खास गणपती बाप्पांसाठी -- उकडीचे मोदक
गणपती बाप्पांना मोदक फार प्रिय आहेत. त्यांचे आवडते खाद्य म्हणजे मोदक. गणपती बाप्पाला मोदक प्रिय असल्याने गणपतीला मोदकाचा नैवेद्द्य दाखवला जातो. उकडीचे मोदक कसे तयार करतात हे पुढील रेसिपीवरून कळेल.
साहित्य -- एक नारळ, किसलेला गूळ, तांदळाचे पीठ, वेलची पूड, मीठ, तेल, तूप
कृती --
१) सारण बनवण्यासाठी नारळ खोवून घ्यावा. खोवलेल्या नारळाच्या प्रमाणात अर्धा किसलेला गूळ घ्यावा.
२) खोवलेला नारळ व गूळ पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. सारण एकत्र झाले कि त्यात वेलची पूड टाकावी.
३) तांदळाची उकड करण्यासाठी २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी घेऊन पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मीठ घालावे. गॅस बारीक करून पीठ घालावे. उलथन्याने ढवळावे. मध्यम आचेवर २ - २ मिनिटे २ -३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवर उतरवून ५ मिनिटे झाकून ठेवावे.
४) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी. त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
५) उकड व्यवस्थित मळून झाली कि, त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
६) मोदक पात्रात किंवा मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यातील चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून १० - १२ मिनिटे वाफ काढावी.
७) वाफ काढून झाल्यावर मोदक पात्र खाली उतरवून थोड्या वेळाने मोदक पात्रातील मोदक एका ताटात काढून गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवावेत.
८) नैवेद्द दाखवून झाल्यावर मोदकावर साजूक तूप घालून गरमागरम रुचकर मोदक खावेत.
उकडीचे मोदक
उकडीचे रंगीत मोदक
No comments:
Post a Comment