विश्वचषक उंचावताना कपिल देव
भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण पान -- १९८३ विश्वचषक स्पर्धा
२५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. कारण या दिवशी भारतीय संघाने अंतिम सामन्यात बलाढय वेस्ट इंडिज संघाचा ४३ धावांनी पराभव करून विश्वचषक जिंकला. पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धेत कुणाच्या खिसगणतीत नसलेल्या भारतीय संघाने तिसरी विश्वचषक स्पर्धा जिंकून एक इतिहास घडविला. हि स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्ण पानच आहे.
२५ जुन १९८३ हा दिवस उजाडला तो एक इतिहास रचण्यासाठीच. भारतीय संघाने उपांत्य सामन्यात इंग्लंड संघावर ६ गडी राखून उत्कृष्ठ विजय मिळवला व अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात भारतीय संघाची गाठ बलाढय वेस्ट इंडिज संघाबरोबर पडली.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक हरली आणि फलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या व जगातील उत्कृष्ठ हल्ला चढवणाऱ्या वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजीसमोर भारताला पहिल्यांदा फलंदाजी करायला मिळाली. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिज गोलंदाजीचा महत्वाचा असा प्रतिकार केला. श्रीकांतने ५७ चेंडूत ३८ धावा केल्या व अमरनाथने ८० चेंडूत २६ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाज एन्डी रॉबर्टस, माल्कम मार्शल, ज्योएल गार्नर व मायकल होल्डिंग तसेच कुशलतेने फिरकीचा वापर करणाऱ्या ल्यारी गोम्स या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. भारतीय संघाचा डाव ५४.५ षटकात १८३ धावातच संपुष्टात आला.
जेव्हा भारतीय संघात गंभीर परिस्थिती उद्भवली तेव्हा कपिल देव म्हणाला, "संघासाठी हि जिंकण्यासारखी निश्चितच धावसंख्या नाही पण निश्चितपणे हि लढाऊ धावसंख्या आहे. आपण जर लढा दिला तर निश्चितच आपला संघ जिंकेल." भारतीय गोलंदाजांनी वातावरण आणि खेळपट्टीचा व्यवस्थितरित्या फायदा घेतला व आपल्या गोलंदाजीने वेस्ट इंडिजच्या उत्कृष्ठ फलंदाजीचा ५२ षटकात १४० धावात अंत केला. भारताने वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव केला आणि क्रिकेट इतिहासातील एक जबरदस्त आकर्षक विजय नोंदवला.
मोहिंदर अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. एक लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे व्हिवियन रिचर्डसचा कपिल देवने २० यार्ड उलटा पळत जाऊन झेल घेतला. रिचर्डस आउट झाला तेव्हा त्याने २८ चेंडूत ३३ धावा झोडपल्या होत्या. त्याच्या ह्या धावा वेस्ट इंडिज संघासाठी सर्वोच्च ठरल्या होत्या. मोहिंदर अमरनाथ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सात षटकात फक्त १२ धावा देत ३ गडी बाद केले. त्याच्या अष्टपैलू खेळीने परत एकदा त्याला 'मॅन ऑफ द मॅच' घोषित केले.
सर्व खेळाडूंच्या प्रयत्नाने व सांघिक खेळीमुळे भारतीय संघाला हा विजय मिळवणे सोपे गेले. म्हणूनच हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.
No comments:
Post a Comment