Saturday, August 31, 2019

भारताच्या "सुवर्ण" कन्या, पी. व्ही. सिंधू व मानसी जोशी


पी. व्ही. सिंधू व मानसी जोशी
भारताच्या "सुवर्ण" कन्या, पी. व्ही. सिंधू व मानसी जोशी 

               पी व्ही सिंधू आणि मानसी जोशीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतीय क्रीडाविश्वात आपले नाव कोरले. दोघीनी स्पर्धा जिंकून आपल्या देशाची मान उंचावली आहे. पी व्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकून बॅडमिंटनमधील जागतिक विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ऑलम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने जागतिक स्पर्धेचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या नोजोमी आकूहीरा हिला ३८ मिनिटाच्या खेळात २१-७ आणि २१-७ अशा दोन सेटमध्ये पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली. 
                  सिंधू ऐतिहासिक कामगिरी करत असताना त्याच दिवशी आणखी एका भारतीय महिलेने बॅडमिंटनमध्ये जागतिक विजेतेपद जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. या महिलेचे नाव आहे मानसी जोशी. स्विजरलँडमधील बेसल येथे झालेल्या स्पर्धेत मानसी पारुल परमार हिच्याशी लढली होती. अपंग असलेल्या मानसीला एक पाय नसताना त्या ठिकाणी कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे. ३० वर्षीय मानसीच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यात तिने आपला पाय गमावला. तरीही तिने हार न मानता कष्टाच्या जोरावर उभी राहिली व जागतिक विजेतेपदाचे ध्येय साध्य केले. 
                    बॅडमिंटनच्या जागतिक स्पर्धेत सिंघू सहावेळा सहभागी झाली त्यातील पाच स्पर्धेत तिने पदके पटकावली. २०१३ साली कांस्य पदक, २०१४ साली कांस्य पदक, २०१७ साली रौप्य पदक, २०१८ साली रौप्य पदक, २०१९ साली सुवर्ण पदक. अशी पदके पटकावून तिने जागतिक स्पर्धेत आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. सिंधू व मानसी जोशी या दोघीही गोपीचंद यांच्या शिष्या आहेत. दोघीनींही सुवर्णपदक जिंकून आपल्या गुरुचे नाव उंचावले आहे.


















 

Saturday, August 24, 2019

भारत इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिका १९७१ -- एक ऐतिहासिक कामगिरी

  भारतीय कप्तान अजित वाडेकर उत्कृष्ठ फटका मारताना 

भागवत चंद्रशेखर - दुसऱ्या डावात ६ बळी घेत विजयात मोलाचा वाटा

 भारत इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिका १९७१ -- एक ऐतिहासिक कामगिरी 

               अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड भूमीवर पहिला कसोटी विजय व मालिका विजय संपादन केला. भारताने ३ कसोटी सामान्यांची मालिका १-० ने जिंकली. लॉर्डसवर खेळवलेली पहिली कसोटी व ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवलेली दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. 
                तिसरा कसोटी सामना १९ - २४ ऑगस्ट १९७१ दरम्यान किंगस्टन ओव्हल मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात चार्ली इलियट व आल्बर्ट रोड्स यांनी पंच म्हणून काम पाहिले.
                 इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना १०८.४ षटकात ३५५ धावा केल्या. जेम्सनने १५२ चेंडूत ८२ धावा केल्या. तो धावचीत झाला. अॅलन नॉटने ११६ चेंडूत ९० धावा केल्या. सोलकरने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन त्याची खेळी संपवली. हटनने १२५ चेंडूत ८१ धावा केल्या. त्याला वेंकटराघवनने त्रिफळाचित केले. भारताकडून एकनाथ सोलकर यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने टिच्चून गोलंदाजी करत १५ षटकात २८ धावा देत ३ गडी बाद केले. 
               भारताची सुरवात खराब झाली. धावफलकावर १७ धावसंख्या असताना अशोक मंकड १० धावा काढून बाद झाला तर ६ धावा काढून सुनील गावस्कर बाद झाला. तेव्हा भारताची धावसंख्या धावफलकावर होती २ बाद २१. नंतर अजित वाडेकर व दिलीप सरदेसाई यांनी डाव सावरला. अजित वाडेकरने ४८ धावा केल्या तर सरदेसाई यांनी ५४ धावा केल्या. सोलकर ४४ धावा, फरुख इंजिनियर ५९ धावा, अबिद अली २६ धावा, वेंकटराघवन २४ धावा यांच्यामुळे भारताने २८४ धावांपर्यंत मजल मारली. इलिंगवर्थने गोलंदाजीचे उत्कृष्ठ प्रदर्शन करीत ३४.३ षटकात ७० धावा देत ५ गडी बाद केले. इंग्लंडला पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळाली. 
               भागवत चंद्रशेखरच्या फिरकी माऱ्यापुढे इंग्लंडचा दुसरा डाव ४५.१ षटकात १०१ धावात गडगडला. त्यांची फलंदाजी चंद्रशेखरच्या फिरकीपुढे टिकू शकली नाही. ब्रायन लुक्खूर्स्टने १११ चेंडूत ३३ धावा केल्या याच इंग्लंडसाठी सर्वोच्च धावा ठरल्या. चंद्रशेखरने आपल्या फिरकीची कमाल दाखवत १८.१ षटकात ३८ धावा देत ६ गडी बाद करत इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. 
               विजयासाठी १७२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने १०१ षटकात ६ गडी गमावत १७४ धावा करून एक ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयात अजित वाडेकरच्या ४५ धावा, दिलीप सरदेसाईंच्या ४० धावा, गुंडाप्पा विश्वनाथच्या ३३ धावा तर फारूक इंजिनियरच्या २८ धावा मोलाच्या ठरल्या. डेरेक अंडरवूडने ३८ षटकात ७२ धावा देत ३ गडी बाद केले. भारताने इंग्लंडचा ४ गडी राखून  पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदविला. या विजयाबरोबरच भारताने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत १-० ने हरवत कसोटी मालिका जिंकत एक  ऐतिहासिक कामगिरी केली.








































Friday, August 23, 2019

चैतन्याचा उत्सव, गणेशोत्सव !

 
चैतन्याचा उत्सव, गणेशोत्सव !

               गणेशोत्सव म्हणले कि, अंगात चैतन्य खुलायला लागते. उत्साह संचारतो. आनंद ओसंडून वाहत राहतो. या उत्सवात एक सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण होते. बाळ-गोपाळांपासून अगदी आबालवृद्धांपर्यंत सर्वच जण आतुरतेने गणेशोत्सवाची वाट बघत असतात. बाप्पा घरी येणार म्हणून आधीपासूनच त्याच्या तयारीला लागलेले असतात. मूर्ती कुठली आणायची यापासून ते बाप्पासमोर कुठली आरास करायची इथपर्यंत घरात चर्चा रंगलेली असते. 
               बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात चालू असते. झांजा, ढोल-ताशांच्या निनादात व ''गणपती बाप्पा मोरया" च्या गजरात बाप्पा घरा-घरात विराजमान होतात. ज्यादिवशी बाप्पा घरात येतात त्या दिवशीचा उत्साह तर काय वर्णावा? सर्व जण मनापासून बाप्पाची सेवा करण्यात मग्न झालेले असतात. बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. आरत्या म्हणाल्या जातात, अथर्वशीर्ष पठण केले जाते. बाप्पाच्या आवडीच्या मोदकाचा नैवद्द दाखवला जातो. बाप्पाची सेवा करण्यात कुठे कमतरता पडत नाही ना याची सर्वजण दक्षता घेत असतात. ज्या दिवशी बाप्पाचे आगमन होते त्यादिवशी घर आनंदाने फुलून गेलेले असते. घरात मंगलमय वातावरण तयार झालेले असते. घरातील सर्व मळभ दूर होऊन घरात चैतन्य पसरलेले असते. त्यादिवशी सर्व दुःख, संकटांचा नाश झालेला असतो व घरात एक प्रकारची सुख, शांती निर्माण झालेली असते. घरात भक्तीपूर्वक वातावरण तयार होते. 
               ज्या दिवशी बाप्पा घरात येतात त्यादिवशी घरात प्रसन्न, निर्मळ वातावरण तयार होते. घरातील अडीअडचणी, संकटे, दुःख यांना आपण थारा न देता सर्वजण बाप्पाची सेवा करण्यात मग्न होतो. आपल्या मनात बाप्पाची प्रतिमा तयार होते. जसे बाप्पा आपल्या घरात विराजमान होतात तसेच ते आपल्या मनातही विराजमान होतात. बाप्पा मनात विराजमान झाले कि काम, क्रोध, मत्सर, माया, लोभ, वासना यांचा नाश होऊन मन पवित्र, निर्मळ होते. मनात सकारात्मक विचार येतात. या दहा दिवसात आपल्यात भक्तीभाव निर्माण होतो. त्यामुळे कुठल्याही वाईट, अनिष्ठ विचारांना आपण थारा देत नाही. 'बाप्पासमोर आपण वाईट वर्तणुक केली तर बाप्पा आपल्याला शिक्षा करेल' अशी भावना आपल्या मनात निर्माण होते त्यामुळे मन आपोआपच चांगल्या वर्तणुकीकडे वळते. 
               'तु सुखकर्ता, तु दुःखहर्ता, तु विघ्नविनाशक मोरया ।' असे आपण गणपतीला म्हणतो. बाप्पा आपल्या भक्तांची दुःखे स्वतः झेलतो, संकटांचे निवारण करतो. भक्तांवर येणारी विघ्ने आपल्या पोटात घेतो व भक्तांना सुखी, समाधानी, आनंदी ठेवतो अशी आपल्या मनात भावना निर्माण झालेली असते. म्हणूनच आपण श्रद्धेने, भक्तिभावाने गणोशोत्सव साजरा करतो.








































Monday, August 19, 2019

अवीट गोडीचे गाणे... अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…..


अवीट गोडीचे गाणे...

अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…..


अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ ||

टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || ||

इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, चालला नामाचा गजर || ||

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर || ||

         आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला आलेले आहेत आणि त्यांच्या मुखात नामाचा म्हणजेच विठ्ठलाचा गजर चालू आहे. या गजराने सर्व पंढरपूर न्हाऊन निघाले आहे. काही ठिकाणी भजन-कीर्तन चालू आहे, टाळ, मृदंग च्या तालात वारकरी नाचत आहेत. टाळ-मृदंगाच्या तालात पंढरी तीर न्हाऊन निघाला आहे. सर्व वारकरी विठ्ठलाच्या नामात दंग झाले आहेत. पांडुरंगाच्या नामाने मंत्रमुग्ध झाले आहेत.
        पंढरपूर हे संतांचे माहेर आहे. सर्व संत-महंत या ठिकाणी येतात.आपले देहभान हरपून विठ्ठलाच्या नामात दंग होतात. वाळवंटात आनंदाने नाचतात. विठ्ठलाच्या दर्शनाने पवित्र, निर्मळ होतात. पंढरपुरात आल्यावर विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर संसारातील चिंता, कटकटी मिटून जातात, इडापिडा टळून जाऊन देहाला सुख, समाधान मिळते, मुक्ती मिळते.
        पंढरपुरात आल्यावर सर्व ठिकाणी विठ्ठलनामाचा गजर चालू असल्याने विठ्ठल असल्याचा भास होतो. जिथेतिथे विठ्ठलच दिसतो. सर्व ठिकाणी सुख-समृध्दीचा महापूर आलेला आहे. 
              हे गीत नाटयगीत या प्रकारात मोडते. हे गीत गोरा कुंभार या नाटकातले आहे. हे गीत अशोकजी परांजपे यांनी लिहिले असून या गीताला पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले आहे. प्रकाश घांग्रेकर व शौनक अभिषेकी यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे.














 

Monday, August 12, 2019

विठो माझा लेकुरवाळा ।


विठो माझा लेकुरवाळा ।

विठो माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ।। १ ।।
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ।। २ ।।
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ।। ३ ।।
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ।। ४ ।।
बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ।। ५ ।।
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।। ६ ।।

                जनाबाईने या अभंगातून लेकुरवाळ्या विठ्ठलाचे दर्शन केले आहे. निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर, मुक्ताई, गोरा कुंभार, चोखा, बंका, नामदेव, जनाबाई हि सर्व संत मंडळी विठ्ठलाची लेकरे होती. विठ्ठल ह्या लेकरांचा आई-बाप झाला होता. आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होता. आई-बाप जसे आपल्या लेकरांची काळजी घेतात त्याप्रमाणे विठ्ठल आपल्या लेकरांची काळजी घेत होता. त्यांच्या संकटाच्या वेळी, अडीअडचणीत धावून जात होता. त्यांच्या हाकेला ओ देत होता. म्हणूनच पुंडलिकाने भिरकावलेल्या विटेवर विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे. जनीबरोबर दळण दळत होता. गोरोबाचा चिखल तुडवत होता. दामाजीसाठी महार झाला. नामदेवाच्या हातून जेवण जेवला. एकनाथांच्या घरी पाणी भरत होता. सावता माळीच्या मळ्यात भाजी पिकवत होता. सावता माळी तर आपल्या अभंगात म्हणतो, "कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ।" असा हा देव आपल्या भक्तांच्या घरी सेवा करीत होता. 
                महासमन्वय हे विठ्ठलाचे आणखी एक वेगळेपण आहे कारण त्याचे भक्त हे एकाच जातीचे नसून अठरापगड जातीचे होते. ह्या सर्व भक्तांचे एकच श्रद्धास्थान म्हणजे विठ्ठल. ह्यांच्या भक्तीच्या आड जात, पात, धर्म, पंथ येत नव्हता. विठ्ठलाचे नामस्मरण करणे, त्याच्या भक्तीत तल्लीन होणे हेच या भक्तांना माहित होते. या भक्तांनी आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण केले होते. ह्या सर्व भक्तांचा विठ्ठल श्वास झाला होता. विठ्ठलानेही अपरिमित भक्तीने भारावलेल्या आपल्या भक्तांना दर्शन दिले. सर्व संत वेगवेगळ्या जातीचे असले तरी सर्वांसाठी विठ्ठल हा देव झाला होता. विठ्ठलानेच आपल्या प्रेमाने या सर्वाना एकत्र बांधले होते. भक्तीच्या धाग्याने एकत्र गुंफले होते. विठ्ठलाने हा भक्तांचा समन्वय साधला आहे. 
                जनीने अभंगाच्या शेवटच्या कडव्यात म्हणाले आहे कि, "जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।।" विठ्ठलाचे भक्त हे सर्व जातीचे, धर्माचे असतात. ह्या भक्तांना विठ्ठलाची भक्ती करणे, त्याचे नामस्मरण घेणे हाच धर्म माहित असतो. विठ्ठलापुढे सर्व भक्त एकच असतात. त्यांना ना कुठली जात ना कुठला धर्म असतो. विठ्ठल हाच त्यांचा धर्म असतो व विठ्ठल हीच त्यांची जात असते. म्हणूनच ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताई हि भावंडं ब्राह्मण वर्गातील, गोरा हा कुंभार, सावता हा माळी, बंका हा महार, सेना हा न्हावी, भागू महारीण, गणिकेच्या पोटी जन्मलेली कान्होपात्रा, नामदेव शिंपी, नरहरी सोनार हि सर्व अठरापगड जातीची संत मंडळी विठ्ठलाच्या छत्राखाली एकत्र येत व आपली जात, धर्म विसरून विठ्ठलाच्या भक्तीत, नामस्मरणात तल्लीन होत. ह्या संतांबरोबरच परिसा भागवत, विसोबा खेचर, भानुदास, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई ह्या संतांचा मेळावा पंढरपूरच्या वाळवंटात एकत्र येत होता व विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत होता. हा अठरापगड जातीच्या संतांचा सोहळा म्हणजे एकात्मकतेचे प्रतीक होय. हा सोहळा आषाढी-कार्तिकी एकादशीच्या वेळेस पंढरपुरात पाहायला मिळतो. सर्व संत मंडळी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरापर्यंत येतात. चंद्रभागेमध्ये स्नान करतात. चंद्रभागेच्या वाळवंटात फेर धरतात, फुगड्या खेळतात, आनंदाने नाचतात. विठुरायाच्या नामस्मरणात दंग  होऊन  जातात. हा सोहळा बघून असे वाटते कि जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे. हा सोहळा बघून जनी आपल्या अभंगात म्हणते कि, "गोपाळानेच(विठ्ठलानेच) सर्व संतांना एकत्र करून हा सोहळा आरंभला आहे."

Saturday, August 10, 2019

सांगलीतील महापुराची दाहकता








सांगलीतील महापुराची दाहकता 

               २००५ साली सांगलीत पुराने थैमान घातले होते. त्यापेक्षाही आताचा पूर भयानक आहे. या महापुरामुळे सांगली व जवळचा परिसर जलमय झाला आहे. सांगलीतील बसस्थानक, गावभाग, वखारभाग, झुलेलाल चौक, हरबट रोड, माधवनगर, महापालिका येथपर्यंत पुराचे पाणी आले. सांगलीतील गणपती मंदिरातही यावेळेला पुराचे पाणी आले. या पुराचा सांगलीजवळील १८ गावांना वेढा पडला. यावेळेला महापुराने इतके रौद्ररूप धारण केले कि ब्राह्मनाळला बोट उलटून १० जणांना जलसमाधी मिळाली. 
               संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने अचानक रौद्ररूप धारण केले आणि सगळीकडे हाहाकार माजवला. या महापुरामुळे लोकांचे बरेच नुकसान झाले. काही जणांचे संसार उध्वस्थ झाले. घरात पाणी घुसल्याने वीज नाही, प्यायला पाणी नाही अशी माणसांची अवस्था झाली. बाहेर पडावे तर कमरेच्यावर पाणी त्यामुळे वयस्कर माणसे घरात अडकून पडली. फोन बंद, मोबाईल बंद त्यामुळे बाहेरच्यांशी संपर्क तुटलेला. या पुरामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली. महत्वाच्या आयर्विन पुलाजवळ ५५ फुटांपेक्षा जास्त पाणी आल्याने वाहतूक बंद पडली. त्यामुळे सांगलीचा पुणे-कोल्हापुरशी संपर्क तुटला. महापुरामुळे दुरध्वनी, नेटवर्क सेवा बंद पडल्याने बँका, एल.आय.सी. कंपन्यांना फटका बसला. सगळे आर्थिक व्यवहार थंडावले. 
               या महापुरामुळे माणुसकीचे दर्शन दिसून आले. सर्वजण पुरात अडकलेल्यांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यास मदत करत होते तर काही ठिकाणी पुरग्रस्तांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करत होते. त्यांची अन्न, पाण्याची सोय केली जात होती. एनडीआरएफ, टेरिटोरियल आर्मीचे जवानही पुरातील लोकांना मदत करत होते. बचाव पथके नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत होते. लोक आपले हेवे दावे, जात-पात, धर्म विसरून संकटातील लोकांना मदत करत होते. 
               २००५ साली आलेल्या पुरापेक्षाही या पुराची दाहकता सांगलीकरांनी अनुभवली. हा महापूर आता त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील.




















Saturday, August 3, 2019

अवीट गोडीचे गाणे -- सजनी ग भुललो मी

 

अवीट गोडीचे गाणे -- सजनी ग भुललो मी 

         भिंगरी हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ता केशव यांनी केले. या चित्रपटातील गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली असून बाळ पळसुले यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील गाणी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायली आहेत. या चित्रपटात सुषमा शिरोमणी, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, रमेश देव यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

            या चित्रपटातील सर्वच गाणी सुरेख आहेत. यातीलच हे एक गाणे आहे. हे गाणे सुषमा शिरोमणी व विक्रम गोखले यांच्यावर चित्रित झाले आहे. महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणे गायले आहे.

 

सजनी ग, भुललो मी ,काय जादु केली
बघुन तुला जीव माझा होई वर खाली
सजना रे, काय सांगु ,कुणी जादु केली
लाज मला आली बाई ,लाज मला आली

काल मला याची बाई जान नव्हती
आज कशी मोहरून आली नवती
अंग चोरतिया कशी लाजाळूची येली
अल्लड चाळयाचीखोडी कुठं गेली
लाज मला आली बाई ,लाज मला आली

नकोस घेऊ विळख्यात सजना असा
बघत्यात झाडी येली भर दिवसा
डोंगराची मैना कशी एकांताला भ्याली
कळी ही गुलाबी सुगंधात न्हाली
लाज मला आली बाई ,लाज मला आली

लपेना ही हुरहुर आज पदरी
शालू चोळी नेसून मी झाले नवरी
काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली
येशील का घरी तूं लक्ष्मीच्या  चाली
लाज मला आली बाई ,लाज मला आली

Lyrics -जगदीश खेबुडकर  
Music -बाळ पळसुले 
Singer -उषा मंगेशकर,महेंद्र कपुर  
 Movie  -भिंगरी  
 
 
 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...