Saturday, September 29, 2018

अखेर खरे वाघ लढले, अशिया कपवर भारताचे नाव कोरले.




अशिया कप जिंकल्यावर आनंदोत्सव साजरा करताना भारतीय खेळाडू 

अखेर खरे वाघ लढले, अशिया कपवर भारताचे नाव कोरले. 

          अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने बांगलादेशवर ३ गडी राखत विजय मिळवला आणि अशिया कपवर आपले नाव कोरले. 
               विजयासाठी ६ चेंडूत ६ धावा पासून ते शेवटच्या चेंडूवर १ धाव असा श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना शेवटपर्यंत रंगला. कधी भारताचे पारडे जड होत होते तर कधी बांगलादेशचे पारडे जड होत होते. भारत जिंकणार कि बांगलादेश जिंकणार हे शेवटच्या चेंडूपर्यंत कळत नव्हते. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळावी लागणार हि शक्यतासुद्धा वर्तवली जात होती. परंतु शेवटच्या चेंडूवर धाव घेऊन भारताने सातव्यांदा अशिया कप जिंकला. हा सामना खरोखरच अंतिम सामन्याला साजेसाच ठरला. 
               हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लिटन दास आणि मेहंदी मिराज जोडीने डावाला सुरवात केली. दासने उत्कृष्ट खेळी करत ११७ चेंडूत १२१ धावा केल्या. यात त्याने १२ चौकार व २ षटकार मारले. मोर्तझाने फटकेबाजी करत धावा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने कुलदीप यादवला एका षटकात षटकार खेचला परंतु याच षटकात धोनीने त्याला यष्टिचित करून त्याची खेळी संपवली. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना सौम्य सरकारने एका बाजूने किल्ला लढवत ठेवून बांगलादेशला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. अखेर ४९ व्या षटकात सौम्या धावबाद झाला तर बुमराहने रुबेल हुसेनचा त्रिफळा उडवून बांगलादेशचा डाव २२२ धावात संपवला. भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत बांगलादेशला २२२ धावात रोखले. 
               बांगलादेशने दिलेल्या माफक २२२ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली फलंदाजी केली. हे खेळत होते तेव्हा सामना भारत सहज जिंकणार असे वाटत होते परंतु हे दोघे बाद झाले आणि भारताची फलंदाजी ढेपाळली. अफगाणिस्तान सामान्याप्रमाणेच या सामन्याची स्थिती होऊन रवींद्र जडेजावरच भारताला जिंकून देण्याची जबाबदारी आली. पण तो बाद झाल्यानंतर जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या १६ धावा काढताना भारताच्या नाकीनऊ आले. भुवनेश्वर कुमार, केदार जाधव, कुलदीप यादव यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत विजयश्री खेचून आणली व भारताला सातव्यांदा अशिया कप मिळवून दिला. 
               या सामन्यात दोन्ही संघांनी फलंदाजी व गोलंदाजी उत्कृष्ट केली त्यामुळेच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला व प्रेक्षकांनासुद्धा या सामन्याचा आनंद लुटला आला. 



























Wednesday, September 19, 2018

भारतीय क्रिकेट खेळाडू -- वेधक हनुमा विहारी

भारतीय क्रिकेट खेळाडू -- वेधक हनुमा विहारी 
          विहिरीचा जन्म १३ ऑक्टोबर १९९३ रोजी काकीनाडा या गावी झाला. नागेश हमोंड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचा श्रीगणेशा केला. नागेश यांनीच त्याला सिकंदराबादमधील सेंट जॉन्स अकॅडमीत नेले. तेथे जॉन मनोज यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या गुणवत्तेला पैलू पडले. तेथेच सराव करणारा कसोटीपटू वि. वि. एस. लक्ष्मण याच्या शैलीदार फलंदाजीमुळे तो प्रेरित झाला. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्याच्या क्रिकेटला आईने पाठिंबा दिला. 
 कारकीर्द --
          २०१२ च्या युवा विश्वकरंडकसाठी विहारीची निवड झाली. भारताने या स्पर्धेत विजेतेपद मिळवले. २०१२ मध्ये आयपीएलमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादकडून १७ सामन्यात ८६.६९ च्या स्ट्राईक रेटने २४१ धावा केल्या. दोन वेळा तो सामनावीर ठरला. त्यानंतरही त्याला पुढील मोसमात आयपीएल करार मिळाला नाही. त्याला २०१५ मध्ये पाचच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. अशावेळी त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. इंग्लंडमधील इसेक्स अव्वल श्रेणी लीगमध्ये तो २०१४-१५ मध्ये खेळाला. त्याने सहा शतके ठोकली. त्याच्या या कामगिरीचे कौतुक झाले. त्याने २०१७-१८ च्या मोसमात आंध्रकडून सहा सामन्यात ७५२ धावा काढल्या. त्याची सरासरी ९४ होती. ओडिशाविरुद्ध त्याने नाबाद ३०२ धावा केल्या. इराणी करंडक सामन्यात त्याने शेष संघाकडून १८३ धावा काढल्या. यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यातील शेवटच्या पाचव्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. वयाच्या २३-२४ व्या वर्षापर्यंत कसोटी क्रिकेट खेळण्याचे ध्येय साध्य करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न त्याने यशस्वी ठरविले. 
         














Thursday, September 13, 2018

खास गणपती बाप्पांसाठी -- उकडीचे मोदक

खास गणपती बाप्पांसाठी -- उकडीचे मोदक 

          गणपती बाप्पांना मोदक फार प्रिय आहेत. त्यांचे आवडते खाद्य म्हणजे मोदक. गणपती बाप्पाला मोदक प्रिय असल्याने गणपतीला मोदकाचा नैवेद्द्य दाखवला जातो. उकडीचे मोदक कसे तयार करतात हे पुढील रेसिपीवरून कळेल. 

साहित्य -- एक नारळ, किसलेला गूळ, तांदळाचे पीठ, वेलची पूड, मीठ, तेल, तूप 

कृती --
१) सारण बनवण्यासाठी नारळ खोवून घ्यावा. खोवलेल्या नारळाच्या            प्रमाणात अर्धा किसलेला गूळ घ्यावा. 
२) खोवलेला नारळ व गूळ पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ढवळत          राहावे. सारण एकत्र झाले कि त्यात वेलची पूड टाकावी. 
३) तांदळाची उकड करण्यासाठी २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी           घेऊन पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप         घालावे. चवीसाठी थोडे मीठ घालावे. गॅस बारीक करून पीठ                       घालावे. उलथन्याने ढवळावे. मध्यम आचेवर २ - २ मिनिटे २ -३ वेळा       वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवर उतरवून ५ मिनिटे झाकून           ठेवावे. 
४) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी.       त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे.      उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी. 
५) उकड व्यवस्थित मळून झाली कि, त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे          करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून            बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक      बंद करावा. 
६) मोदक पात्रात किंवा मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यातील        चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून                झाकण लावून १० - १२ मिनिटे वाफ काढावी. 
७) वाफ काढून झाल्यावर मोदक पात्र खाली उतरवून थोड्या वेळाने मोदक      पात्रातील मोदक एका ताटात काढून गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून        दाखवावेत. 
८) नैवेद्द दाखवून झाल्यावर मोदकावर साजूक तूप घालून गरमागरम            रुचकर मोदक खावेत. 



उकडीचे मोदक 


उकडीचे रंगीत मोदक 
















    

गणेश चतुर्थी -- विघ्नहर्ता गजाननाचा उत्सव



दगडूशेठ हलवाई गणपती 


वाईचा महागणपती अर्थात ढोल्या गणपती 

गणेश चतुर्थी -- विघ्नहर्ता गजाननाचा उत्सव 

          "गणेश चतुर्थी" हा विघ्नहर्ता गजाननाचा उत्सव. गणेश हि बुद्धी आणि पराक्रमाची देवता आहे. गणेश हा सुखकर्ता, दु:खहर्ता, संकटनाशक, मंगलकारक आहे तसेच तो कलांचा व विद्द्येचा दाताही आहे. अश्या ह्या गणेशाचा उत्सव भाद्रपदात येतो. हा उत्सव महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश या राज्यात उत्साहाने व धामधुमीत साजरा केला जातो. कुठल्याही शुभकार्याचा आरंभ गणेशपूजनानं होतो. महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. अष्टविनायक तर फार प्रसिद्ध आहेत. मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव या गणपतींच्या ठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी असते. 
          गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत "गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया" च्या गजरात प्रत्येक घरी गणपती बाप्पाचे आगमन होते. या दिवशी घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशाला मोदक प्रिय असल्याने २१ मोदकांचा नैवेद्द दाखवला जातो. दुर्वा, कमळ, केवडा, जास्वंद, इतर पत्री यांनी गणेशाची षोडशोपचारे पूजा केली जाते. शेंदूर आणि गुलाल गणेशाला लावला जातो. अथर्वशीर्षाची २१ आवर्तनं केली जातात. कर्पूरारती केली जाते. गणपतीला गुळ खोबरे, मोदक यांचा नैवेद्द्य दाखवला जातो. 
          मोरया गोसावी हे गणेशाचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. पुण्यातील चिंचवडजवळ त्यांची समाधी आहे. "गणपती बाप्पा मोरया" या जयघोषात या गणेशभक्ताचंही नामस्मरण केलं जातं. 
          गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस हा उत्सव चालतो. काही घरात अर्धा दिवस, दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस तर काहींच्या घरात अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बसवण्याची प्रथा आहे. या दिवसात घरातील वातावरण प्रसन्न असते. लहानांपासून थोरांपर्यंत गणेशभक्तीत गढलेले असतात. सकाळ-संध्याकाळ गणेशाची आरती चालते. गणेशाला गोडाचा नैवेद्द्य दाखवला जातो. गणेशासमोर विद्द्युतरोषणाईची आरास केली जाते. 
          अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची वाजत गाजत, ढोल ताश्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली जाते. या दिवशी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत गणपतीला भावपूर्व निरोप दिला जातो. या दहा दिवसात गणपती पाहुणा म्हणून येतो आणि सर्वांची मनं जिंकतो. सर्वांना आपलेसे करतो. 



अष्टविनायक 










Tuesday, September 11, 2018

भारताने मालिका 1-4 ने गमावली, इतिहास रचून अँडरसनचा कूकला निरोप



ऐलीस्टर कूक शतक झळकवल्यानंतर आनंद व्यक्त करताना 


जेम्स अँडरसन कसोटीत सर्वाधिक बळी घेतल्यानंतर 
लंडन : सलामीचा लोकेश राहुल आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने झळकावलेली शतकं, तसंच त्या दोघांनी सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 204 धावांच्या भागीदारीनंतरही टीम इंडियाला ओव्हल कसोटी वाचवता आली नाही. या कसोटीत इंग्लंडने भारताचा धावांनी 118 धावांनी पराभव करून, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा निर्विवाद विजय साजरा केला.

या कसोटीत इंग्लंडने भारताला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुल आणि रिषभ पंत या शतकवीरांनी सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचून भारताचा दुसरा डाव 345 धावांत आटोपला. राहुलने 20 चौकार आणि एका षटकारासह 149 धावांची खेळी उभारली. पंतने 15 चौकार आणि चार षटकारांसह 114 धावांची खेळी केली.

सॅम करन मालिकावीर

विराट कोहलीने या मालिकेत पाच सामन्यांमध्ये 59 च्या सरासरीने 593 धावा केल्या. तो भारतीय मालिकावीर ठरला. तर इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करन मालिकावीर ठरला. त्याने चार सामन्यांमध्ये 11 विकेट घेत 272 धावांची अष्टपैलू कामगिरी केली.

जेम्स अँडरसनने इतिहास रचला

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोहम्मद शमीला बाद करताच ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 564 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज होण्याचा मान मिळवला. मॅकग्राच्या नावावर 563 विकेट्स आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800), ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉर्न (708), भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे (609) यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. या यादीत चौथ्या क्रमांकावर आता अँडरसन आहे.

रिषभ पंतचं शतक, अनेक विक्रमांची नोंद

षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रिषभ पंतने ओव्हल कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे रिषभने हे शतकही षटकारानेच पूर्ण केलं.

षटकार ठोकत कसोटीत शतक पूर्ण करणारा रिषभ चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव, इरफान पठाण आणि हरभजन सिंह यांच्या नावावर हा विक्रम होता.

या कसोटीत रिषभने विविध विक्रमांची नोंद केली आहे. षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणं असो, किंवा एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणं असो. पहिलीच मालिका त्याने गाजवली. दरम्यान, खराब यष्टीरक्षणामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. चौथ्या कसोटी सामन्यात तर एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला होता.

अॅलिस्टर कूकचा क्रिकेटला अलविदा

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूकने ओव्हल कसोटीत दमदार शतक साजरं केलं. कूकच्या कसोटी कारकीर्दीतलं हे 33 वं शतक ठरलं. त्याने पदार्पणाच्या कसोटीतही शतक ठोकलं होतं आणि कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीतही शतक ठोकलं.

ओव्हल कसोटी ही कूकच्या कारकीर्दीतली अखेरची कसोटी होती. अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारा कूक हा जगातला चाळीसावा फलंदाज ठरला. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात आणि अखेरच्या सामन्यात शतक ठोकणारा जगातला केवळ पाचवा फलंदाज ठरला.

कूकने मार्च 2006 साली भारताविरुद्ध नागपूर कसोटीत पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या त्या कसोटीतही कूकने शतकी खेळी साकारली होती. विशेष म्हणजे कूकचा अंतिम सामनाही भारताविरुद्धच झाला.

अखेरच्या कसोटी सामन्यात सामनावीराचा मानही अॅलिस्टर कूकलाच मिळाला. त्याने पहिल्या डावात 71 आणि दुसऱ्या डावात 147 धावांची खेळी केली होती.

पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटीत शतक ठोकणारे फलंदाज

रेजिनाल्ड डफ (ऑस्ट्रेलिया)

विल्यम पॉन्सफोल्ड (ऑस्ट्रेलिया)

ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया)

मोहम्मद अझरुद्दीन (भारत)

अॅलिस्टर कूक (इंग्लंड)

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...