Friday, February 8, 2019

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवाचे प्रतीक -- श्री कृष्णाबाई उत्सव भाग १








कृष्णाबाईचा रथोत्सव

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवाचे प्रतीक -- श्री कृष्णाबाई उत्सव  भाग १

          वाईचे महागणपती हे आराध्य दैवत आहे तर कृष्णाबाई ग्रामदैवत आहे. वाईची 'जलवाहिनी' म्हणून कृष्णानदीला महत्व आहे. त्यामुळेच नदीबद्दल कृदज्ञता व्यक्त करण्यासाठी कृष्णाबाईचा उत्सव चालू झाला. या उत्सवाची सुरवात माघ शुद्ध १ पासून होते. हा उत्सव साधारणपणे दीड महिना चालतो. 
          कृष्णाबाई उत्सवाची सुरवात शिवकाळापासून झाली आहे. त्यामुळे या उत्सवाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. ज्यावेळेस अफझलखानाचा वेढा वाई गावाला पडला होता त्यावेळेस वाईतील शेंडे शास्त्री यांनी 'अफझलखानाच्या संकटातून वाईला सोडव, तुझा उत्सव चालू करीन' असा नवस कृष्णा नदीला बोलला होता. त्यावेळेपासून हा उत्सव चालू झाला. तेव्हा वाईतील कार्यकर्ते एकत्र येऊन एकच उत्सव साजरा करायचे. पण नंतर वाईतील प्रत्येक घाटावर हा उत्सव साजरा केला जावू लागला. या उत्सवाची भीमकुंड आळीपासून सुरवात होऊन नंतर मधली आळी, धर्मपुरी, गणपती आळी, ब्राह्मणशाही, रामडोह आळी, गंगापुरी या सात घाटांवर हा उत्सव चालतो. प्रत्येक घाटावर चार ते सात दिवस उत्सव चालतो. या उत्सवात समाजातील सर्व थरातील लोक एकत्र येतात. या उत्सवात गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा भेदभाव केला जात नाही. सर्व कार्यकर्ते मनापासून या उत्सवात सहभागी होऊन कार्य करत असतात. 
          कृष्णाबाई उत्सवाची सुरवात मुहूर्तमेढ रोवून होते. आळीतील कार्यकर्तेच एकत्र येऊन आखीव, रेखीव व शास्त्रशुद्ध पद्धतीने मंडप घालतात. जवळ जवळ महिनाभर आधी मांडव घालण्याचे काम चालते. झुंबर, पडदे व विद्दयुत रोषणाईमूळे मांडव सुशोभित व आकर्षक दिसतो. कृष्णाबाई बसते त्या दिवशी छबिना निघतो. गणपतीआळी व गंगापुरीवर कृष्णाबाई उठताना छबिना निघतो. छबिना निघतो त्यावेळेस सुवासिनी घरासमोर सडा-रांगोळी घालतात. गुलालाची उधळण करीत, ढोल-झांजांच्या निनादात व 'कृष्णाबाई महाराज कि जय' च्या जयघोषात कृष्णाबाईची पालखी दारासमोर येते तेव्हा सुवासिनी कृष्णाबाईला ओवाळून तिची खणा-नारळाने ओटी भरतात. 

 कृष्णाबाई उत्सवाची आणखी माहिती भाग २ मध्ये 






































 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...