Saturday, January 26, 2019

अवीट गोडीचे गाणे -- आला आला वारा संगे पावसाच्या धारा


अवीट गोडीचे गाणे -- आला आला वारा संगे पावसाच्या धारा 

          हे गाणे "हा खेळ सावल्यांचा" या चित्रपटातील आहे. या गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले असून सुधीर मोघे यांनी हे गीत लिहिले आहे. या गीताला स्वर अनुराधा पौडवाल व आशा भोसले यांचा लाभला आहे. हे गीत आशा काळे यांच्यावर चित्रित झाले आहे. नायिका आशा काळे व तिच्या मैत्रिणी भाताच्या शेतात काम करत असताना हे गीत म्हणतात. 


आला आला वारा संगे पावसाच्या धारा 
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा 
सया निघाल्या सासुरा ।। धृ ।।

नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप 
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप 
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा 
सया निघाल्या सासुरा ।। १ ।।

आजवरी यांना किती जपलं जपलं 
काळजाचं पाणी किती शिंपलं शिंपलं 
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा 
सया निघाल्या सासुरा ।। २ ।।

येगळी माती आता ग येगळी दुनिया 
आभाळाची माया बाई करील किमया 
फुललं बाई पावसानं मुलुख ग सारा 
सया निघाल्या सासुरा ।। ३ ।।

आला आला वारा संगे पावसाच्या धारा 
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा 
सया निघाल्या सासुरा ।। 

गीत - सुधीर मोघे 
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर 
स्वर - अनुराधा पौडवाल 
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा 














भक्ती व आनंदाचा सागर -- शेगाव




भक्ती व आनंदाचा सागर -- शेगाव 

          दर वर्षी आम्ही सहकुटुंब दिवाळीत एखाद्या तरी ट्रीपला जातोच. या वेळी आम्हाला गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला जायचा योग जुळून आला. 
            शेगावमध्ये आम्हाला गजानन महाराजांच्या दर्शनाबरोबच प्रकर्षाने जाणवले ते तेथील स्वच्छता, टापटीपपणा व शिस्तबद्धपणा ! मंदिर, भक्ती निवासमध्ये इतकी स्वच्छता होती, कि कागदाचा कचरा पडलेला कुठे दिसलाच नाही. तेथील सेवक खाली पडलेला कागदाचा कचरा लगेच उचलून टाकायचे. दर्शनाची रांगसुद्धा शिस्तबद्धपणे चालायची. कुठे गडबड नाही, कि गोंधळ नाही. रांगेत ठिकठिकाणी भक्तांसाठी पाणी पिण्याची सोय केली आहे. महाप्रसाद घेतानाही शिस्तपणा होता. जेवताना सेवक काही न बोलता पुढे येऊन उभा राहायचा. त्याच्या हातात एक पाटी असायची. त्या पाटीवर "अन्न हे पूर्णब्रह्म" व "ताटात अन्न उष्टे टाकू नये" अशी वाक्ये लिहिलेली असायची. त्या पाटीवरील वाक्ये बरेच काही सांगून जायची. त्यामुळे ताटात अन्न टाकायला मन धजवायचे नाही. 
            भक्त निवास व आनंदसागरमध्ये नाष्टा, भोजनाची उत्तम व सर्व भक्तांच्या खिशाला परवडणारी अशी सोय केली आहे. त्यामुळे कुठलाही भक्त उपाशी न राहता पोटभर जेवू शकतो. भक्त निवासपासून आनंदसागरपर्यंत गजानन महाराज संस्थानची विनामूल्य बससेवा उपलब्ध आहे. आनंदसागरसुद्धा बघण्यासारखे आहे. 
            आनंदसागरमध्ये प्रवेश करतानाच गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुलसीदास, स्वामी रामतीर्थ, महावीर, संत मीराबाई आदी संतांचे पुतळे लक्ष वेधून घेतात. पुतळ्याखाली त्यांचे विचार लिहिलेले आहेत. तिथे लहान मुलांसाठी बालोद्यान आहे. ट्रेनमधून संपूर्ण आनंदसागरला फेरफटका मारून आणला जातो. सुंदर आकर्षित असे शिवाचे मंदिर आहे. झुलता पूल आहे. द्वारका बेट आहे. द्वारका बेटमध्ये राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आहे, तसेच श्रीकृष्णाने केलेला कालिया मर्दनाचा पुतळा आहे. येथे ध्यान केंद्र असून, त्यात स्वामी विवेकानंदांची भव्य मूर्ती आहे. मूर्तीखाली ध्यान करण्यासाठी एक खोली आहे. त्या खोलीत इतकी शांतता असते कि, टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल. बरेच भक्त खोलीत ध्यान करीत बसलेले असतात. आनंदसागरमधील संपूर्ण वातावरण मनाला आनंद देणारे व उल्हासित करणारे आहे. तिथे गेले कि संपूर्ण थकवा पळून जातो. संपूर्ण दिवस कसा गेला ते कळतही नाही. शेगावमध्ये गजानन महाराजांचे दर्शन होते, त्याचबरोबर आनंदसागरमध्ये मनाला शांतता, प्रसन्नता लाभते. सर्व चिंता दूर होतात. म्हणजे शेगाव हे भक्ती व आनंदाचा सागर आहे. तिथे एकदा गेले तरी मनाचे समाधान होत नाही. परत परत जावेसे वाटते. 




आनंदसागरचे प्रवेशद्वार 


ध्यान केंद्र येथे स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे 




राधा कृष्ण मूर्ती 



संतांचे पुतळे 



रंगीत पाण्याचे मनमोहक कारंजे 





Friday, January 25, 2019

अवीट गोडीचे गाणे -- सूर तेच छेडीता गीत उमटले नवे



अवीट गोडीचे गाणे -- सूर तेच छेडीता गीत उमटले नवे 

          हे गाणे अपराध या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले. या चित्रपटात रमेश देव व सीमा देव यांनी मुख्य भूमिका निभावल्या. या चित्रपटात काही सुंदर गीते आहेत. त्यातीलच हे एक गीत आहे. हे गीत मधुसूदन कालेलकर यांनी लिहिले असून या गीताला संगीत एन. दत्ता यांनी दिले आहे. या गीताला महेंद्र कपूर यांचा स्वर लाभला आहे. हे गाणे रमेश देव यांच्यावर चित्रित झाले आहे. 

सूर तेच छेडीता गीत उमटले नवे

आज लाभले सखी सौख्य जे मला हवे

अबोल प्रीत बहरली काळी हळूच उमलली
वेदना सुखावली हासली तुझ्यासवे

 
सूर तेच छेडीता गीत उमटले नवे

एकटा कधी स्मृती तुझ्याच या सभोवती
बोललो कसे किती शब्द शब्द आठवे

सूर तेच छेडीता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
सूर तेच छेडीता
......






Saturday, January 19, 2019

मराठी कविता -- ।। मीरा ।।



मराठी कविता -- ।। मीरा ।।

मी आहे मीरा अजून मूर्तिरूपात स्थित,
गाते भजन, करते स्मरण श्रीकृष्णा ।। १ ।।

नाही मी मूर्ती एक, नका दुर्लक्षु मला, 
माझा श्रीकृष्णाचा जप अजून असे निरंतर ।। २ ।।

गाते भजन, करते स्मरण,
तहान भूक हरपून ।। ३ ।।

श्रीकृष्णा दे तुझ्याच चरणी जनन,
दे तुझ्याच चरणी मरण ।। ४ ।।

ते जनन, मरण मिळो,
यातच मला नित्य शांती, 
तुझ्याच नामाचे होवो या जगी चिंतन ।। ५ ।।














Saturday, January 12, 2019

बोधकथा -- गर्वाचे घर खाली


बोधकथा -- गर्वाचे घर खाली 

          एकदा भीमाला आपल्या शक्तीचा भलताच गर्व झाला. त्याला असे वाटायला लागले कि या पृथ्वीतलावर माझ्यासारखे शक्तिवान कोणी नाही. मलाच सर्व शक्ती दिलेली आहे. मी एका क्षणार्धात मुळापासून झाडे उपटू शकतो असे त्याला वाटायला लागले. 
          एकदा भीम आपल्याच नादात जंगलातून जात होता. जाता जाता त्याला रस्त्यावर वानर दिसले. वानराने आपली शेपटी रस्त्यामध्ये ठेवून रस्ता अडवला होता. भीमाला ते दिसले. भीम मनातून चिडला व वानराला म्हणाला, "ए वानरा, तू मला ओळखलेले दिसत नाहीस. मी कोण आहे माहित आहे का तुला?" वानराने त्याच्याकडे बघितले व म्हणले, "कोण तू?" यावर भीम चिडला व म्हणाला, "या जगातील सर्वात शक्तिवान भीम. तुझी हि क्षुद्रासारखी शेपटी बाजूला काढ. मला पुढे जाऊ दे." वानर म्हणाले, "अरे बाबा, मी आता थकलोय. माझ्या अंगात शेपटी उचलण्याएवढेही त्राण नाहीत. तूच मला माझी शेपटी बाजूला काढायला मदत कर." त्यावर भीम हसला व म्हणाला, "त्यात काय एवढे? मी मुळापासून झाडे उपटतो. तुझी शेपटी ती केवढीशी. एका क्षणात बाजूला काढतो बघ."
          भीमाने एका हाताने वानराची शेपटी उचलायचा प्रयत्न केला. शेपटी उचललीच जाईना. भीमाने शेपटीला दुसरा हात लावला तरी शेपटी जागची हलेना. भीमाने आपली सर्व शक्ती पणाला लावली तरीही शेपटी जागची हालली नाही. शेवटी भीम थकला व वानराला शरण गेला. 
          भीम वानराला म्हणाला, आजपर्यंत मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. या पृथ्वीतलावर मीच शक्तिवान आहे असा माझा समज झाला होता, तो समज नाहीसा झाला. मी तुला शरण आलो आहे आता तरी तू तुझी शेपटी बाजूला घे. वानराने आपली शेपटी बाजूला घेतली व आपले खरे रूप प्रकट केले. वानराचे मारुतीत रूपांतर झालेले बघून भीम आश्चर्यचकित झाला व त्याने मारुतीला लोटांगण घातले. 











गुणगुणावंस गाणं -- तुला पाहते रे तुला

गुणगुणावंस गाणं -- तुला पाहते रे, तुला पाहते 

           जगाच्या पाठीवर हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक राजा परांजपे होते. या चित्रपटातील सर्व गाणी गाजली. या गाण्यांपैकी हे एक अतिशय सुंदर अवीट गोडीचे गाणे.  या गाण्याचे बोल आहेत ग. दि. माडगूळकर यांचे. या गाण्याला संगीत दिले आहे सुधीर फडके यांनी. या गाण्याला स्वर लाभला आहे आशा भोसले यांचा. हे गाणे सीमा देव व राजा परांजपे यांच्यावर चित्रित झाले आहे . 


तुला पाहते रे, तुला पाहते 
तुझी मूर्त माझ्या उरी राहते 
तुला पाहते रे, तुला पाहते 
जरी आंधळी मी तुला पाहते!

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे 
तुझ्या हसण्याने मनी प्रीत जागे 
तुझ्या गायने मी सुखी नाहते!
तुला पाहते रे, तुला पाहते 
जरी आंधळी मी तुला पाहते!

किती भाग्य या घोर अंधेपणीही 
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही 
उणे लोचनांचे सुखे साहते!
तुला पाहते रे, तुला पाहते 
जरी आंधळी मी तुला पाहते!

कधी भक्त का पाहतो ईश्वराला?
नदी न्याहळी का कधी सागराला?
तिच्यासारखी मी सदा वाहते!

तुला पाहते रे, तुला पाहते 
तुझी मूर्त माझ्या उरी राहते 
तुला पाहते रे, तुला पाहते 
जरी आंधळी मी तुला पाहते!

         












Friday, January 11, 2019

सांघिक खेळामुळे 'विराट' सेनेचा विजय साकार



सांघिक खेळामुळे 'विराट' सेनेचा विजय साकार 

          विराट सेनेने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात २-१ ने पराभव करून 'विराट' अशी ऐतिहासिक कामगिरी केली. ७१ वर्षात कुणाला जमले नाही ते 'विराट' सेनेने करून दाखवले. याचे मुख्य श्रेय जाते ते सांघिक कामगिरीला. या दौऱ्यात पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाचा दोनदा डाव संपवण्याची किमया करून दाखवली. बुमराह, शमी, इशांत शर्मा यांनी गोलंदाजीत सातत्य दाखवले. बुमराहने ४ कसोटीत ३५७ धावा देऊन २१ फलंदाज तंबूत धाडले तर शमीने ४१९ धावात १६ फलंदाज बाद केले. 
          फलंदाजीत सुद्धा चेतेश्वर पुजाराने कमालीचे सातत्य दाखवले. खेळपट्टीवर कसे टिकून राहावे याचा त्याने नवीन फलंदाजांना चांगलाच धडा दिला. त्याने या सिरीज मध्ये ३ शतक व १ अर्धशतक करून ५२१ धावा करून उल्लेखनीय अशी कामगीरी केली. त्याला इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली. ऋषभ पंत, अजिंक्य राहणे, जडेजा, विराट कोहली यांनी चांगली साथ दिली. विराट कोहलीने पर्थवर शतक झळकावले तर ऋषभ पंतने सिडनी कसोटीत शतकी खेळी केली. मयांक अगरवालने तर आपल्या खेळीने चांगलीच छाप पडली. त्याने फलंदाजीत दाखवलेली एकाग्रता व संयम वाखाणण्याजोगा होता. सलामीला येऊन डावाची पायाभरणी कशी करावी हे अगरवालने दाखवून दिले. त्याच्या खेळीने एका सलामीच्या फलंदाजाचा उदय झाला. 
          हा विजय भारतीय खेळाडूंना नक्कीच सुखावणारा आहे. आता विश्वचषक तोंडावर येऊन ठेपलेला आहे. या विजयामुळे भारतीय खेळाडूंना आत्मविश्वास आलेला असेल. या आत्मविश्वासाच्या जोरावरच भारतीय खेळाडूंना विश्वचषक जिंकणे अवघड जाणार नाही. 













Sunday, January 6, 2019

"टेडी बेअर" चा जन्म


क्युट टेडी बेअर 


क्युट टेडी विथ स्मॉल बेबी 

"टेडी बेअर" चा जन्म 

          लहान मुलांना टेडी बेअर या खेळण्याशी खेळायला खूप आवडते. हे खेळणे बघताक्षणीच लहान मुले या खेळण्याच्या प्रेमात पडतात. याच्या आकर्षक दिसण्यामुळे दुकानदारही हि खेळणी दर्शनी भागात लावून ठेवतात कि जेणेकरून अशी खेळणी लहान मुले घेतील. टेडीच्या आकर्षक दिसण्यामुळे टेडी जगभरातल्या लहान मुलांचा लाडका दोस्त झाला. या लाडक्या दोस्ताचा जन्मही मजेशीरपणे झाला. 
          अमेरिकेचे अध्यक्ष थिओडर रुझवेल्ट एकदा आपल्या सहकाऱ्यांबरोबर शिकारीला गेले होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी एक छोटं, काळं अस्वलाचं पिलू आणून त्यांच्यासमोर बांधलं आणि त्यांना मारायला सांगितलं. परंतु रूझवेल्टनी तसे न करता त्या पिलाला आपल्या जवळ बसवून घेतलं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्या गोजिरवाण्या पिलसह रुझवेल्ट यांची बातमी व एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले. त्या व्यंगचित्रावरून मॉरिस मिचटॉम या खेळणी तयार करणाऱ्या व्यक्तीला लहान मुलांसाठी एक खेळणं तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानं मोठया गोल गरगरीत डोळ्यांचं अस्वलाचं चित्र कापडावर काढलं. त्यात कापूस भरून एक आकर्षक अस्वल तयार करून लगेच रुझवेल्ट यांना पाठवून दिलं. रुझवेल्ट यांना हे खेळणं खूप आवडलं व त्यांच्या टोपण नावावरून खेळण्याला 'टेडी' हे नाव मिळालं. आज विविध पुस्तके, वह्या, मुलांचे कार्यक्रमामध्ये 'टेडी बेअर' मनाचे स्थान पटकावून बसला आहे. 


टेडी बेअर 













Saturday, January 5, 2019

गुणगुणावंस गाणं -- नाचनाचुनी अति मी दमले



गुणगुणावंस गाणं -- नाचनाचुनी अति मी दमले 

नाचनाचुनी अति मी दमले 
थकले रे नंदलाला!

निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला 
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला 
उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला 
थकले रे नंदलाला!

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला 
अनय अनीती नुपूर पायी, कुसंगती करताला 
लोभ-प्रलोभन नाणी फेकी मजवर आला-गेला 
थकले रे नंदलाला!

स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा कि आला 
तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला 
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला 
थकले रे नंदलाला! 

          "जगाच्या पाठीवर" या चित्रपटातील हे अतिशय गाजलेले सुंदर गीत आहे. १९६० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजा परांजपे यांनी केले. या चित्रपटात अतिशय गाजलेली अशी सुंदर गाणी आहेत. त्यातीलच हे एक गाणे आहे. ह्या गीताचे बोल ग. दि. माडगूळकर यांचे आहेत. या गीताला संगीत सुधीर फडके यांनी दिलेले आहे. या गीताला आशा भोसले यांचा स्वर लाभलेला आहे. राजा परांजपे व सीमा देव यांच्यावर हे गीत चित्रित झाले आहे. 
               











तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...