भक्ती व आनंदाचा सागर -- शेगाव
दर वर्षी आम्ही सहकुटुंब दिवाळीत एखाद्या तरी ट्रीपला जातोच. या वेळी आम्हाला गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला जायचा योग जुळून आला.
शेगावमध्ये आम्हाला गजानन महाराजांच्या दर्शनाबरोबच प्रकर्षाने जाणवले ते तेथील स्वच्छता, टापटीपपणा व शिस्तबद्धपणा ! मंदिर, भक्ती निवासमध्ये इतकी स्वच्छता होती, कि कागदाचा कचरा पडलेला कुठे दिसलाच नाही. तेथील सेवक खाली पडलेला कागदाचा कचरा लगेच उचलून टाकायचे. दर्शनाची रांगसुद्धा शिस्तबद्धपणे चालायची. कुठे गडबड नाही, कि गोंधळ नाही. रांगेत ठिकठिकाणी भक्तांसाठी पाणी पिण्याची सोय केली आहे. महाप्रसाद घेतानाही शिस्तपणा होता. जेवताना सेवक काही न बोलता पुढे येऊन उभा राहायचा. त्याच्या हातात एक पाटी असायची. त्या पाटीवर "अन्न हे पूर्णब्रह्म" व "ताटात अन्न उष्टे टाकू नये" अशी वाक्ये लिहिलेली असायची. त्या पाटीवरील वाक्ये बरेच काही सांगून जायची. त्यामुळे ताटात अन्न टाकायला मन धजवायचे नाही.
भक्त निवास व आनंदसागरमध्ये नाष्टा, भोजनाची उत्तम व सर्व भक्तांच्या खिशाला परवडणारी अशी सोय केली आहे. त्यामुळे कुठलाही भक्त उपाशी न राहता पोटभर जेवू शकतो. भक्त निवासपासून आनंदसागरपर्यंत गजानन महाराज संस्थानची विनामूल्य बससेवा उपलब्ध आहे. आनंदसागरसुद्धा बघण्यासारखे आहे.
आनंदसागरमध्ये प्रवेश करतानाच गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुलसीदास, स्वामी रामतीर्थ, महावीर, संत मीराबाई आदी संतांचे पुतळे लक्ष वेधून घेतात. पुतळ्याखाली त्यांचे विचार लिहिलेले आहेत. तिथे लहान मुलांसाठी बालोद्यान आहे. ट्रेनमधून संपूर्ण आनंदसागरला फेरफटका मारून आणला जातो. सुंदर आकर्षित असे शिवाचे मंदिर आहे. झुलता पूल आहे. द्वारका बेट आहे. द्वारका बेटमध्ये राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आहे, तसेच श्रीकृष्णाने केलेला कालिया मर्दनाचा पुतळा आहे. येथे ध्यान केंद्र असून, त्यात स्वामी विवेकानंदांची भव्य मूर्ती आहे. मूर्तीखाली ध्यान करण्यासाठी एक खोली आहे. त्या खोलीत इतकी शांतता असते कि, टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल. बरेच भक्त खोलीत ध्यान करीत बसलेले असतात. आनंदसागरमधील संपूर्ण वातावरण मनाला आनंद देणारे व उल्हासित करणारे आहे. तिथे गेले कि संपूर्ण थकवा पळून जातो. संपूर्ण दिवस कसा गेला ते कळतही नाही. शेगावमध्ये गजानन महाराजांचे दर्शन होते, त्याचबरोबर आनंदसागरमध्ये मनाला शांतता, प्रसन्नता लाभते. सर्व चिंता दूर होतात. म्हणजे शेगाव हे भक्ती व आनंदाचा सागर आहे. तिथे एकदा गेले तरी मनाचे समाधान होत नाही. परत परत जावेसे वाटते.
आनंदसागरचे प्रवेशद्वार
ध्यान केंद्र येथे स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे
राधा कृष्ण मूर्ती
संतांचे पुतळे
रंगीत पाण्याचे मनमोहक कारंजे
No comments:
Post a Comment