सौन्दर्यवती लावण्य -- मधुबाला
मधुबाला हि हिंदी चित्रपटसृष्टीला दैवाने दिलेली सौन्दर्याची देणगी आहे. मधुबाला आपल्या दैवजात सौन्दर्याने व अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात कोटयावधी प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेली अभिनेत्री आहे.
वैयक्तिक जीवन --
मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. तिचे मूळ नाव मुमताज जहाँन बेगम दहलवी. डॉ. सुशीलाराणे पटेल यांनी तिचे मधुबाला असे नामकरण केले. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी १९४२ मध्ये वसंत या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 'ज्वारभाटा' या चित्रपटाच्या सेटवर दिलीपकुमार आणि मधुबालाची पहिली भेट झाली तेव्हा ती १८ वर्षाची होती. तिचे दिलीपकुमारवर प्रेम जडले व त्याच्याबरोबर विवाह करायचा निर्णय घेतला परंतु दिलीपकुमारने तिला नकार दिला. १९६० मध्ये तिने गायक किशोरकुमारशी विवाह केला.
कारकीर्द --
१९४७ मध्ये 'नीलकमल' या चित्रपटात ती नायिका म्हणून चमकली. या चित्रपटातील तिचा नायक होता राजकपूर. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने व सौन्दर्याने तिला 'व्हीनस ऑफ स्क्रीन' केले. या चित्रपटानंतर तिने माघे वळून बघितलेच नाही. चितोड, विजय, लाल दुपट्टा, अमरप्रेम, मेरे भगवान, अपराधी या चित्रपटात ती नायिका म्हणून चमकली. बॉम्बे टॉकीजच्या 'महल' या चित्रपटात तिची मुख्य भूमिका होती. कमाल अमरोही यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला. यातील 'आयेगा आनेवाला' हे गाणे तर प्रचंड गाजले. या चित्रपटाने मधुबालाला यशाच्या शिखरावर पोचवले. अशोक कुमार, दिलीपकुमार, देवानंद, भारत भूषण, किशोर कुमार या दिग्गज कलाकारांबरोबर तिने नायिकेच्या भूमिका केल्या. मधुबालाने आपल्या कारकिर्दीत ७२ चित्रपटात भूमिका केल्या. मधुबालाच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा चित्रपट म्हणजे 'मुगल-ए-आझम'. या चित्रपटाने तिला प्रचंड कीर्ती मिळवून दिली. दिलीप कुमार व पृथ्वीराज कपूर या दिग्गज अभिनेत्यांबरोबर तिने भूमिका केली. या अभिनेत्यांबरोबरच तिचाही अभिनय प्रचंड गाजला. या चित्रपटातले तिच्यावर चित्रित झालेले 'प्यार किया तो डरना क्या' हे गाणे प्रचंड गाजले.
मधुबालाने सहज सुंदर अभिनयाने चित्रपट रसिकांवर भुरळ घातली. तिने अवखळ, खटयाळ नायिका चित्रपटात रंगवल्या. तिच्या सौन्दर्याने व मोहक हसण्याने प्रेक्षक तिच्यावर फिदा असायचे. तिने भूमिका केलेले 'गेट वे ऑफ इंडिया', बरसात कि रात', 'महल', 'फागुन', 'संगदील', 'चलती का नाम गाडी', 'सिरी फरहाद', 'मुगल-ए-आझम' हे चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटातील तिच्यावर चित्रित झालेली गाणी लोकप्रिय झाली. संगदील मधले 'यह हवा, यह रात, यह चाँदनी', सिरी फरहाद मधले 'गुजरा हुआ जमाना' व 'यह वादा करो चाँद के सामने', बरसात कि रात मधले 'जिंदगीभर नही भुलेंगी बरसात कि रात', चालती का नाम गाडी मधले 'एक लडकी भिगी भागिसी', मुगल-ए-आझम मधले 'प्यार किया तो डरना क्या', गेट वे ऑफ इंडिया मधील 'दो घडी वो जो पास आ बैठे' हि अवीट गोडीची गाणी प्रचंड गाजली. मधुबालाला तिच्या सौन्दर्यामुळे व अभिनयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत कीर्ती, लोकप्रियता मिळाली. मधुबाला सौन्दर्याची खाणच होती.
मृत्यू --
या सौन्दर्यवतीचा काळ फारच अल्पायुषी ठरला. आपल्या अवखळ, खटयाळ अभिनयाने व मोहक हास्याने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या या अभिनेत्रीचे २३ फेब्रूवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले व हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी तारका अनंतात विलीन झाली.
No comments:
Post a Comment