Friday, February 22, 2019

तुकाराम महाराज गाथा अभंग -- राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।

 


 तुकाराम महाराज गाथा अभंग -- राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ।। १ ।।
कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ।। २ ।।
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतले सकळही ।। ३ ।।
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ।। ४ ।।
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ।। ५ ।।

          तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या प्रेमापोटीच पांडुरंगाला मदनाच्या पुतळ्याची उपमा दिली त्यामुळे त्यांना असे वाटते कि त्याच्या तेजापुढे सूर्यचंद्राच्या प्रभा (किरणे) लोपून गेल्या आहेत. मनात फक्त पांडुरंगाची भक्ती असल्यानेच त्याच्यापुढे सूर्य-चंद्रसुध्दा फिका वाटतो. कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला आहे. चंदनाची उटी अंगास लावलेली आहे. ज्याच्या कंठात (गळ्यात) वैजयंती माळ रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले धारण केली आहेत. कमरेला जरीकाठी पीतांबर नेसलेला आहे व अंगावर भरजरी शेला आहे. असे तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचे वर्णन करून पांडुरंगाला मेघाच्या नीलवर्णाची (निरभ्र निळे आकाशाची) उपमा दिली आहे. असे श्रीमूख पाहिल्याखेरीज तुकाराम महाराजांच्या जीवाला धीर निघत नाही इतकी त्यांची पांडुरंगावर श्रद्धा आहे. 

























No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...