Sunday, February 10, 2019

अवीट गोडीचे गाणे -- अरे मनमोहना रे.. मोहना रे.. मोहना


 अवीट गोडीचे गाणे -- अरे मनमोहना रे.. मोहना रे.. मोहना 

          हे गीत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आहे. हा चित्रपट ४ एप्रिल १९७७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती एम. एस. साळवी यांनी केली तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कमलाकर तोरणे यांनी केले. या चित्रपटात आशा काळे व विक्रम गोखले यांनी मुख्य भूमिका निभावल्या. या चित्रपटातील गीते जगदीश खेबूडकर यांनी लिहिली असून गीताला संगीत एन. दत्ता यांनी दिले आहे. यातीलच हे एक अवीट गोडीचे पुढील गीत 

अरे मनमोहना रे.. मोहना रे.. मोहना 
कळली देवा तुला, राधिका रे राधिका 
कळली राधिका रे कळल्या गोपिका 
साधी भोळी मीरा तुला कळली नाही 
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही 
अरे मनमोहना रे.. मोहना रे.. मोहना ।। १ ।।

सात सुरांवर तन-मन नाचे 
तालावरती मधुबन नाचे 
एक अबोली होती फुलली 
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही 
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही 
अरे मनमोहना रे.. मोहना रे.. मोहना ।। २ ।।

धुंद सुगंधी यमुना लहरी 
उजळून आली गोकुळ नगरी 
जीवन माझे अंधाराचे 
काळी काळी रात कधी टळली नाही 
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही 
अरे मनमोहना रे.. मोहना रे.. मोहना ।। ३ ।।

उन्हात काया, मनात छाया 
कशी समजावू वेडी माया 
युग युग सरले, डोळे भरले 
आशेची कळी कधी फुलली नाही 
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही 
अरे मनमोहना रे.. मोहना रे.. मोहना ।। ४ ।।

 गीत -- जगदीश खेबूडकर 
संगीत -- एन. दत्ता 
स्वर -- आशा भोसले 
चित्रपट -- बाळा गाऊ कशी अंगाई



































 

Saturday, February 9, 2019

भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण पान -- १९८३ विश्वचषक स्पर्धा

 

विश्वचषक उंचावताना कपिल देव

भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण पान  -- १९८३ विश्वचषक स्पर्धा 

          २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. कारण या दिवशी भारतीय संघाने अंतिम सामन्यात बलाढय वेस्ट इंडिज संघाचा ४३ धावांनी पराभव करून विश्वचषक जिंकला. पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धेत कुणाच्या खिसगणतीत नसलेल्या भारतीय संघाने तिसरी विश्वचषक स्पर्धा जिंकून एक इतिहास घडविला. हि स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्ण पानच आहे. 
          २५ जुन १९८३ हा दिवस उजाडला तो एक इतिहास रचण्यासाठीच. भारतीय संघाने उपांत्य सामन्यात इंग्लंड संघावर ६ गडी राखून उत्कृष्ठ विजय मिळवला व अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात भारतीय संघाची गाठ बलाढय वेस्ट इंडिज संघाबरोबर पडली. 
          अंतिम सामन्यात भारतीय संघाने  नाणेफेक हरली आणि फलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या व जगातील उत्कृष्ठ हल्ला चढवणाऱ्या वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजीसमोर भारताला पहिल्यांदा फलंदाजी करायला मिळाली. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिज गोलंदाजीचा महत्वाचा असा प्रतिकार केला. श्रीकांतने ५७ चेंडूत ३८ धावा केल्या व अमरनाथने ८० चेंडूत २६ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाज एन्डी रॉबर्टस, माल्कम मार्शल, ज्योएल गार्नर व मायकल होल्डिंग तसेच कुशलतेने फिरकीचा वापर करणाऱ्या ल्यारी गोम्स या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. भारतीय संघाचा डाव ५४.५ षटकात १८३ धावातच संपुष्टात आला. 
          जेव्हा भारतीय संघात गंभीर परिस्थिती उद्भवली तेव्हा कपिल देव म्हणाला, "संघासाठी हि जिंकण्यासारखी निश्चितच धावसंख्या नाही पण निश्चितपणे हि लढाऊ धावसंख्या आहे. आपण जर लढा दिला तर निश्चितच आपला संघ जिंकेल." भारतीय गोलंदाजांनी वातावरण आणि खेळपट्टीचा व्यवस्थितरित्या फायदा घेतला व आपल्या गोलंदाजीने वेस्ट इंडिजच्या उत्कृष्ठ फलंदाजीचा ५२ षटकात १४० धावात अंत केला. भारताने वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव केला आणि क्रिकेट इतिहासातील एक जबरदस्त आकर्षक विजय नोंदवला. 
          मोहिंदर अमरनाथ आणि  मदनलाल यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. एक लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे व्हिवियन रिचर्डसचा कपिल देवने २० यार्ड उलटा पळत जाऊन झेल घेतला. रिचर्डस आउट झाला तेव्हा त्याने २८ चेंडूत ३३ धावा झोडपल्या होत्या. त्याच्या ह्या धावा वेस्ट इंडिज संघासाठी सर्वोच्च ठरल्या होत्या. मोहिंदर अमरनाथ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सात षटकात फक्त १२ धावा देत ३ गडी बाद केले. त्याच्या अष्टपैलू खेळीने परत एकदा त्याला 'मॅन ऑफ द मॅच' घोषित केले. 
          सर्व खेळाडूंच्या प्रयत्नाने व सांघिक खेळीमुळे भारतीय संघाला हा विजय मिळवणे सोपे गेले. म्हणूनच हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.




































Friday, February 8, 2019

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवाचे प्रतीक -- श्री कृष्णाबाई उत्सव भाग २

 








कृष्णाबाईचा रथोत्सव

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवाचे प्रतीक -- श्री कृष्णाबाई उत्सव  भाग २

          या उत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम असतात. कृष्णाबाईसमोर सकाळ-संध्याकाळ श्रीसूक्त पठण, लघुरुद्र, मंत्रपुष्प व आरती म्हणली जाते. संस्थानचा तसेच सुवासिनींचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चालतो. धर्मपुरीत व रामडोह आळीत रथोत्सव असतो. संध्याकाळी कृष्णाबाईची रथातून मिरवणूक काढली जाते. या दिवशी सुवासिनी कृष्णाबाईला ओवाळून तिची ओटी भरतात. सर्व आळीकर, निमंत्रित व परगावच्या लोकांना साती घाटावरून महाप्रसाद दिला जातो. याला प्रेजन किंवा प्रयोजन म्हणतात. पूर्वी गणपती आळीतील मुले महाप्रसादाच्या आदल्या दिवशी 'पाहुणे, राऊळे, कावळे सर्वजण घाटावर जेवायला या हो या' अशी गावातून दवंडी पिटत. महाप्रसादासाठी सर्व धर्मातील लोक सढळ हाताने मदत करतात. या महाप्रसादाचे वैशिष्ठय म्हणजे आमटी-भात. या उत्सवातील आमटीची चव दुसऱ्या कुठल्या आमटीला येत नाही. महाप्रसादासाठी खास करून आमटी-भातासाठी परगावावरूनही लोक येतात. 
          प्रत्येक घाटावर भजन व कीर्तनाचे कार्यक्रम होतात. धर्मपुरी घाटावर शास्त्रीय, सुगम व नाटय गीतांच्या स्पर्धा असतात. आजपर्यंत या उत्सवात मोठ-मोठे व नामवंत कलाकारांनी हजेरी लावून आपली कला सादर केली. गंगापुरी घाटावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान झाले. धर्मपुरी घाटावर शरद उपाध्ये यांचा बारा राशींवर आधारित संपूर्ण हास्यमय कार्यक्रम राशीचक्र झाला. व. पू. काळे यांचा मधली आळी घाटावर, द. मा. मिराजदार यांचा गणपती आळी घाटावर तर शंकर पाटील यांचा रामडोह आळी घाटावर कथाकथनाचा कार्यक्रम झाला. मेंदीच्या पानावर, मंगलगाणी-दंगलगाणी, शुक्रतारा असे भावगीतांचे कार्यक्रम झाले. अनुप जलोटा व बाबामहाराज सातारकर यांचे भजन व कीर्तनाचेही कार्यक्रम घाटावर झाले. आता प्रत्येक घाटावर स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी दिली जात आहे. 
          प्रत्येक घाटावरील कृष्णाबाईच्या मूर्ती आकर्षक व सुबक असून वैशिष्ठयपूर्ण आहेत. मधली आळी वरील कृष्णाबाईची मूर्ती बसलेली आहे. ब्राह्मणशाही घाटावर मुरलीधर आहे तर रामडोह आळी घाटावर कृष्णाबाई बरोबर नवसाला पावणारा गरुड आहे. बाकीच्या घाटावरील मूर्ती हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या व उभ्या अशा आहेत. 
          असा हा वाईतील कृष्णाबाईचा सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक उत्सव आहे.












 

























 

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवाचे प्रतीक -- श्री कृष्णाबाई उत्सव भाग १








कृष्णाबाईचा रथोत्सव

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवाचे प्रतीक -- श्री कृष्णाबाई उत्सव  भाग १

          वाईचे महागणपती हे आराध्य दैवत आहे तर कृष्णाबाई ग्रामदैवत आहे. वाईची 'जलवाहिनी' म्हणून कृष्णानदीला महत्व आहे. त्यामुळेच नदीबद्दल कृदज्ञता व्यक्त करण्यासाठी कृष्णाबाईचा उत्सव चालू झाला. या उत्सवाची सुरवात माघ शुद्ध १ पासून होते. हा उत्सव साधारणपणे दीड महिना चालतो. 
          कृष्णाबाई उत्सवाची सुरवात शिवकाळापासून झाली आहे. त्यामुळे या उत्सवाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. ज्यावेळेस अफझलखानाचा वेढा वाई गावाला पडला होता त्यावेळेस वाईतील शेंडे शास्त्री यांनी 'अफझलखानाच्या संकटातून वाईला सोडव, तुझा उत्सव चालू करीन' असा नवस कृष्णा नदीला बोलला होता. त्यावेळेपासून हा उत्सव चालू झाला. तेव्हा वाईतील कार्यकर्ते एकत्र येऊन एकच उत्सव साजरा करायचे. पण नंतर वाईतील प्रत्येक घाटावर हा उत्सव साजरा केला जावू लागला. या उत्सवाची भीमकुंड आळीपासून सुरवात होऊन नंतर मधली आळी, धर्मपुरी, गणपती आळी, ब्राह्मणशाही, रामडोह आळी, गंगापुरी या सात घाटांवर हा उत्सव चालतो. प्रत्येक घाटावर चार ते सात दिवस उत्सव चालतो. या उत्सवात समाजातील सर्व थरातील लोक एकत्र येतात. या उत्सवात गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा भेदभाव केला जात नाही. सर्व कार्यकर्ते मनापासून या उत्सवात सहभागी होऊन कार्य करत असतात. 
          कृष्णाबाई उत्सवाची सुरवात मुहूर्तमेढ रोवून होते. आळीतील कार्यकर्तेच एकत्र येऊन आखीव, रेखीव व शास्त्रशुद्ध पद्धतीने मंडप घालतात. जवळ जवळ महिनाभर आधी मांडव घालण्याचे काम चालते. झुंबर, पडदे व विद्दयुत रोषणाईमूळे मांडव सुशोभित व आकर्षक दिसतो. कृष्णाबाई बसते त्या दिवशी छबिना निघतो. गणपतीआळी व गंगापुरीवर कृष्णाबाई उठताना छबिना निघतो. छबिना निघतो त्यावेळेस सुवासिनी घरासमोर सडा-रांगोळी घालतात. गुलालाची उधळण करीत, ढोल-झांजांच्या निनादात व 'कृष्णाबाई महाराज कि जय' च्या जयघोषात कृष्णाबाईची पालखी दारासमोर येते तेव्हा सुवासिनी कृष्णाबाईला ओवाळून तिची खणा-नारळाने ओटी भरतात. 

 कृष्णाबाई उत्सवाची आणखी माहिती भाग २ मध्ये 






































 

Sunday, February 3, 2019

मराठी कविता -- चहास्तोत्रम






                                                                 वाफाळलेला चहा


मराठी कविता -- चहास्तोत्रम 

शीणसुस्तीमहानिद्रा, क्षणात पळवी चहा,
प्रभाते तोंड धुवोनि, घेता वाटे प्रसन्नता ।। १ ।।

अर्धांगिनीहस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे,
पुन्हा स्नानांतरे घेता, अंगी चैतन्य सळसळे ।। २ ।। 

लिंबुयुक्ता विनादुग्धा, अरुची पित्त घालवी,
शर्करेविना घेता मधुमेह न गांजवी ।। ३ ।।

शितज्वर शिरःशूळा, खोकला नाक फुरफुरा,
गवतीपत्र अद्रकायुक्ता, प्राशिता जाई सत्वरा ।। ४ ।।

भोजनापूर्व प्राशिता, मंदाग्नी पित्तकारका,
घोटता घोटता वाढे, टैनिन जहरकारका ।। ५ ।।

चहाविना आप्तस्नेह्यांचे, स्वागताची अपूर्णता,
यास्तव भूतल जन हे, म्हणती यासी अमृता,
           म्हणती यासी अमृता ।। ६ ।।

इति सुहासविरतिम चहास्तोत्रं चहाबाज 
           प्रीत्यर्थम समर्पितम ।












 











 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...