Friday, August 23, 2019

चैतन्याचा उत्सव, गणेशोत्सव !

 
चैतन्याचा उत्सव, गणेशोत्सव !

               गणेशोत्सव म्हणले कि, अंगात चैतन्य खुलायला लागते. उत्साह संचारतो. आनंद ओसंडून वाहत राहतो. या उत्सवात एक सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण होते. बाळ-गोपाळांपासून अगदी आबालवृद्धांपर्यंत सर्वच जण आतुरतेने गणेशोत्सवाची वाट बघत असतात. बाप्पा घरी येणार म्हणून आधीपासूनच त्याच्या तयारीला लागलेले असतात. मूर्ती कुठली आणायची यापासून ते बाप्पासमोर कुठली आरास करायची इथपर्यंत घरात चर्चा रंगलेली असते. 
               बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात चालू असते. झांजा, ढोल-ताशांच्या निनादात व ''गणपती बाप्पा मोरया" च्या गजरात बाप्पा घरा-घरात विराजमान होतात. ज्यादिवशी बाप्पा घरात येतात त्या दिवशीचा उत्साह तर काय वर्णावा? सर्व जण मनापासून बाप्पाची सेवा करण्यात मग्न झालेले असतात. बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. आरत्या म्हणाल्या जातात, अथर्वशीर्ष पठण केले जाते. बाप्पाच्या आवडीच्या मोदकाचा नैवद्द दाखवला जातो. बाप्पाची सेवा करण्यात कुठे कमतरता पडत नाही ना याची सर्वजण दक्षता घेत असतात. ज्या दिवशी बाप्पाचे आगमन होते त्यादिवशी घर आनंदाने फुलून गेलेले असते. घरात मंगलमय वातावरण तयार झालेले असते. घरातील सर्व मळभ दूर होऊन घरात चैतन्य पसरलेले असते. त्यादिवशी सर्व दुःख, संकटांचा नाश झालेला असतो व घरात एक प्रकारची सुख, शांती निर्माण झालेली असते. घरात भक्तीपूर्वक वातावरण तयार होते. 
               ज्या दिवशी बाप्पा घरात येतात त्यादिवशी घरात प्रसन्न, निर्मळ वातावरण तयार होते. घरातील अडीअडचणी, संकटे, दुःख यांना आपण थारा न देता सर्वजण बाप्पाची सेवा करण्यात मग्न होतो. आपल्या मनात बाप्पाची प्रतिमा तयार होते. जसे बाप्पा आपल्या घरात विराजमान होतात तसेच ते आपल्या मनातही विराजमान होतात. बाप्पा मनात विराजमान झाले कि काम, क्रोध, मत्सर, माया, लोभ, वासना यांचा नाश होऊन मन पवित्र, निर्मळ होते. मनात सकारात्मक विचार येतात. या दहा दिवसात आपल्यात भक्तीभाव निर्माण होतो. त्यामुळे कुठल्याही वाईट, अनिष्ठ विचारांना आपण थारा देत नाही. 'बाप्पासमोर आपण वाईट वर्तणुक केली तर बाप्पा आपल्याला शिक्षा करेल' अशी भावना आपल्या मनात निर्माण होते त्यामुळे मन आपोआपच चांगल्या वर्तणुकीकडे वळते. 
               'तु सुखकर्ता, तु दुःखहर्ता, तु विघ्नविनाशक मोरया ।' असे आपण गणपतीला म्हणतो. बाप्पा आपल्या भक्तांची दुःखे स्वतः झेलतो, संकटांचे निवारण करतो. भक्तांवर येणारी विघ्ने आपल्या पोटात घेतो व भक्तांना सुखी, समाधानी, आनंदी ठेवतो अशी आपल्या मनात भावना निर्माण झालेली असते. म्हणूनच आपण श्रद्धेने, भक्तिभावाने गणोशोत्सव साजरा करतो.








































No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...