टिटवाळ्याचा महागणपती
टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायकाचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावर आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तेथून दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. येथे रिक्षा किंवा घोडागाडीने जाता येते.
या महागणपतीबद्दलची पौराणिक कथा अशी आहे. पूर्वी टिटवाळा आणि परिसर हा दंडकारण्याचा भाग म्हणून ओळखला जात होता. तेथे कण्वमुनींचा आश्रम होता. तेथेच विश्वामित्र मेनकेची कन्या शकुंतला मोठी झाली. पुढे दुष्यन्त राजाबरोबर शकुंतलेचा गांधर्व विवाह झाला. नंतर तो आपल्या राज्यात परत गेला. वीरही शकुन्तलेकडून दुर्लक्ष झाल्याने दुर्वासमुनी तिला शाप देऊन निघून गेले. त्यामुळे पतीकडून अव्हेरलेली शकुंतला परत आली असता, कण्वमुनींनी तिला टिटवाळ्याच्या महागणपतीची प्रार्थना व पूजाअर्चा करण्यास सांगितले. तिने पूजाअर्चा सुरु केल्यावर गणपतीच्या कृपेने पुढे तिला तिचा पती, मुलगा व राज्य मिळाले. त्यानंतर हा गणपती वरदविनायक व विवाहविनायक म्हणून प्रसिद्ध झाला . हा गणपती जागृत असून, तो नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या गणपतीच्या नंदादीपासाठी श्री शिवछत्रपतींनी वर्षासन दिले होते. आजही शासनाकडून दर वर्षी अनुदान मिळते. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पूजेसाठी तत्कालीन पुजारी श्री. जोशी यांना साडेतीन एकर जमीन इनाम दिली होती. याबाबतच्या सनदा आजचे त्यांचे वंशज व सध्याचे विश्वस्त श्री. जोशी कुटुंबीयांकडे उपलब्ध आहेत. हे गणपती मंदिर पूर्वाभिमुख असून, पश्चिमेस तलाव आहे. बाजूला पुरातन विहीर आहे. मंदिराच्या परिसरात सदाहरित बाग, पाणपोई आहे. तेथे चौघडा, नगारखाना आहे. देवळावर घुमट व अष्टकोनी कळस आहे. देवळावर भगवा ध्वज सतत फडकत असतो. देवळासमोर मोठी दगडी दीपमाळ आहे. तेथे दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा व गणेशोत्सवात दीपोत्सव केला जातो. मंदिराच्या गाभाऱ्यात संगमरवरी मखरात आसनस्थ असलेली सुमारे चार फूट उंचीची गणेश मूर्ती आहे. महागणपतीची शेंदूरविलेपित प्रशस्त मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. सुंदर दगडी महिरप, त्यात शेंदूरविलेपित भव्य गंडस्थळ असलेली, मागील दोन हातात पाशांकुश, पुढील उजव्या हातात जपमाळ, डाव्या हातात मोदक, सोंड डावीकडे वळलेली, गळ्यात सर्पमाळा, लंबोदर, त्यावर नागबंध, डोळ्यात व नाभीत हिरे जडवलेले असून आसनाच्या पायावर यक्ष-किन्नर व देवदेवतांचे कोरीव शिल्पकाम अशी मंगलमूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी, लक्ष व लाभ हि त्यांची बालके यांच्या कोरीव मूर्ती आहेत. सभामंडपात मोदक खाणारा मूषक आहे. एका बाजूला शिवलिंग, माता पार्वती व गणपतीची मूर्ती आहे. तेथे महागणेशभक्त वेणगावकर-जोशी महाराजांच्या पादुका असून, नंदीची मूर्ती आहे.
मंदिरात मंगळवार, रविवार व सुटीच्या दिवशी व विशेष करून संकष्टी, अंगारकी व विनायकी चतुर्थीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठी असते. दर वर्षी माघ शुद्ध चतुर्थीस गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. तेव्हा प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत पाच दिवस भजन, कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम होतात. संध्याकाळी कोळी बांधवांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढली जाते. शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होते.
No comments:
Post a Comment