Saturday, July 9, 2022

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पाहात ।।

तुकाराम महाराज गाथा - अभंग - बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पाहात ।।

    बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पाहात ।।

कर ठेवूनियां कटी । उभा चंद्रभागे तटी ।।

  गळा वैजयंतीमाळा । रूपे डोळस सांवळा ।।

    तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ।।

ओवी :  बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पाहात ।। कर ठेवूनियां कटी । उभा चंद्रभागे तटी ।।

अर्थ : दीनांचा पालक तो परमेश्वर तो माझा बाप असून भक्तांची वाट पाहात आहे. तो देव कंबरेवर हात ठेवून चंद्रभागेच्या काठी उभा राहिला आहे. 

भावार्थ : दीनांचा पालक तो परमेश्वर म्हणजे विठ्ठल हा सर्व जनांचा म्हणजेच गोर-गरीब, दीन-दुबळे,   रंजले-गांजलेले, सर्व जाती-धर्माच्या लोकांचा रक्षणकर्ता आहे, पालक आहे. सर्व जनतेचा संकट निवारणकर्ता आहे. विठ्ठल आपल्या भक्तांची वाट बघत कंबरेवर हात ठेवून चंद्रभागेच्या काठी उभा राहिला आहे. विठ्ठलाला आपल्या भक्तांच्या भेटीची आस लागली आहे. कधी एकदा आपल्या आवडत्या भक्तांना भेटतो व प्रेमाने मिठी मारतो असे विठ्ठलाला झालेले आहे. विठ्ठल भक्तांच्या प्रेमाचा भुकेला आहे. या प्रेमापोटीच विठ्ठल आपल्या भक्तांची वाट बघत कंबरेवर हात ठेवून चंद्रभागेच्या काठी उभा राहिला आहे. 

ओवी :  गळा वैजयंतीमाळा । रूपे डोळस सांवळा ।। तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ।।

अर्थ : त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे व त्याचे रूप सावळे असून डोळ्यांनी पाहण्याला योग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी भक्त भेटीस येतील त्यास आलिंगन देण्याकरिता आपले बाहू उभारिले आहेत. 

भावार्थ : विठ्ठलाचे रूप कसे आहे तर सावळे, सुंदर, मनोहारी आहे. डोळ्यांना सुखावणारे आहे. गळ्यात तुळशीमाळा आहेत, कंठामध्ये वैजयंती माळ झळकत आहे, कपाळाला कस्तुरी मळवट भरला आहे तर कानात मकर कुंडले घातली आहेत. डोक्यावर सोनेरी मुकुट झळकत आहे व अंगावर शेला पांघरला आहे. कमरेला पीतांबर नेसला आहे. दोन्ही हात कटीवर ठेवून विटेवर उभा आहे व भक्तांकडे प्रेमाने बघत आहे असे हे विठ्ठलाचे लाघवी रूप आहे व डोळ्यांनी पाहण्याला योग्य आहे. हे रूप पाहिल्याबरोबर मनाचे समाधान होते. आत्मिक आनंद मिळतो. 

          विठ्ठल आपल्या भक्तांच्या भेटीसाठी आतुर झाला आहे. त्याला भक्तांच्या भेटीची ओढ लागली आहे. आपल्या भक्तांना कधी एकदा भेटतो व प्रेमाने आपल्या बाहुपाशात घेतो असे त्याला झाले आहे म्हणूनच जे कोणी भक्त भेटीस येतील त्यास आलिंगन देण्याकरिता (मिठी मारण्याकरिता) त्याने आपले बाहू (हात) उभारिले आहेत.

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...