विश्वचषक स्पर्धेचा संघ
१९८३ च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते.
भारताने १९८३ साली झालेली इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा अष्टपैलूत्वाच्या जोरावर जिंकली. त्यावेळी भारताकडे सुनील गावसकर, के. श्रीकांत, संदीप पाटील, मोहिंदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर असे फलंदाज होते तर रॉजर बिन्नी, मदनलाल, बलविंदरसिंग संधू व कपिल देव असे गोलंदाज होते. कपिल देव गोलंदाजी बरोबर फलंदाजीही करायचा. त्याची झिम्बाब्वे विरुद्धची १७५ धावांची खेळी कोण विसरेल? तसेच वेस्ट इंडिज विरुद्ध अंतिम सामन्यात मोहिंदर अमरनाथने २६ धावा केल्या त्याबरोबर ७ षटकात १२ धावा देऊन महत्वपूर्ण ३ गडी बाद केले. याच सामन्यात कपिलदेवने रिचर्ड्सचा उलटा पळत जाऊन घेतलेला झेल अजूनही लक्षात आहे. त्यावेळी भारतीय संघात जिंकण्याची ईर्षा, जिद्द होती. भारतीय संघाकडे एकदिवशीय सामन्यासाठी कोणीही कसलेले फलंदाज किंवा गोलंदाज नव्हते. त्यांच्याकडे होती फक्त 'संघशक्ती'.
याच संघशक्तीच्या जोरावर 'विराट' सेनेला आताची विश्वचषक स्पर्धा जिंकायची आहे. स्वतः कोहली चांगला फलंदाज आहे. त्याच्या जोडीला रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी हे फलंदाज तर केदार जाधव, रविंद्र जडेजा , हार्दिक पांडया हे अष्टपैलू खेळाडू आहेत. भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, 'यॉर्कर' बादशहा जसप्रीत बुमराह हे मध्यमगती गोलंदाज आहेत तर कुलदीप यादव व चहल हे फिरकी गोलंदाज आहेत. इंग्लंडच्या वातावरणात भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी निश्चितच चालणार कारण तेथील वातावरणात भुवनेश्वरचे चेंडू चांगले स्विंग होतील.
निवड समितीने 'टीम इंडिया' ची निवड करताना अष्टपैलुत्वाला महत्व दिले. टीम इंडियाला आता गरज आहे ती संघशक्तीची. हि शक्ती मिळवून देण्याचे काम कोहली व धोनीला करावयाचे आहे. दोघांनी मिळून रणनीती आखली तरच आपण विश्वचषक स्पर्धा जिंकू शकू. आताच्या निवडलेल्या अनुभवी व अष्टपैलू खेळाडूंमुळे १९८३ च्या विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते. यासाठी भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment