Sunday, July 17, 2022

तुकाराम महाराज गाथा - अभंग - अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति

अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति | मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ||१||
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं | न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ||२||
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी  एकानें | बैसलों धरणें । हाका देत दाराशी ||३||
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला | आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ||४||

ओवी : अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति | मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ||१||
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं | न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ||२||

अर्थ : देवा, तुमच्याविषयीची प्रीती ज्यांच्यामध्ये निरंतर आहे, अशा भक्तांची संगती मला द्या. अहो कमळापती (लक्ष्मीपती) मग तुमच्याजवळ अधिक काही मागण्याचा मी तुम्हाला त्रास देणार नाही. त्या संतांच्या पायाजवळ मी उगाच पडून राहीन. दुसरे काही मागणार नाही आणि करणारही नाही ह्याबद्दल विठोबा तुमचीच शपथ वाहतो. 

भावार्थ : ज्या भक्तांच्या, संतांच्या मनामध्ये विठ्ठलाबद्दल अपार प्रेम (प्रीति) आहे असे भक्त, संत नित्यनियमाने विठ्ठलाचे नामस्मरण करतात, त्याचे भजन-कीर्तन गातात, त्याच्या भक्तीमध्ये रममाण होतात अशा भक्त व संतांचा सहवास (संगती) घडावा असे तुकाराम महाराजांना वाटते. या भक्तांचा, संतांचा सहवास घडल्याने तुकाराम महाराजांचे मनही भक्तीमार्गाकडे धावेल. मनात विठ्ठलाचे विचार येतील. संतांचा सहवास घडल्याने चार भक्तीपर शब्द ऐकायला मिळतील. संतांची संगत घडल्याने मनातील मळभ निघून जावून मन स्वच्छ, निर्मळ होईल. त्यांचे जीवन सुखकर होईल. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, 'तुमच्याविषयीची प्रीती ज्यांच्यामध्ये निरंतर आहे, अशा भक्तांची संगती मला द्या. त्यांच्या पायाजवळ मी उगाच पडून राहीन. यांची संगत मिळाल्यावर मी तुमच्याजवळ काही मागणार नाही.(अधिक मागण्याचा तुम्हाला त्रास देणार नाही).' म्हणजेच ज्यांच्या मनामध्ये विठ्ठलाबद्दल अपार प्रेम, भक्ती आहे अशा भक्तांची (संतांची) संगत मिळावी, त्यांचा सहवास घडावा एवढीच त्यांची विठ्ठलाकडून अपेक्षा आहे, बाकी त्यांना विठ्ठलाकडून कुठलीही अपेक्षा नाही म्हणूनच ते म्हणतात कि, 'मी तुमच्याकडून दुसरे काही मागणार नाही आणि करणारही नाही ह्याबद्दल विठोबा तुमचीच शपथ वाहतो.'

ओवी : तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी  एकानें | बैसलों धरणें । हाका देत दाराशी ||३||
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला | आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ||४||

अर्थ : आम्ही निरंतर तुमच्याकडे येऊन काही मागण्याची कटकट लावितो, त्यापासून तुम्हाला पीडा होते व वारंवार तुमच्याकडे येवून आम्हालाही वटवट करण्याची पीडा होते. आमचे जे काही मागणें आहे, त्याप्रमाणे दिलेत तर आपल्या उभयतांच्या पीडा दूर होतील, आणि ते मिळावे म्हणून तुमच्या दाराशी सारखे धरणे करून हांका मारीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो, 'विठ्ठला ह्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे व आमचा त्याग आपणाकडून होता कामा नये. 

भावार्थ : तुकाराम महाराज सारखे विठ्ठलाकडे जाऊन संतांची संगत घडावी, त्यांचा सहवास घडावा म्हणून मागणे मागत आहेत. विठ्ठलाच्या दाराशी जावून धरणे धरत आहेत. आपल्या जाण्याने व विठ्ठलाकडून सारखे मागण्यामुळे विठ्ठलाला पीडा होते, त्रास होतो असे तुकाराम महाराजांना वाटत आहे व त्यांनाही        सारखे-सारखे विठ्ठलाकडे जावून व त्याच्याकडे मागणे मागून पीडा होत आहे म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात की, 'आमचे जे काही मागणें आहे (संतांची भेट घडावी हे मागणे) ते पुर्ण केले तर आपल्या उभयतांची (दोघांची) पीडा दूर होईल, दोघांनाही त्रास होणार नाही.' तसेच तुकाराम महाराज म्हणतात, अहो, 'विठ्ठला ह्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे व आमचा त्याग आपणाकडून होता कामा नये.'

 

 


 

 

 

 

 

 

 














 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Saturday, July 16, 2022

याराना - घट्ट मैत्रीचे नाते

 याराना - घट्ट मैत्रीचे नाते

          हा चित्रपट २३ ऑक्टोबर १९८१ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता एच. ए. नाडियाडवाला असून राकेश कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा ज्ञानदेव अग्निहोत्री यांनी लिहिली असून पटकथा विजय कौल यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली असून राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटातील गाणी किशोर कुमार यांनी गायली असून 'बिशन चाचा कुछ गाओ' हे एकमेव गीत मोहमद रफींनी गायले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अमजद खान, नीतू सिंग, तनुजा, कादर खान, जीवन, रंजीत यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

          या चित्रपटात अमजद खानने सकारात्मक भुमिका केली. या आधी अमिताभच्या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भुमिका केली होती. या चित्रपटात अमजद खान अमिताभचा मित्र दाखवला आहे व अमिताभच्या गायकीला प्रोत्साहन देताना दाखवला आहे. अमिताभच्या गायकीसाठी अमजद खान आपले सर्वस्व गमावतो. अमजद खानने निस्वार्थ मित्राची भूमिका केली आहे. या भूमिकेमुळे अमजद खानला फिल्मफेयर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता' चा पुरस्कार दिला. 

          या चित्रपटातील 'सारा जमाना हसींनोका दिवाना' हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले. या गाण्याचे वैशिष्ट म्हणजे या गाण्यात अमिताभच्या ड्रेसला इलेक्ट्रिक बल्ब बसवले होते व अमिताभ नाचत असताना तो स्वतः हे बल्ब कपड्याच्या आतून एकाचवेळेस संपूर्ण तादात्म्य राखून ऑपरेट करत होता. हे गाणे बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करीत होते. 

अमिताभचे काही विनोदी सीन -

अमिताभचा विनोदी डान्स 

          विजू खोटे सर्वांना डान्स शिकवत असतो. यात अमिताभही असतो. अमिताभ विचित्र डान्स करत असताना दोघा-तिघांना फाईटही मारतो. हळूहळू सर्वजण एकमेकांना फाईट मारू लागतात व डान्सचे रूपांतर हाणामारीत होते. 

कच्चा पापड पक्का पापड 

          मास्टरजी अमिताभला शिकवताना वाचायला लावतात पण अमिताभला नीट वाचता येत नाही तेव्हा मास्टरजी अमिताभला म्हणतात, 'एक शब्दभी तुम्हारे जबानसे सही नही निकलता' तेव्हा अमिताभ मास्टरजीना 'कच्चा पापड पक्का पापड' म्हणायला लावतो. मास्टरजी म्हणायचा प्रयत्न करतात पण त्यांना जमत नाही. हळूहळू बिल्डिंगमधले सगळे लोक 'कच्चा पापड पक्का पापड' म्हणायला लागतात. शेवटी नीतू सिंगही 'कच्चा पापड पक्का पापड' म्हणायचा प्रयत्न करते व म्हणताना तिचीही तारांबळ उडते. 

कथानक -

        किशन आणि बिशन हे बालपणीचे मित्र असतात. किशन हा अनाथ पण स्वावलंबी आणि मेहनती आहे, तर बिशन हा श्रीमंत पार्श्वभूमीतून आला आहे. दोघांमधील मैत्री खूप घट्ट आहे आणि हीच मैत्री बिशनच्या मामाची डोकेदुखी आहे. बिशनच्या मामाचा त्याच्या बहिणीच्या मालमत्तेवर डोळा आहे. दोन मित्रांना वेगळे करण्यासाठी मामा आपल्या बहिणीला बिशनला पुढील शिक्षणासाठी शहरात आणि नंतर परदेशात पाठवण्यास सांगतात.

           जेव्हा दोन मित्र पुन्हा एकत्र येतात. किशन शंकराच्या देवळात 'भोले ओ भोले' हे गाणे म्हणत असतो तेव्हा बिशन ( अमजद खान ) ला कळते की किशन ( अमिताभ बच्चन ) चा आवाज खूप छान आहे.बिशन हे गाणे रेकॉर्ड करतो. बिशन आता एक यशस्वी उद्योगपती आहे आणि त्याला किशनच्या गायन प्रतिभेला प्रोत्साहन द्यायचे आहे. किशन त्याच्या मित्रासोबत शहरात जातो, तिथे बिशन कोमल ( नीतू सिंग) ला भेटतो व किशनला कलाकार आणि  चांगला माणूस होण्यासाठी तयार करायला सांगतो. दरम्यान, बिशनला समजते  की गेल्या 18 वर्षांपासून मामा आणि त्यांच्या मुलाने कौटुंबिक मालमत्तेची पद्धतशीरपणे लूट केली आहे. यशस्वी गायक होण्यासाठी किशनला आपली उरलेली संपत्ती गहाण ठेवायला भाग पाडले जाते. यामुळे बिशन आणि त्याची पत्नी यांच्यात मोठे भांडण होते, ज्याला खात्री आहे की किशन यशस्वी झाल्यास बिशनकडे पाठ फिरवेल. किशनचा पहिला गाण्याचा कार्यक्रम खूप यशस्वी ठरतो  आणि तो त्याचा मित्र बिशनची गहाण ठेवलेली संपत्ती वाचवण्यासाठी त्याची कमाई दान करतो. जेणेकरून त्याची वहिनी आणि प्रिय भाचा (बिशनचा 10 वर्षांचा मुलगा) घरी परत येऊ शकेल.

          किशन पुढे सेलिब्रिटी बनतो आणि कोमल त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करते. दरम्यान, बिशन त्याचा विश्वासघातकी मामा ( जीवन ) आणि चुलत भाऊ ( रणजीत ) यांनी रचलेल्या कटात पडतो . अनेक ओलिसांसह बिशनचे अपहरण केले जाते. तेथे बिशनने मानसिक स्थिरता गमावली आणि छळ आणि छळामुळे तो शॉकमध्ये जातो. त्यानंतर त्याला मानसिक आश्रय दिला जातो आणि नंतर त्याला स्मृतिभ्रंश होतो. किशन मानसिक आजारी असल्याचे भासवून अधिकाऱ्यांना फसवून आश्रयस्थानात प्रवेश करतो. व बिशनची आठवण परत आणतो. ओलिसांच्या पलायनाने चित्रपट संपतो - कुटुंब पुन्हा एकत्र येते आणि विश्वासघातकी लोकांना तुरुंगात पाठवले जाते. 

          अमिताभच्या विनोदी अभिनयामुळे व 'सारा जमाना' या गाण्यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला. 


सुपर हिट गाणे 'सारा जमाना हसींनोका दिवाना'














 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sunday, July 10, 2022

तुकाराम महाराज गाथा - अभंग - जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥

          जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥
          हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥२॥
भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥३॥
        थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥४॥
            तुका म्हणे कृपादानी । फेडि आवडीची धणी ॥५॥

ओवी : जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥ हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥२॥

अर्थ : जो देव केवळ भक्तांचे विश्रांतीस्थान आहे, म्हणून तो उभ्यानेच भक्तजनांस आपणाकडे बोलावीत आहे, ह्याकरिता तुम्ही सर्व त्याच्याकडे धाव घ्या. देवाने आपल्याविषयीचा प्रेमरूपी खाऊ भक्तजनांस देण्याकरिता हाती घेतला आहे. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांवर निस्सीम प्रेम करतो. जो कोणी भक्त संकटात सापडला असेल तर त्याच्या मदतीला धावून जातो व संकटाचे निवारण करतो त्यामुळे त्याचे भक्त निर्धास्तपणे त्याच्यावर विसंबून राहतात. भक्ताने विठ्ठलाजवळ आपले गाऱ्हाणे गावे आणि ते विठ्ठलाने लगेच पूर्ण करावे यातूनच विठ्ठलाचे आपल्या भक्तांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. आपल्या भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, संसारचक्रातून सोडवण्यासाठी, भक्तांची दुःखे हलकी करण्यासाठी व त्यांची गाऱ्हाणी सोडवण्यासाठी विठ्ठल विटेवर उभा आहे. तो आपल्या भक्तांकडे प्रेमाने बघत आहे. जो कोणी भक्त विठ्ठलाकडे जाईल त्याला विठ्ठल आपल्या जवळचे प्रेम भरभरून देत असतो, भक्तांवर माया करत असतो. आपले प्रेम देण्यासाठी व माया करण्यासाठीच विठ्ठल विटेवर उभा राहिला आहे व आपल्या प्रिय भक्तांस बोलावीत आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "जो देव (विठ्ठल) भक्तांचे विश्रांतीस्थान आहे तो देव विटेवर उभा आहे व भक्तजनांस प्रेमरूपी खाऊ देण्याकरीता हाती घेतला आहे. हा खाऊ देण्यासाठी आपल्या प्रिय भक्तांस बोलावीत आहे तरी तुम्ही सर्व त्याच्याकडे धाव घ्या."

ओवी : भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥३॥

अर्थ : तो ह्या संसारसमुद्रातून सुखाने आपल्या कासेस लावून भक्तजनांना पार उतरून नेतो. 

भावार्थ : जे भक्त या संसारचक्रात अडकले आहेत व संसाराच्या मोहपाशात गुंतले आहेत. या भक्तांना संसार म्हणजे सर्वकाही असे वाटत आहे तसेच या भक्तांचे मन बायको-मुले, घर, संपत्ती, नातेवाईक, धन-दौलत यातच गुंतले आहे, यांचा मोह त्यांना सुटत नाही अशा भक्तांना विठ्ठल भक्तीमार्गाने व नामःस्मरणाने संसारसमुद्रातून (संसाराच्या चक्रातून) उतरून नेतो तसेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवून मोक्षगतीला नेतो. 

ओवी : थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥४॥ तुका म्हणे कृपादानी । फेडि आवडीची धणी ॥५॥

अर्थ : ह्याला मोठी भक्तांची इच्छा आहे (आस आहे) ह्याकरिता तो आपल्या भोवताली भक्तजनांची मार्गप्रतिक्षा करीत असतो (राहतो). तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्तांवर कृपा करून त्यांच्यामधील असणाऱ्या आवडीची तृप्तता करितो. 

भावार्थ : विठ्ठलाला आपल्या प्रिय भक्तांच्या भेटीची आस लागली आहे (ओढ लागली आहे). विठ्ठलाचे आपल्या भक्तांवर नितांत प्रेम आहे म्हणूनच त्याला आपल्या भक्तांच्या भेटीची इच्छा आहे. कधी एकदा आपल्या प्रिय भक्तांना भेटतो व त्यांना प्रेमाने आलिंगन देतो व त्यांची गळाभेट घेतो असे विठ्ठलाला झाले आहे म्हणूनच विठ्ठल आपल्या भक्तांची वाट बघत (मार्गप्रतिक्षा करीत) विटेवर उभा आहे. 

          विठ्ठलाचे सावळे, सुंदर, गोजिरे रूप दिसावे व विठ्ठलाने आपल्याला भरभरून प्रेम द्यावे हि प्रत्येक भक्ताची इच्छा असते, आवड असते. यासाठी प्रत्येक भक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीला धाव घेत असतो व तिथे गेल्यावर विठ्ठलाचे सावळे, सुंदर, गोजिरे विटेवर उभे असलेले रूप पाहिल्यावर धन्य होत असतो, समाधानी होतो, तृप्त होतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "जो भक्त विठ्ठलभेटीसाठी जातो त्याच्यावर देव कृपा करून त्यांच्यामधील असणाऱ्या आवडीची तृप्तता करितो."

















 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Saturday, July 9, 2022

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पाहात ।।

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पाहात ।।

    बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पाहात ।।

कर ठेवूनियां कटी । उभा चंद्रभागे तटी ।।

  गळा वैजयंतीमाळा । रूपे डोळस सांवळा ।।

    तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ।।

ओवी :  बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पाहात ।। कर ठेवूनियां कटी । उभा चंद्रभागे तटी ।।

अर्थ : दीनांचा पालक तो परमेश्वर तो माझा बाप असून भक्तांची वाट पाहात आहे. तो देव कंबरेवर हात ठेवून चंद्रभागेच्या काठी उभा राहिला आहे. 

भावार्थ : दीनांचा पालक तो परमेश्वर म्हणजे विठ्ठल हा सर्व जनांचा म्हणजेच गोर-गरीब, दीन-दुबळे,   रंजले-गांजलेले, सर्व जाती-धर्माच्या लोकांचा रक्षणकर्ता आहे, पालक आहे. सर्व जनतेचा संकट निवारणकर्ता आहे. विठ्ठल आपल्या भक्तांची वाट बघत कंबरेवर हात ठेवून चंद्रभागेच्या काठी उभा राहिला आहे. विठ्ठलाला आपल्या भक्तांच्या भेटीची आस लागली आहे. कधी एकदा आपल्या आवडत्या भक्तांना भेटतो व प्रेमाने मिठी मारतो असे विठ्ठलाला झालेले आहे. विठ्ठल भक्तांच्या प्रेमाचा भुकेला आहे. या प्रेमापोटीच विठ्ठल आपल्या भक्तांची वाट बघत कंबरेवर हात ठेवून चंद्रभागेच्या काठी उभा राहिला आहे. 

ओवी :  गळा वैजयंतीमाळा । रूपे डोळस सांवळा ।। तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ।।

अर्थ : त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे व त्याचे रूप सावळे असून डोळ्यांनी पाहण्याला योग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी भक्त भेटीस येतील त्यास आलिंगन देण्याकरिता आपले बाहू उभारिले आहेत. 

भावार्थ : विठ्ठलाचे रूप कसे आहे तर सावळे, सुंदर, मनोहारी आहे. डोळ्यांना सुखावणारे आहे. गळ्यात तुळशीमाळा आहेत, कंठामध्ये वैजयंती माळ झळकत आहे, कपाळाला कस्तुरी मळवट भरला आहे तर कानात मकर कुंडले घातली आहेत. डोक्यावर सोनेरी मुकुट झळकत आहे व अंगावर शेला पांघरला आहे. कमरेला पीतांबर नेसला आहे. दोन्ही हात कटीवर ठेवून विटेवर उभा आहे व भक्तांकडे प्रेमाने बघत आहे असे हे विठ्ठलाचे लाघवी रूप आहे व डोळ्यांनी पाहण्याला योग्य आहे. हे रूप पाहिल्याबरोबर मनाचे समाधान होते. आत्मिक आनंद मिळतो. 

          विठ्ठल आपल्या भक्तांच्या भेटीसाठी आतुर झाला आहे. त्याला भक्तांच्या भेटीची ओढ लागली आहे. आपल्या भक्तांना कधी एकदा भेटतो व प्रेमाने आपल्या बाहुपाशात घेतो असे त्याला झाले आहे म्हणूनच जे कोणी भक्त भेटीस येतील त्यास आलिंगन देण्याकरिता (मिठी मारण्याकरिता) त्याने आपले बाहू (हात) उभारिले आहेत.

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...