Friday, April 19, 2019

२०१९ च्या विश्वचषकासाठीचा भारतीय संघ


 २०१९ च्या विश्वचषकासाठीचा भारतीय संघ 

           जून २०१९ मध्ये इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १५ खेळाडूंची निवड केली. यात विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांना विश्वचषक स्पर्धेचा व स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे. महेंद्रसिंग धोनी कप्तान असताना भारताने २०११ साली विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. 
               शिखर धवन, रोहित शर्मा, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक यांना विश्वचषक स्पर्धेचा अनुभव आहे. 
               के एल राहुल, विजय शंकर, केदार जाधव, हार्दिक पांडया, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह यांची हि पहिलीच स्पर्धा आहे. 
भारतीय खेळाडू पुढीलप्रमाणे --

 १) विराट कोहली -- कर्णधार -- फलंदाजी
     उजव्या हाताचा फलंदाज 
     सामने खेळले २२७, एकूण धावा १०८४३


  २) रोहित शर्मा -- फलंदाजी
      उजव्या हाताचा फलंदाज 
      सामने खेळले २०६, एकूण धावा ८०१०


३) शिखर धवन -- फलंदाजी
    डाव्या हाताचा फलंदाज 
   सामने खेळले १२८, एकूण धावा ५३५५

 ४) लोकेश राहुल -- फलंदाजी 
    उजव्या हाताचा फलंदाज 
    सामने खेळले १४, एकूण धावा ३४३


५) रवींद्र जडेजा -- अष्टपैलू 
     डावखुरा फलंदाज व डावखुरा फिरकी गोलंदाज 
    सामने खेळले १५१, धावा २०३५, विकेट्स १७४


६) हार्दिक पांडया -- अष्टपैलू 
 उजव्या हाताने फलंदाजी व  मध्यमगती    गोलंदाजी 
  सामने खेळले ४५, धावा ७३१, विकेट्स ४४


७) केदार जाधव -- अष्टपैलू 
    उजव्या हाताने फलंदाजी व ऑफ ब्रेक गोलंदाजी 
    सामने खेळले ५९, धावा ११७४, विकेट्स २७

 

८) विजय शंकर -- अष्टपैलू 
   उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी 
    सामने खेळले ९, धावा १६५, विकेट्स २

९) भुवनेश्वर कुमार -- गोलंदाज 
     मध्यमगती गोलंदाज 
     सामने खेळले १०५, विकेट्स ११८
 
 १०) महंमद शमी -- गोलंदाज 
      मध्यमगती गोलंदाज 
      सामने खेळले ६३, विकेट्स ११३

 ११) जसप्रीत बुमराह -- गोलंदाज 
      मध्यमगती गोलंदाज 
      सामने खेळले ४९, विकेट्स ८५

 १२) कुलदीप यादव -- गोलंदाज 
      डावखुरा चायनामन स्पिन गोलंदाज 
      सामने खेळले ४९, विकेट्स ८५

१३) युझवेन्द्र चहल -- गोलंदाज 
       उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाज 
      सामने खेळले ४१, विकेट्स ५२

 १४) महेंद्रसिंग धोनी -- यष्टीरक्षक व फलंदाज 
      यष्टिरक्षण व उजव्या हाताने फलंदाजी 
      सामने खेळले ३४१, धावा १०५००,
       बळी ४३४ (झेल ३१४, स्टंपिंग १२०)
 
 १५) दिनेश कार्तिक --  यष्टीरक्षक व  फलंदाज 
       यष्टिरक्षण व उजव्या हाताने फलंदाजी 
       सामने खेळले ९१, धावा १७३८,
       बळी ६८ (झेल ६१, स्टंपिंग ७)








































































Thursday, April 18, 2019

१९८३ च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते.


विश्वचषक स्पर्धेचा संघ

१९८३ च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते. 

          भारताने १९८३ साली झालेली इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा  अष्टपैलूत्वाच्या जोरावर जिंकली. त्यावेळी भारताकडे सुनील गावसकर, के. श्रीकांत, संदीप पाटील, मोहिंदर  अमरनाथ, दिलीप वेंगसरकर असे फलंदाज होते तर रॉजर बिन्नी, मदनलाल, बलविंदरसिंग संधू व कपिल देव असे गोलंदाज होते. कपिल देव गोलंदाजी बरोबर फलंदाजीही करायचा. त्याची झिम्बाब्वे विरुद्धची १७५ धावांची खेळी कोण विसरेल? तसेच वेस्ट इंडिज विरुद्ध अंतिम सामन्यात मोहिंदर अमरनाथने २६ धावा केल्या त्याबरोबर ७ षटकात १२ धावा देऊन महत्वपूर्ण ३ गडी बाद केले. याच सामन्यात कपिलदेवने रिचर्ड्सचा उलटा पळत जाऊन घेतलेला झेल अजूनही लक्षात आहे. त्यावेळी भारतीय संघात जिंकण्याची ईर्षा, जिद्द होती. भारतीय संघाकडे एकदिवशीय सामन्यासाठी कोणीही कसलेले फलंदाज किंवा गोलंदाज नव्हते. त्यांच्याकडे होती फक्त 'संघशक्ती'. 
          याच संघशक्तीच्या जोरावर 'विराट' सेनेला आताची विश्वचषक स्पर्धा जिंकायची आहे. स्वतः कोहली चांगला फलंदाज आहे. त्याच्या जोडीला रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी हे फलंदाज तर केदार जाधव, रविंद्र जडेजा , हार्दिक पांडया हे अष्टपैलू खेळाडू आहेत. भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, 'यॉर्कर' बादशहा जसप्रीत बुमराह हे मध्यमगती गोलंदाज आहेत तर कुलदीप यादव व चहल हे फिरकी गोलंदाज आहेत. इंग्लंडच्या वातावरणात भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी निश्चितच चालणार कारण तेथील वातावरणात भुवनेश्वरचे चेंडू चांगले स्विंग होतील. 
          निवड समितीने 'टीम इंडिया' ची निवड करताना अष्टपैलुत्वाला महत्व दिले. टीम इंडियाला आता गरज आहे ती संघशक्तीची. हि शक्ती मिळवून देण्याचे काम कोहली व धोनीला करावयाचे आहे. दोघांनी मिळून रणनीती आखली तरच आपण विश्वचषक स्पर्धा जिंकू शकू. आताच्या निवडलेल्या अनुभवी व अष्टपैलू खेळाडूंमुळे १९८३ च्या विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते. यासाठी भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा!





































 

Saturday, April 13, 2019

कथा विवेकानंदांची -- प्राणीमित्र नरेंद्र

 

कथा विवेकानंदांची -- प्राणीमित्र नरेंद्र 

          नरेंद्र लहान असताना विश्वनाथबाबूंनी त्याला अनेक खेळणी आणून दिली होती. या अजीव वस्तूंबरोबरच जिवंत पशुपक्ष्यांचा सहवास त्याला लाभावा म्हणून घराच्या अंगणातच त्यांनी एक छोटेसे प्राणिसंग्रहालयही केले होते. घरात गाई तर होत्याच. नरेंद्र आणि त्याचे मित्र या प्राणी-मित्रांशी खेळण्यात रमून जायचे. नरेंद्रला गाई अधिक आवडायच्या. तो फुलांच्या माळा करून गायींच्या गळ्यात घालायचा. त्यांची पूजा करायचा. 
          नरेंद्र थोडा मोठा झाल्यावर वडिलांनी त्याला एक घोडा आणून दिला. लहानपणीच नरेंद्र त्यावर बसायला शिकला. 
             पुढे एकदा हिमालयात यात्रा करीत असताना स्वामीजींच्या एका अमेरिकन शिष्याचा घोडा उधळला. स्वराला खाली पाडणार, तोच स्वामीजींनी घोडयाला धरले आणि मग शांत केले. नंतर काही वेळ ते स्वतः त्या घोडयावर बसले. थोडयावेळाने त्यांनी नुकत्याच घोडयावर बसायला शिकलेल्या एका शिष्याला सांगितले, "आता मी खाली उतरतो. तू बैस आता या घोडयावर."
          तो शिष्य घाबरला. स्वामीजी म्हणाले, "भिऊ नकोस, तो आता काही करणार नाही. साधूच्या सहवासात आलेले प्राणीही साधू-वृत्तीचे होतात. ते कोणाला त्रास देत नाहीत." आणि खरोखर तसे घडले. पुढच्या प्रवासात त्या घोडयाने जराही त्रास दिला नाही.












  












 

Friday, April 12, 2019

अवीट गोडीचे गाणे -- राम जन्मला ग सखी -- गीत रामायण



अवीट गोडीचे गाणे -- राम जन्मला ग सखी -- गीत रामायण 

           गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) यांनी एप्रिल १९५५ ते एप्रिल १९५६ या सालात गीत रामायणाची रचना केली. हि रचना करताना त्यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला. पुणे आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर असलेले सीताकांत लाड यांनी गदिमांना गीत रामायणाबद्दल कल्पना सुचवली. गदिमांना हि कल्पना आवडली व त्यांनी 
वाल्मिकी रामायणावरून गीत रामायणाची निर्मिती केली. गीत रामायणाला बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी संगीत दिले तर प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली. 
          गीत रामायणातील गीतांचे प्रसारण पुणे आकाशवाणी केंद्रावरून १ एप्रिल १९५५ या दिवशी म्हणजेच रामनवमीला सुरु होऊन १९ एप्रिल १९५६ या दिवशी म्हणजेच रामनवमीपर्यंत झाले. 'स्वयें श्री रामप्रभू ऐकती' हे पहिले गीत आकाशवाणी, पुणे केंद्राने प्रसारित केले. 
          गीत रामायणात एकूण ५६ गीते आहेत. यातीलच हे एक गीत. हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी संगीत दिले आहे. या गीताला सुधीर फडके यांचा स्वर लाभला आहे. हे गीत ६/५/१९५५ रोजी पुणे आकाशवाणी केंद्रावर प्रथम प्रसारित झाले. आकाशवाणीवर प्रथम प्रसारण करताना सुमन माटे, जानकी अय्यर, कालिंदी केसकर यांनी हे गीत गायले.


चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखी राम जन्मला
 
कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
 
राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
 
पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला
 
वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनी
गेहांतुन राजपथी धावले कुणी
युवतींचा संघ एक गात चालला
 
पुष्पांजली फेकी कुणी, कोणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द, भाषणे

वाद्द्यांचा ताल मात्र जलद वाढला 

विणारव नूपुरांत पार लोपले 
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले 
बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला 

दिग्गजही हलून जरा चित्र पाहती 
गगनांतुन आज नवे रंग पोहती 
मोत्यांचा चूर नभीं भरून राहिला 

बुडुनी जाय नगर सर्व नृत्यगायनीं 
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी 
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला













   



बोधकथा -- चांगले कर्म, वाईट कर्म

बोधकथा -- चांगले कर्म, वाईट कर्म 

          एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते. एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असे व तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे, "तुमचे वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील, आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल." 
           तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतंच काहीतरी म्हणतोय. तिने वैतागून ठरवलं, याला धडा शिकवलाच पाहिजे. तिने त्या चपातीत विष कालवले आणी त्या लंगडया मनुष्याला दयायला निघाली. त्याक्षणी तिला वाटले "हे मी काय करतेय?" असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून लंगडया माणसाला दिली. नेहमीप्रमाणे तो "तुमचे वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील, आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल." असे पुटपुटला आणि चपाती घेऊन निघून गेला. 
          तिचा मुलगा बाहेरगावी होता. ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती. एक दिवस तो अचानक आला. दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटले. कपडे फाटलेले होते. त्याला भूक लागलेली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला, "आई, मी इथे पोहोचलो एका लंगडया बाबांमुळे. मी चक्कर येऊन पडलो होतो. कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते. माझा जीवच गेला असता; पण तेथे लंगडे बाबा आले. मी त्यांना खाण्यासाठी मागितले. त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो म्हणाला रोज मी हीच चपाती खातो, आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे."
          हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता. आता तिला लंगडया बाबाचा अर्थ कळला.













 
          











 

 

Sunday, April 7, 2019

अवीट गोडीचे गाणे -- हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे


अवीट गोडीचे गाणे -- हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 

           हे गीत   'अशी हि बनवाबनवी ' या  चित्रपटातील आहे. हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा वसंत सबनीस यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गीते शांताराम नांदगावकर व सुधीर मोघे यांनी लिहिली असून अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीत दिले आहे.
         'हृदयी वसंत फुलताना' हे अवीट गोडीचे गीत सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर, सुहासिनी यांनी गायले असून अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीत दिले आहे. हे गीत सचिन पिळगावकर , सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, अश्विनी भावे, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुशांत रे, निवेदिता जोशी यांच्यावर चित्रित झाले आहे.

हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे .... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ।। धृ ।।

मोहुनीया ऐसी जाऊ नको,
रोखूनिया मजला पाहू नको,
मोहुनीया ऐसी जाऊ नको,
रोखूनिया मजला पाहू नको,
गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे .... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ।। १ ।।

पाकळी पाकळी उमले,
प्रीत भरलेली हाय हाय... 
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली ...
पाकळी पाकळी उमले,
प्रीत भरलेली हाय हाय... 
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली ... 
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बांधाच्या हे अंतरंग न्हावे... 
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ... ।। २ ।।

मदभारा प्रीतीचा गंध हा 
दे गं मधुवंती हाय हाय... 
रंग तू सोड रे छंद हा तून मजसाठी... 
मदभारा प्रीतीचा गंध हा 
दे गं मधुवंती हाय हाय... 
रंग तू सोड रे छंद हा तून मजसाठी... 
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा.. 
हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा... 
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे..
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे 
प्रेमात रंग भरताना, दुनियेस का लढावे .... 
हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे ।। ३ ।।



























Saturday, April 6, 2019

कथा -- अखेर न्याय मिळाला

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
>

कथा 
अखेर न्याय मिळाला
           शेवंता घरातील कामे करीत होती आणि तिला कोरडया उलटया सुरु झाल्या. शेजारीच तिची आई होती. शेवंता उलटया करत असताना आईने बघितले व तिला विचारले, "काय झालं ग शेवंता?" शेवंता म्हणाली, "काही नाही गं आई, थोडं मळमळतंय. बर वाटेल आता." शेवंताने आईला बरे वाटावे म्हणून सांगितले तरी तिचे मन तिला खातच होते. तिची बेचैनी वाढतच होती. मनात उलघाल चालली होती. झाला प्रसंग आईला सांगू कि नको असे तिला वाटत होते. तो प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागला आणि ती आणखीनच घाबरीघुबरी झाली. 
          शेवंता १६ वर्षाची पोर. नुकतीच तारुण्यात प्रवेश करती झाली. कळीचे सुंदर फुलात रूपांतर होऊ लागले होते. फुलाकडे आपोआपच भुंगे आकर्षित होतात तसेच तिच्याकडे गावातील पोरं आकर्षित होऊ लागली होती. तिच्या तारुण्यावर पोरं भाळत होती. तिच्यावर जीव ओवाळून टाकत होती. शेवंतालाही हा बदल जाणवत होता. तिलाही तारुण्याची चाहूल लागली होती. आपल्या उभारत्या शरीराकडे गावातील पोरं बघतात हे तिलाही जाणवू लागले होते. म्हणून ती आता सगळीकडे सावधपणाने वावरत होती; तरीही काही टारगट मुले तिचा पाठलाग करत होती. तिला उद्देशून नाही नाही ते बोलत होती. ती मान खाली घालून जात-येत होती. अशीच एके दिवशी ती रस्त्यावरून जात असताना तिच्या मागून दोन मुले तिचा पाठलाग करीत होती. तिने त्या मुलांकडे बघितले आणि घाबरून चालण्याचा वेग वाढवला. तिने चालण्याचा वाढवलेला वेग बघून मुलांनी अजूनच वेग वाढवला आणि तिच्याजवळ आली. एकाने तिला अडवले. ती अजूनच घाबरली. तरीही धारिष्टय करून तिने विचारलेच, "कोण तुम्ही? काय पायजे तुम्हाला?"
          दोन मुले तिच्याकडे बघून विचकट हासली. त्यांच्या नजरेत वासना दिसत होती. एकजण तिच्या शरीराकडे वासनेने बघत म्हणाला, "तु पायजेस." असे म्हणून तिचा हात पकडला. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु तिचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्या वासनांध मुलांच्या तावडीत ती चांगलीच सापडली. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला; पण त्या निर्जन जागी तिचा आवाज ऐकणार कोण? ती ओरडत होती आणि दोन नराधम तिच्यावर अत्याचार करत होते, तिच्या अंगाचे लचके तोडत होते. एका उमलत्या फुलाला कुस्करून टाकत होते. त्यांनी त्यांची आग शांत केली आणि पळून गेले. शेवंता तिथेच विव्हळत पडली होती. एकटीच. 
          झाला प्रसंग तिने आईला सांगितला तशी आईच्या पायाखालची जमीनच सरकली. धरणी दुभंगून धरणीत जावे असे आईला वाटू लागले. आईने शेवंताला जवळ घेतले. शेवंतासुद्धा आईला बिलगली आणि हमसून हमसून रडू लागली. पोरीच्या मागे आता खंबीरपणे उभे राहिला पाहिजे असे आईला वाटू लागले. 
  शेवंता पोटुशी असल्याची बातमी गावभर झाली. सगळीकडे तीच चर्चा होऊ लागली. पारावर बसून गावातील माणसे चर्चा करत होती. त्यातील एकजण म्हणाला, "आरं! ती हणम्याची शेवंता हाय नव्ह, ती म्हणं पोटुशी हाय." दुसरा म्हणाला, "म्यापन ऐकलंय. आर कसं झालं असलं? तीचं अजून लगीनपन झालं नाय." तिसरा म्हणाला, "खरंय गड्या, म्या तर त्या दोघीना डाक्टरकडं जाताना बघितलंय." चौथा म्हणाला, "पंचायत बसवून हनमाला याचा जाब विचाराय हवा." यावर सगळ्यांचे एकमत झाले व पंचायत बसवायची ठरली. 
          सरपंच, पाटील, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पंचायतीसाठी हजर राहिले. हनमा, शेवंता व तिच्या आईला बोलावणे पाठवले. तिघे आल्यावर पंचायतीला सुरवात झाली. सरपंच हनमाला म्हणाले, "गावात चर्चा हाय कि, तुझी पोरगी पोटुशी हाय. खरं हाय का?" हनमा म्हणाला, "व्हय जी!" सरपंच म्हणाले, "तीच अजून लगीन झालं नाय तरी पोटूशी राहिली." यावर हनमा म्हणाला, "पर तिची कायबी चूक नाय." शेवंताची आई म्हणाली, "आवो, माझ्या पोरीनं काय केलं नाय. दोन पोरांनी तीच वाटुळ केलं. माझी पोरगी कधी वावगं वागनार नाय वो." शेवंताची आई पोटतिडकीनं सांगत होती. सरपंच शेवंताकडे बघून म्हणाले, "पोरी, तुझ्यावर कोणी अत्याचार केला असल त्याच नाव सांग." शेवंता नुसती रडू लागली. 
          शेवंता काहीच उत्तर देत नाही म्हणल्यावर सरपंच म्हणाले, "हनमा, पोरगी कायच बोलत नाय. चूक कुनाची काय कळंना. आजपातूर गावात असं कधी झालं नाय. लगीन न होता पोटात प्वार ठेवणं म्हणजे पापच. हे पाप तुझ्या पोरीनं केलं. यावर पंचायतीनं असा फैसला घेतला कि, गावकऱ्यांनी तुमच्याशी संबंध ठेवायचे नाहीत." असे म्हणून पंचायत उठली. पंचायतीचा हा निर्णय ऐकून हनमाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या पायातील बळ गेले. शेवंता आणि आईतर हमसून हमसून रडू लागल्या. 
          सर्वच गावकऱ्यांनी हनमा व त्याच्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडून टाकले. त्यांच्याशी कोणी नीट बोलेना. त्यांना समाजात मिसळून घेईनासे झाले. खरे तर काहीही चूक नसताना हनमाच्या कुटुंबाला भोग भोगायला लागत होते. शेवंता आपल्या कुटुंबाची चाललेली परवड उघडया डोळ्यांनी पहात होती. तिच्याकडे सर्वजण कुत्सितपणे बघत होते. तिला टोमणे मारत होते, घालून-पाडून बोलत होते. संशयीत नजरेने तिच्याकडे पहात होते. तिचे जगणेच मुश्किल करून टाकले होते. कधी कधी तिला आपले जीवनच संपवावेसे वाटत होते पण आई व बापाकडे बघून ती गप्प बसत होती. 
           आई- बापाला शेवंताची तगमग बघवत नव्हती. शेवंताला न्याय मिळाला पाहिजे व त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे असे शेवंताच्या आईला वाटू लागले. एकेदिवशी आई शेवंताला म्हणाली, "पोरी! काळजी करू नगस. तुझ्यावर ज्यांनी अन्याव केला त्यांना शिक्षा व्हनारच. तुझी आय आता गप बसणार नाय. माझ्या पोटच्या गोळ्याचं वाटूळ केलं त्यांना आता सोडणार नाय."
          दुसऱ्या दिवशी शेवंता व तिची आई तालुक्याला गेले. तिथे जाऊन पोलिसांना भेटले. शेवंताने झालेला सगळा प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी रितसर तक्रार नोंदवून घेतली. शेवंताला काही प्रश्न विचारले. मुलांबद्दल माहिती विचारली. शेवंताने मुलांबद्दल जुजबी माहिती दिली. पोलिसांनी माहितीची नोंद घेतली व शेवंता व तिच्या आईला म्हणाले, "तुम्ही आता निर्धास्त रहा. आम्ही लवकरच त्या नराधमांना पकडू. तुमच्या मुलीला लवकरच न्याय मिळवून देऊ." असे म्हणून पोलिसांनी हवालदारांना त्या दोन नराधमांचा तपास करण्याचे आदेश दिले. "लय उपकार व्हतील सायब." असे शेवंताची आई म्हणाली व दोघीनी पोलिसांचे आभार मानले. 
          पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्या दोन नराधमांना शोधून काढले व शेवंता आणि तिच्या आईला निरोप पाठवला. शेवंताने त्या दोघांना ओळखले. "ह्यांनीच माझी अब्रू लुटली." असे म्हणून शेवंता आईच्या कुशीत जाऊन रडू लागली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवला व शेवंतावर अत्याचार केल्याचे दोघांकडून काबुल करून घेतले. दोघांना पोलीस कोठडी मिळाली. 
          शेवंताच्या आईने दाखवलेल्या धारिष्टयामुळे व पोलिसांच्या तत्परतेमुळे निष्पाप शेवंताला न्याय मिळाला.


तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...