तुकाराम महाराज गाथा - अभंग - अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति | मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ||१||
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं | न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ||२||
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें | बैसलों धरणें । हाका देत दाराशी ||३||
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला | आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ||४||
ओवी : अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति | मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ||१||
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं | न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ||२||
अर्थ : देवा, तुमच्याविषयीची प्रीती ज्यांच्यामध्ये निरंतर आहे, अशा भक्तांची संगती मला द्या. अहो कमळापती (लक्ष्मीपती) मग तुमच्याजवळ अधिक काही मागण्याचा मी तुम्हाला त्रास देणार नाही. त्या संतांच्या पायाजवळ मी उगाच पडून राहीन. दुसरे काही मागणार नाही आणि करणारही नाही ह्याबद्दल विठोबा तुमचीच शपथ वाहतो.
भावार्थ : ज्या भक्तांच्या, संतांच्या मनामध्ये विठ्ठलाबद्दल अपार प्रेम (प्रीति) आहे असे भक्त, संत नित्यनियमाने विठ्ठलाचे नामस्मरण करतात, त्याचे भजन-कीर्तन गातात, त्याच्या भक्तीमध्ये रममाण होतात अशा भक्त व संतांचा सहवास (संगती) घडावा असे तुकाराम महाराजांना वाटते. या भक्तांचा, संतांचा सहवास घडल्याने तुकाराम महाराजांचे मनही भक्तीमार्गाकडे धावेल. मनात विठ्ठलाचे विचार येतील. संतांचा सहवास घडल्याने चार भक्तीपर शब्द ऐकायला मिळतील. संतांची संगत घडल्याने मनातील मळभ निघून जावून मन स्वच्छ, निर्मळ होईल. त्यांचे जीवन सुखकर होईल. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, 'तुमच्याविषयीची प्रीती ज्यांच्यामध्ये निरंतर आहे, अशा भक्तांची संगती मला द्या. त्यांच्या पायाजवळ मी उगाच पडून राहीन. यांची संगत मिळाल्यावर मी तुमच्याजवळ काही मागणार नाही.(अधिक मागण्याचा तुम्हाला त्रास देणार नाही).' म्हणजेच ज्यांच्या मनामध्ये विठ्ठलाबद्दल अपार प्रेम, भक्ती आहे अशा भक्तांची (संतांची) संगत मिळावी, त्यांचा सहवास घडावा एवढीच त्यांची विठ्ठलाकडून अपेक्षा आहे, बाकी त्यांना विठ्ठलाकडून कुठलीही अपेक्षा नाही म्हणूनच ते म्हणतात कि, 'मी तुमच्याकडून दुसरे काही मागणार नाही आणि करणारही नाही ह्याबद्दल विठोबा तुमचीच शपथ वाहतो.'
ओवी : तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें | बैसलों धरणें । हाका देत दाराशी ||३||
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला | आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ||४||
अर्थ : आम्ही निरंतर तुमच्याकडे येऊन काही मागण्याची कटकट लावितो, त्यापासून तुम्हाला पीडा होते व वारंवार तुमच्याकडे येवून आम्हालाही वटवट करण्याची पीडा होते. आमचे जे काही मागणें आहे, त्याप्रमाणे दिलेत तर आपल्या उभयतांच्या पीडा दूर होतील, आणि ते मिळावे म्हणून तुमच्या दाराशी सारखे धरणे करून हांका मारीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो, 'विठ्ठला ह्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे व आमचा त्याग आपणाकडून होता कामा नये.
भावार्थ : तुकाराम महाराज सारखे विठ्ठलाकडे जाऊन संतांची संगत घडावी, त्यांचा सहवास घडावा म्हणून मागणे मागत आहेत. विठ्ठलाच्या दाराशी जावून धरणे धरत आहेत. आपल्या जाण्याने व विठ्ठलाकडून सारखे मागण्यामुळे विठ्ठलाला पीडा होते, त्रास होतो असे तुकाराम महाराजांना वाटत आहे व त्यांनाही सारखे-सारखे विठ्ठलाकडे जावून व त्याच्याकडे मागणे मागून पीडा होत आहे म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात की, 'आमचे जे काही मागणें आहे (संतांची भेट घडावी हे मागणे) ते पुर्ण केले तर आपल्या उभयतांची (दोघांची) पीडा दूर होईल, दोघांनाही त्रास होणार नाही.' तसेच तुकाराम महाराज म्हणतात, अहो, 'विठ्ठला ह्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे व आमचा त्याग आपणाकडून होता कामा नये.'
No comments:
Post a Comment