Saturday, August 24, 2019

भारत इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिका १९७१ -- एक ऐतिहासिक कामगिरी

  भारतीय कप्तान अजित वाडेकर उत्कृष्ठ फटका मारताना 

भागवत चंद्रशेखर - दुसऱ्या डावात ६ बळी घेत विजयात मोलाचा वाटा

 भारत इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिका १९७१ -- एक ऐतिहासिक कामगिरी 

               अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड भूमीवर पहिला कसोटी विजय व मालिका विजय संपादन केला. भारताने ३ कसोटी सामान्यांची मालिका १-० ने जिंकली. लॉर्डसवर खेळवलेली पहिली कसोटी व ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवलेली दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. 
                तिसरा कसोटी सामना १९ - २४ ऑगस्ट १९७१ दरम्यान किंगस्टन ओव्हल मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात चार्ली इलियट व आल्बर्ट रोड्स यांनी पंच म्हणून काम पाहिले.
                 इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना १०८.४ षटकात ३५५ धावा केल्या. जेम्सनने १५२ चेंडूत ८२ धावा केल्या. तो धावचीत झाला. अॅलन नॉटने ११६ चेंडूत ९० धावा केल्या. सोलकरने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन त्याची खेळी संपवली. हटनने १२५ चेंडूत ८१ धावा केल्या. त्याला वेंकटराघवनने त्रिफळाचित केले. भारताकडून एकनाथ सोलकर यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने टिच्चून गोलंदाजी करत १५ षटकात २८ धावा देत ३ गडी बाद केले. 
               भारताची सुरवात खराब झाली. धावफलकावर १७ धावसंख्या असताना अशोक मंकड १० धावा काढून बाद झाला तर ६ धावा काढून सुनील गावस्कर बाद झाला. तेव्हा भारताची धावसंख्या धावफलकावर होती २ बाद २१. नंतर अजित वाडेकर व दिलीप सरदेसाई यांनी डाव सावरला. अजित वाडेकरने ४८ धावा केल्या तर सरदेसाई यांनी ५४ धावा केल्या. सोलकर ४४ धावा, फरुख इंजिनियर ५९ धावा, अबिद अली २६ धावा, वेंकटराघवन २४ धावा यांच्यामुळे भारताने २८४ धावांपर्यंत मजल मारली. इलिंगवर्थने गोलंदाजीचे उत्कृष्ठ प्रदर्शन करीत ३४.३ षटकात ७० धावा देत ५ गडी बाद केले. इंग्लंडला पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळाली. 
               भागवत चंद्रशेखरच्या फिरकी माऱ्यापुढे इंग्लंडचा दुसरा डाव ४५.१ षटकात १०१ धावात गडगडला. त्यांची फलंदाजी चंद्रशेखरच्या फिरकीपुढे टिकू शकली नाही. ब्रायन लुक्खूर्स्टने १११ चेंडूत ३३ धावा केल्या याच इंग्लंडसाठी सर्वोच्च धावा ठरल्या. चंद्रशेखरने आपल्या फिरकीची कमाल दाखवत १८.१ षटकात ३८ धावा देत ६ गडी बाद करत इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. 
               विजयासाठी १७२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने १०१ षटकात ६ गडी गमावत १७४ धावा करून एक ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयात अजित वाडेकरच्या ४५ धावा, दिलीप सरदेसाईंच्या ४० धावा, गुंडाप्पा विश्वनाथच्या ३३ धावा तर फारूक इंजिनियरच्या २८ धावा मोलाच्या ठरल्या. डेरेक अंडरवूडने ३८ षटकात ७२ धावा देत ३ गडी बाद केले. भारताने इंग्लंडचा ४ गडी राखून  पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदविला. या विजयाबरोबरच भारताने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत १-० ने हरवत कसोटी मालिका जिंकत एक  ऐतिहासिक कामगिरी केली.








































No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...