बोधकथा -- गर्वाचे घर खाली
एकदा भीमाला आपल्या शक्तीचा भलताच गर्व झाला. त्याला असे वाटायला लागले कि या पृथ्वीतलावर माझ्यासारखे शक्तिवान कोणी नाही. मलाच सर्व शक्ती दिलेली आहे. मी एका क्षणार्धात मुळापासून झाडे उपटू शकतो असे त्याला वाटायला लागले.
एकदा भीम आपल्याच नादात जंगलातून जात होता. जाता जाता त्याला रस्त्यावर वानर दिसले. वानराने आपली शेपटी रस्त्यामध्ये ठेवून रस्ता अडवला होता. भीमाला ते दिसले. भीम मनातून चिडला व वानराला म्हणाला, "ए वानरा, तू मला ओळखलेले दिसत नाहीस. मी कोण आहे माहित आहे का तुला?" वानराने त्याच्याकडे बघितले व म्हणले, "कोण तू?" यावर भीम चिडला व म्हणाला, "या जगातील सर्वात शक्तिवान भीम. तुझी हि क्षुद्रासारखी शेपटी बाजूला काढ. मला पुढे जाऊ दे." वानर म्हणाले, "अरे बाबा, मी आता थकलोय. माझ्या अंगात शेपटी उचलण्याएवढेही त्राण नाहीत. तूच मला माझी शेपटी बाजूला काढायला मदत कर." त्यावर भीम हसला व म्हणाला, "त्यात काय एवढे? मी मुळापासून झाडे उपटतो. तुझी शेपटी ती केवढीशी. एका क्षणात बाजूला काढतो बघ."
भीमाने एका हाताने वानराची शेपटी उचलायचा प्रयत्न केला. शेपटी उचललीच जाईना. भीमाने शेपटीला दुसरा हात लावला तरी शेपटी जागची हलेना. भीमाने आपली सर्व शक्ती पणाला लावली तरीही शेपटी जागची हालली नाही. शेवटी भीम थकला व वानराला शरण गेला.
भीम वानराला म्हणाला, आजपर्यंत मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. या पृथ्वीतलावर मीच शक्तिवान आहे असा माझा समज झाला होता, तो समज नाहीसा झाला. मी तुला शरण आलो आहे आता तरी तू तुझी शेपटी बाजूला घे. वानराने आपली शेपटी बाजूला घेतली व आपले खरे रूप प्रकट केले. वानराचे मारुतीत रूपांतर झालेले बघून भीम आश्चर्यचकित झाला व त्याने मारुतीला लोटांगण घातले.
No comments:
Post a Comment