सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणारे महागणपतीचे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात व गणपतीचे दर्शन घेतात. पाचगणी, महाबळेश्वरला जाणारे पर्यटक तर हमखास गणपतीचे दर्शन घेतात व पुढे जातात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे.
गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ढोल्या गणपती असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्त्र असून वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतींची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो व मंदिर सुरक्षित राहते.
गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. तिची स्थापना वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्याने कदाचित त्याला ढोल्या गणपती असे नामाभिधान प्राप्त झाले असावे. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून, हा दगड कर्नाटकातून आणला आहे. हा गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती ३ मीटर ६३ सेमी इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत हि जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तू शास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अणकुचीदार टोके करून ती त्यात बसविली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरात सर्वात उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची २४ मीटर आहे.
गणपतीचे आकर्षक मंदिर
No comments:
Post a Comment