Friday, February 8, 2019

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवाचे प्रतीक -- श्री कृष्णाबाई उत्सव भाग २

 








कृष्णाबाईचा रथोत्सव

सांस्कृतिक व धार्मिक उत्सवाचे प्रतीक -- श्री कृष्णाबाई उत्सव  भाग २

          या उत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम असतात. कृष्णाबाईसमोर सकाळ-संध्याकाळ श्रीसूक्त पठण, लघुरुद्र, मंत्रपुष्प व आरती म्हणली जाते. संस्थानचा तसेच सुवासिनींचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चालतो. धर्मपुरीत व रामडोह आळीत रथोत्सव असतो. संध्याकाळी कृष्णाबाईची रथातून मिरवणूक काढली जाते. या दिवशी सुवासिनी कृष्णाबाईला ओवाळून तिची ओटी भरतात. सर्व आळीकर, निमंत्रित व परगावच्या लोकांना साती घाटावरून महाप्रसाद दिला जातो. याला प्रेजन किंवा प्रयोजन म्हणतात. पूर्वी गणपती आळीतील मुले महाप्रसादाच्या आदल्या दिवशी 'पाहुणे, राऊळे, कावळे सर्वजण घाटावर जेवायला या हो या' अशी गावातून दवंडी पिटत. महाप्रसादासाठी सर्व धर्मातील लोक सढळ हाताने मदत करतात. या महाप्रसादाचे वैशिष्ठय म्हणजे आमटी-भात. या उत्सवातील आमटीची चव दुसऱ्या कुठल्या आमटीला येत नाही. महाप्रसादासाठी खास करून आमटी-भातासाठी परगावावरूनही लोक येतात. 
          प्रत्येक घाटावर भजन व कीर्तनाचे कार्यक्रम होतात. धर्मपुरी घाटावर शास्त्रीय, सुगम व नाटय गीतांच्या स्पर्धा असतात. आजपर्यंत या उत्सवात मोठ-मोठे व नामवंत कलाकारांनी हजेरी लावून आपली कला सादर केली. गंगापुरी घाटावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान झाले. धर्मपुरी घाटावर शरद उपाध्ये यांचा बारा राशींवर आधारित संपूर्ण हास्यमय कार्यक्रम राशीचक्र झाला. व. पू. काळे यांचा मधली आळी घाटावर, द. मा. मिराजदार यांचा गणपती आळी घाटावर तर शंकर पाटील यांचा रामडोह आळी घाटावर कथाकथनाचा कार्यक्रम झाला. मेंदीच्या पानावर, मंगलगाणी-दंगलगाणी, शुक्रतारा असे भावगीतांचे कार्यक्रम झाले. अनुप जलोटा व बाबामहाराज सातारकर यांचे भजन व कीर्तनाचेही कार्यक्रम घाटावर झाले. आता प्रत्येक घाटावर स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी दिली जात आहे. 
          प्रत्येक घाटावरील कृष्णाबाईच्या मूर्ती आकर्षक व सुबक असून वैशिष्ठयपूर्ण आहेत. मधली आळी वरील कृष्णाबाईची मूर्ती बसलेली आहे. ब्राह्मणशाही घाटावर मुरलीधर आहे तर रामडोह आळी घाटावर कृष्णाबाई बरोबर नवसाला पावणारा गरुड आहे. बाकीच्या घाटावरील मूर्ती हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या व उभ्या अशा आहेत. 
          असा हा वाईतील कृष्णाबाईचा सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक उत्सव आहे.












 

























 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...