Saturday, August 10, 2019

सांगलीतील महापुराची दाहकता








सांगलीतील महापुराची दाहकता 

               २००५ साली सांगलीत पुराने थैमान घातले होते. त्यापेक्षाही आताचा पूर भयानक आहे. या महापुरामुळे सांगली व जवळचा परिसर जलमय झाला आहे. सांगलीतील बसस्थानक, गावभाग, वखारभाग, झुलेलाल चौक, हरबट रोड, माधवनगर, महापालिका येथपर्यंत पुराचे पाणी आले. सांगलीतील गणपती मंदिरातही यावेळेला पुराचे पाणी आले. या पुराचा सांगलीजवळील १८ गावांना वेढा पडला. यावेळेला महापुराने इतके रौद्ररूप धारण केले कि ब्राह्मनाळला बोट उलटून १० जणांना जलसमाधी मिळाली. 
               संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने अचानक रौद्ररूप धारण केले आणि सगळीकडे हाहाकार माजवला. या महापुरामुळे लोकांचे बरेच नुकसान झाले. काही जणांचे संसार उध्वस्थ झाले. घरात पाणी घुसल्याने वीज नाही, प्यायला पाणी नाही अशी माणसांची अवस्था झाली. बाहेर पडावे तर कमरेच्यावर पाणी त्यामुळे वयस्कर माणसे घरात अडकून पडली. फोन बंद, मोबाईल बंद त्यामुळे बाहेरच्यांशी संपर्क तुटलेला. या पुरामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली. महत्वाच्या आयर्विन पुलाजवळ ५५ फुटांपेक्षा जास्त पाणी आल्याने वाहतूक बंद पडली. त्यामुळे सांगलीचा पुणे-कोल्हापुरशी संपर्क तुटला. महापुरामुळे दुरध्वनी, नेटवर्क सेवा बंद पडल्याने बँका, एल.आय.सी. कंपन्यांना फटका बसला. सगळे आर्थिक व्यवहार थंडावले. 
               या महापुरामुळे माणुसकीचे दर्शन दिसून आले. सर्वजण पुरात अडकलेल्यांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यास मदत करत होते तर काही ठिकाणी पुरग्रस्तांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करत होते. त्यांची अन्न, पाण्याची सोय केली जात होती. एनडीआरएफ, टेरिटोरियल आर्मीचे जवानही पुरातील लोकांना मदत करत होते. बचाव पथके नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत होते. लोक आपले हेवे दावे, जात-पात, धर्म विसरून संकटातील लोकांना मदत करत होते. 
               २००५ साली आलेल्या पुरापेक्षाही या पुराची दाहकता सांगलीकरांनी अनुभवली. हा महापूर आता त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील.




















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...