Tuesday, September 11, 2018

भारताने मालिका 1-4 ने गमावली, इतिहास रचून अँडरसनचा कूकला निरोप



ऐलीस्टर कूक शतक झळकवल्यानंतर आनंद व्यक्त करताना 


जेम्स अँडरसन कसोटीत सर्वाधिक बळी घेतल्यानंतर 
लंडन : सलामीचा लोकेश राहुल आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने झळकावलेली शतकं, तसंच त्या दोघांनी सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 204 धावांच्या भागीदारीनंतरही टीम इंडियाला ओव्हल कसोटी वाचवता आली नाही. या कसोटीत इंग्लंडने भारताचा धावांनी 118 धावांनी पराभव करून, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा निर्विवाद विजय साजरा केला.

या कसोटीत इंग्लंडने भारताला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुल आणि रिषभ पंत या शतकवीरांनी सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचून भारताचा दुसरा डाव 345 धावांत आटोपला. राहुलने 20 चौकार आणि एका षटकारासह 149 धावांची खेळी उभारली. पंतने 15 चौकार आणि चार षटकारांसह 114 धावांची खेळी केली.

सॅम करन मालिकावीर

विराट कोहलीने या मालिकेत पाच सामन्यांमध्ये 59 च्या सरासरीने 593 धावा केल्या. तो भारतीय मालिकावीर ठरला. तर इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करन मालिकावीर ठरला. त्याने चार सामन्यांमध्ये 11 विकेट घेत 272 धावांची अष्टपैलू कामगिरी केली.

जेम्स अँडरसनने इतिहास रचला

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोहम्मद शमीला बाद करताच ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 564 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज होण्याचा मान मिळवला. मॅकग्राच्या नावावर 563 विकेट्स आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800), ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉर्न (708), भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे (609) यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. या यादीत चौथ्या क्रमांकावर आता अँडरसन आहे.

रिषभ पंतचं शतक, अनेक विक्रमांची नोंद

षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रिषभ पंतने ओव्हल कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे रिषभने हे शतकही षटकारानेच पूर्ण केलं.

षटकार ठोकत कसोटीत शतक पूर्ण करणारा रिषभ चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव, इरफान पठाण आणि हरभजन सिंह यांच्या नावावर हा विक्रम होता.

या कसोटीत रिषभने विविध विक्रमांची नोंद केली आहे. षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणं असो, किंवा एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणं असो. पहिलीच मालिका त्याने गाजवली. दरम्यान, खराब यष्टीरक्षणामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. चौथ्या कसोटी सामन्यात तर एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला होता.

अॅलिस्टर कूकचा क्रिकेटला अलविदा

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूकने ओव्हल कसोटीत दमदार शतक साजरं केलं. कूकच्या कसोटी कारकीर्दीतलं हे 33 वं शतक ठरलं. त्याने पदार्पणाच्या कसोटीतही शतक ठोकलं होतं आणि कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीतही शतक ठोकलं.

ओव्हल कसोटी ही कूकच्या कारकीर्दीतली अखेरची कसोटी होती. अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारा कूक हा जगातला चाळीसावा फलंदाज ठरला. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात आणि अखेरच्या सामन्यात शतक ठोकणारा जगातला केवळ पाचवा फलंदाज ठरला.

कूकने मार्च 2006 साली भारताविरुद्ध नागपूर कसोटीत पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या त्या कसोटीतही कूकने शतकी खेळी साकारली होती. विशेष म्हणजे कूकचा अंतिम सामनाही भारताविरुद्धच झाला.

अखेरच्या कसोटी सामन्यात सामनावीराचा मानही अॅलिस्टर कूकलाच मिळाला. त्याने पहिल्या डावात 71 आणि दुसऱ्या डावात 147 धावांची खेळी केली होती.

पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटीत शतक ठोकणारे फलंदाज

रेजिनाल्ड डफ (ऑस्ट्रेलिया)

विल्यम पॉन्सफोल्ड (ऑस्ट्रेलिया)

ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया)

मोहम्मद अझरुद्दीन (भारत)

अॅलिस्टर कूक (इंग्लंड)

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...