तुकाराम महाराज गाथा - अभंग - जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥
जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥
हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥२॥
भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥३॥
थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥४॥
तुका म्हणे कृपादानी । फेडि आवडीची धणी ॥५॥
ओवी : जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥ हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥२॥
अर्थ : जो देव केवळ भक्तांचे विश्रांतीस्थान आहे, म्हणून तो उभ्यानेच भक्तजनांस आपणाकडे बोलावीत आहे, ह्याकरिता तुम्ही सर्व त्याच्याकडे धाव घ्या. देवाने आपल्याविषयीचा प्रेमरूपी खाऊ भक्तजनांस देण्याकरिता हाती घेतला आहे.
भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांवर निस्सीम प्रेम करतो. जो कोणी भक्त संकटात सापडला असेल तर त्याच्या मदतीला धावून जातो व संकटाचे निवारण करतो त्यामुळे त्याचे भक्त निर्धास्तपणे त्याच्यावर विसंबून राहतात. भक्ताने विठ्ठलाजवळ आपले गाऱ्हाणे गावे आणि ते विठ्ठलाने लगेच पूर्ण करावे यातूनच विठ्ठलाचे आपल्या भक्तांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. आपल्या भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, संसारचक्रातून सोडवण्यासाठी, भक्तांची दुःखे हलकी करण्यासाठी व त्यांची गाऱ्हाणी सोडवण्यासाठी विठ्ठल विटेवर उभा आहे. तो आपल्या भक्तांकडे प्रेमाने बघत आहे. जो कोणी भक्त विठ्ठलाकडे जाईल त्याला विठ्ठल आपल्या जवळचे प्रेम भरभरून देत असतो, भक्तांवर माया करत असतो. आपले प्रेम देण्यासाठी व माया करण्यासाठीच विठ्ठल विटेवर उभा राहिला आहे व आपल्या प्रिय भक्तांस बोलावीत आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "जो देव (विठ्ठल) भक्तांचे विश्रांतीस्थान आहे तो देव विटेवर उभा आहे व भक्तजनांस प्रेमरूपी खाऊ देण्याकरीता हाती घेतला आहे. हा खाऊ देण्यासाठी आपल्या प्रिय भक्तांस बोलावीत आहे तरी तुम्ही सर्व त्याच्याकडे धाव घ्या."
ओवी : भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥३॥
अर्थ : तो ह्या संसारसमुद्रातून सुखाने आपल्या कासेस लावून भक्तजनांना पार उतरून नेतो.
भावार्थ : जे भक्त या संसारचक्रात अडकले आहेत व संसाराच्या मोहपाशात गुंतले आहेत. या भक्तांना संसार म्हणजे सर्वकाही असे वाटत आहे तसेच या भक्तांचे मन बायको-मुले, घर, संपत्ती, नातेवाईक, धन-दौलत यातच गुंतले आहे, यांचा मोह त्यांना सुटत नाही अशा भक्तांना विठ्ठल भक्तीमार्गाने व नामःस्मरणाने संसारसमुद्रातून (संसाराच्या चक्रातून) उतरून नेतो तसेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवून मोक्षगतीला नेतो.
ओवी : थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥४॥ तुका म्हणे कृपादानी । फेडि आवडीची धणी ॥५॥
अर्थ : ह्याला मोठी भक्तांची इच्छा आहे (आस आहे) ह्याकरिता तो आपल्या भोवताली भक्तजनांची मार्गप्रतिक्षा करीत असतो (राहतो). तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्तांवर कृपा करून त्यांच्यामधील असणाऱ्या आवडीची तृप्तता करितो.
भावार्थ : विठ्ठलाला आपल्या प्रिय भक्तांच्या भेटीची आस लागली आहे (ओढ लागली आहे). विठ्ठलाचे आपल्या भक्तांवर नितांत प्रेम आहे म्हणूनच त्याला आपल्या भक्तांच्या भेटीची इच्छा आहे. कधी एकदा आपल्या प्रिय भक्तांना भेटतो व त्यांना प्रेमाने आलिंगन देतो व त्यांची गळाभेट घेतो असे विठ्ठलाला झाले आहे म्हणूनच विठ्ठल आपल्या भक्तांची वाट बघत (मार्गप्रतिक्षा करीत) विटेवर उभा आहे.
विठ्ठलाचे सावळे, सुंदर, गोजिरे रूप दिसावे व विठ्ठलाने आपल्याला भरभरून प्रेम द्यावे हि प्रत्येक भक्ताची इच्छा असते, आवड असते. यासाठी प्रत्येक भक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीला धाव घेत असतो व तिथे गेल्यावर विठ्ठलाचे सावळे, सुंदर, गोजिरे विटेवर उभे असलेले रूप पाहिल्यावर धन्य होत असतो, समाधानी होतो, तृप्त होतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "जो भक्त विठ्ठलभेटीसाठी जातो त्याच्यावर देव कृपा करून त्यांच्यामधील असणाऱ्या आवडीची तृप्तता करितो."
No comments:
Post a Comment