Friday, April 12, 2019

अवीट गोडीचे गाणे -- राम जन्मला ग सखी -- गीत रामायण



अवीट गोडीचे गाणे -- राम जन्मला ग सखी -- गीत रामायण 

           गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) यांनी एप्रिल १९५५ ते एप्रिल १९५६ या सालात गीत रामायणाची रचना केली. हि रचना करताना त्यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला. पुणे आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर असलेले सीताकांत लाड यांनी गदिमांना गीत रामायणाबद्दल कल्पना सुचवली. गदिमांना हि कल्पना आवडली व त्यांनी 
वाल्मिकी रामायणावरून गीत रामायणाची निर्मिती केली. गीत रामायणाला बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी संगीत दिले तर प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली. 
          गीत रामायणातील गीतांचे प्रसारण पुणे आकाशवाणी केंद्रावरून १ एप्रिल १९५५ या दिवशी म्हणजेच रामनवमीला सुरु होऊन १९ एप्रिल १९५६ या दिवशी म्हणजेच रामनवमीपर्यंत झाले. 'स्वयें श्री रामप्रभू ऐकती' हे पहिले गीत आकाशवाणी, पुणे केंद्राने प्रसारित केले. 
          गीत रामायणात एकूण ५६ गीते आहेत. यातीलच हे एक गीत. हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी संगीत दिले आहे. या गीताला सुधीर फडके यांचा स्वर लाभला आहे. हे गीत ६/५/१९५५ रोजी पुणे आकाशवाणी केंद्रावर प्रथम प्रसारित झाले. आकाशवाणीवर प्रथम प्रसारण करताना सुमन माटे, जानकी अय्यर, कालिंदी केसकर यांनी हे गीत गायले.


चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखी राम जन्मला
 
कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
 
राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
 
पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला
 
वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनी
गेहांतुन राजपथी धावले कुणी
युवतींचा संघ एक गात चालला
 
पुष्पांजली फेकी कुणी, कोणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द, भाषणे

वाद्द्यांचा ताल मात्र जलद वाढला 

विणारव नूपुरांत पार लोपले 
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले 
बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला 

दिग्गजही हलून जरा चित्र पाहती 
गगनांतुन आज नवे रंग पोहती 
मोत्यांचा चूर नभीं भरून राहिला 

बुडुनी जाय नगर सर्व नृत्यगायनीं 
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी 
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला













   



No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...