Saturday, April 6, 2019

कथा -- अखेर न्याय मिळाला

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
>

कथा 
अखेर न्याय मिळाला
           शेवंता घरातील कामे करीत होती आणि तिला कोरडया उलटया सुरु झाल्या. शेजारीच तिची आई होती. शेवंता उलटया करत असताना आईने बघितले व तिला विचारले, "काय झालं ग शेवंता?" शेवंता म्हणाली, "काही नाही गं आई, थोडं मळमळतंय. बर वाटेल आता." शेवंताने आईला बरे वाटावे म्हणून सांगितले तरी तिचे मन तिला खातच होते. तिची बेचैनी वाढतच होती. मनात उलघाल चालली होती. झाला प्रसंग आईला सांगू कि नको असे तिला वाटत होते. तो प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागला आणि ती आणखीनच घाबरीघुबरी झाली. 
          शेवंता १६ वर्षाची पोर. नुकतीच तारुण्यात प्रवेश करती झाली. कळीचे सुंदर फुलात रूपांतर होऊ लागले होते. फुलाकडे आपोआपच भुंगे आकर्षित होतात तसेच तिच्याकडे गावातील पोरं आकर्षित होऊ लागली होती. तिच्या तारुण्यावर पोरं भाळत होती. तिच्यावर जीव ओवाळून टाकत होती. शेवंतालाही हा बदल जाणवत होता. तिलाही तारुण्याची चाहूल लागली होती. आपल्या उभारत्या शरीराकडे गावातील पोरं बघतात हे तिलाही जाणवू लागले होते. म्हणून ती आता सगळीकडे सावधपणाने वावरत होती; तरीही काही टारगट मुले तिचा पाठलाग करत होती. तिला उद्देशून नाही नाही ते बोलत होती. ती मान खाली घालून जात-येत होती. अशीच एके दिवशी ती रस्त्यावरून जात असताना तिच्या मागून दोन मुले तिचा पाठलाग करीत होती. तिने त्या मुलांकडे बघितले आणि घाबरून चालण्याचा वेग वाढवला. तिने चालण्याचा वाढवलेला वेग बघून मुलांनी अजूनच वेग वाढवला आणि तिच्याजवळ आली. एकाने तिला अडवले. ती अजूनच घाबरली. तरीही धारिष्टय करून तिने विचारलेच, "कोण तुम्ही? काय पायजे तुम्हाला?"
          दोन मुले तिच्याकडे बघून विचकट हासली. त्यांच्या नजरेत वासना दिसत होती. एकजण तिच्या शरीराकडे वासनेने बघत म्हणाला, "तु पायजेस." असे म्हणून तिचा हात पकडला. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु तिचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्या वासनांध मुलांच्या तावडीत ती चांगलीच सापडली. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला; पण त्या निर्जन जागी तिचा आवाज ऐकणार कोण? ती ओरडत होती आणि दोन नराधम तिच्यावर अत्याचार करत होते, तिच्या अंगाचे लचके तोडत होते. एका उमलत्या फुलाला कुस्करून टाकत होते. त्यांनी त्यांची आग शांत केली आणि पळून गेले. शेवंता तिथेच विव्हळत पडली होती. एकटीच. 
          झाला प्रसंग तिने आईला सांगितला तशी आईच्या पायाखालची जमीनच सरकली. धरणी दुभंगून धरणीत जावे असे आईला वाटू लागले. आईने शेवंताला जवळ घेतले. शेवंतासुद्धा आईला बिलगली आणि हमसून हमसून रडू लागली. पोरीच्या मागे आता खंबीरपणे उभे राहिला पाहिजे असे आईला वाटू लागले. 
  शेवंता पोटुशी असल्याची बातमी गावभर झाली. सगळीकडे तीच चर्चा होऊ लागली. पारावर बसून गावातील माणसे चर्चा करत होती. त्यातील एकजण म्हणाला, "आरं! ती हणम्याची शेवंता हाय नव्ह, ती म्हणं पोटुशी हाय." दुसरा म्हणाला, "म्यापन ऐकलंय. आर कसं झालं असलं? तीचं अजून लगीनपन झालं नाय." तिसरा म्हणाला, "खरंय गड्या, म्या तर त्या दोघीना डाक्टरकडं जाताना बघितलंय." चौथा म्हणाला, "पंचायत बसवून हनमाला याचा जाब विचाराय हवा." यावर सगळ्यांचे एकमत झाले व पंचायत बसवायची ठरली. 
          सरपंच, पाटील, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पंचायतीसाठी हजर राहिले. हनमा, शेवंता व तिच्या आईला बोलावणे पाठवले. तिघे आल्यावर पंचायतीला सुरवात झाली. सरपंच हनमाला म्हणाले, "गावात चर्चा हाय कि, तुझी पोरगी पोटुशी हाय. खरं हाय का?" हनमा म्हणाला, "व्हय जी!" सरपंच म्हणाले, "तीच अजून लगीन झालं नाय तरी पोटूशी राहिली." यावर हनमा म्हणाला, "पर तिची कायबी चूक नाय." शेवंताची आई म्हणाली, "आवो, माझ्या पोरीनं काय केलं नाय. दोन पोरांनी तीच वाटुळ केलं. माझी पोरगी कधी वावगं वागनार नाय वो." शेवंताची आई पोटतिडकीनं सांगत होती. सरपंच शेवंताकडे बघून म्हणाले, "पोरी, तुझ्यावर कोणी अत्याचार केला असल त्याच नाव सांग." शेवंता नुसती रडू लागली. 
          शेवंता काहीच उत्तर देत नाही म्हणल्यावर सरपंच म्हणाले, "हनमा, पोरगी कायच बोलत नाय. चूक कुनाची काय कळंना. आजपातूर गावात असं कधी झालं नाय. लगीन न होता पोटात प्वार ठेवणं म्हणजे पापच. हे पाप तुझ्या पोरीनं केलं. यावर पंचायतीनं असा फैसला घेतला कि, गावकऱ्यांनी तुमच्याशी संबंध ठेवायचे नाहीत." असे म्हणून पंचायत उठली. पंचायतीचा हा निर्णय ऐकून हनमाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या पायातील बळ गेले. शेवंता आणि आईतर हमसून हमसून रडू लागल्या. 
          सर्वच गावकऱ्यांनी हनमा व त्याच्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडून टाकले. त्यांच्याशी कोणी नीट बोलेना. त्यांना समाजात मिसळून घेईनासे झाले. खरे तर काहीही चूक नसताना हनमाच्या कुटुंबाला भोग भोगायला लागत होते. शेवंता आपल्या कुटुंबाची चाललेली परवड उघडया डोळ्यांनी पहात होती. तिच्याकडे सर्वजण कुत्सितपणे बघत होते. तिला टोमणे मारत होते, घालून-पाडून बोलत होते. संशयीत नजरेने तिच्याकडे पहात होते. तिचे जगणेच मुश्किल करून टाकले होते. कधी कधी तिला आपले जीवनच संपवावेसे वाटत होते पण आई व बापाकडे बघून ती गप्प बसत होती. 
           आई- बापाला शेवंताची तगमग बघवत नव्हती. शेवंताला न्याय मिळाला पाहिजे व त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे असे शेवंताच्या आईला वाटू लागले. एकेदिवशी आई शेवंताला म्हणाली, "पोरी! काळजी करू नगस. तुझ्यावर ज्यांनी अन्याव केला त्यांना शिक्षा व्हनारच. तुझी आय आता गप बसणार नाय. माझ्या पोटच्या गोळ्याचं वाटूळ केलं त्यांना आता सोडणार नाय."
          दुसऱ्या दिवशी शेवंता व तिची आई तालुक्याला गेले. तिथे जाऊन पोलिसांना भेटले. शेवंताने झालेला सगळा प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी रितसर तक्रार नोंदवून घेतली. शेवंताला काही प्रश्न विचारले. मुलांबद्दल माहिती विचारली. शेवंताने मुलांबद्दल जुजबी माहिती दिली. पोलिसांनी माहितीची नोंद घेतली व शेवंता व तिच्या आईला म्हणाले, "तुम्ही आता निर्धास्त रहा. आम्ही लवकरच त्या नराधमांना पकडू. तुमच्या मुलीला लवकरच न्याय मिळवून देऊ." असे म्हणून पोलिसांनी हवालदारांना त्या दोन नराधमांचा तपास करण्याचे आदेश दिले. "लय उपकार व्हतील सायब." असे शेवंताची आई म्हणाली व दोघीनी पोलिसांचे आभार मानले. 
          पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्या दोन नराधमांना शोधून काढले व शेवंता आणि तिच्या आईला निरोप पाठवला. शेवंताने त्या दोघांना ओळखले. "ह्यांनीच माझी अब्रू लुटली." असे म्हणून शेवंता आईच्या कुशीत जाऊन रडू लागली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवला व शेवंतावर अत्याचार केल्याचे दोघांकडून काबुल करून घेतले. दोघांना पोलीस कोठडी मिळाली. 
          शेवंताच्या आईने दाखवलेल्या धारिष्टयामुळे व पोलिसांच्या तत्परतेमुळे निष्पाप शेवंताला न्याय मिळाला.


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...