तुकाराम महाराज गाथा अभंग -- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ।। १ ।।
तुळशीहार गळा कसे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ।। २ ।।
मकर कुंडले तळपती श्रावणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ।। ३ ।।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ।। ४ ।।
संत तुकाराम महाराजांचे दैवत कुठले तर पांडुरंग. त्यांनी आपली सगळी भक्ती श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली. त्यांच्या मुखात सतत पांडुरंगाचे नाव असायचे. भजन कीर्तन सुद्धा पांडुरंगाचेच गायचे. त्यांच्या भक्तीत पांडुरंग एवढा साठवला आहे कि त्यांना ठायी-ठायी पांडुरंग दिसत आहे. त्यांनी या अभंगात पांडुरंगाचे वर्णनसुद्धा किती सुंदर केले आहे. कमरेवर हात ठेवलेले असे पांडुरंगाचे सुंदर ध्यान विटेवर उभे आहे. तुळशीचा हार गळ्यात घातला असून कमरेला पीतांबर नेसलेला आहे. कानात माश्याच्या आकाराप्रमाणे मकर कुंडले झळकत असून, गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. असे तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचे वर्णन केले असून पांडुरंगाच्या भक्तीतच आपले सुख मानले आहे त्यामुळेच ते पांडुरंगाचे सुशोभित मुख आवडीने पाहीन असे म्हणतात.
No comments:
Post a Comment