Sunday, August 14, 2022

तुकाराम महाराज गाथा - अभंग - साधनें तरी हींच दोन्ही ।

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - साधनें तरी हींच दोन्ही ।

        साधनें तरी हींच दोन्ही । जरी कोणी साधील ।। १ ।।

परद्रव्य परनारी । यांचा धरी विटाळ ।। २ ।।

    देव भाग्ये घरा येती । संपत्ती त्या सकळा ।। ३ ।।

  तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ।। ४ ।।

ओवी : साधनें तरी हींच दोन्ही । जरी कोणी साधील ।। १ ।। परद्रव्य परनारी । यांचा धरी विटाळ ।। २ ।।

अर्थ : परमार्थ इच्छिणाऱ्याने पुढील दोन साधने साधावीत. ती ही की, दुसऱ्याचे धन व दुसऱ्याची स्त्री ह्या दोहींचा विटाळ धरावा. 

भावार्थ : परमार्थ साधणे म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेने केलेले कर्म. परमार्थ साधताना मनात लोभ, आशा, स्वार्थ या गोष्टी नसाव्यात. मन स्वच्छ, निर्मळ असावे. परमार्थ साधण्याच्या वेळेस दातृत्वाची भावना असावी. अशा वेळेस फायदा-तोट्याचा विचार करू नये. 

          ज्याला परमार्थ करण्याची इच्छा आहे त्याने दुसऱ्याचे धन व दुसऱ्याची स्त्री ह्या दोहोंचा विटाळ धरावा. याचा अर्थ असा होतो कि, जर दुसऱ्याचे धन आपल्याला मिळावे अशी अपेक्षा मनात धरली तर तो स्वार्थी भाव होतो. मुळात परमार्थ इच्छिणाऱ्याने दुसऱ्याचे धन बळकाविण्याचे मनात आणले तर परमार्थ करण्याच्या विरुद्ध आहे. परमार्थामध्ये आपल्याजवळ असलेले सर्व काही निःसंकोचपणे दुसऱ्याला (गरजू व्यक्तीला) देणे हे तत्व पाळावे लागते. याबाबतीत कर्णाचे उदाहरण उत्तम आहे. कर्ण दातृत्वाच्या बाबतीत (दुसऱ्यांना व गरजू लोकांना देण्याच्या बाबतीत) प्रसिद्ध होता. कर्ण दातृत्व करता करता परमार्थ साधत होता. 

          दुसऱ्याच्या स्त्रीबद्दल किंवा तिला वश करण्याबद्दल (तिला मिळवण्याबद्दल) मनात आशा बाळगणे म्हणजे मनात वासना निर्माण होणे होय. जेव्हा मनात वासना निर्माण होते तेव्हा मन कलुषित होते. मनात वाईट विचार येतात. मन भरकते. चांगल्या विचारांपासून परावृत्त होते (दूर जाते) म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "परमार्थ इच्छिणाऱ्याने पुढील दोन साधने साधावीत. ती ही की, दुसऱ्याचे धन व दुसऱ्याची स्त्री ह्या दोहींचा विटाळ धरावा म्हणजेच मनात विचार आणू नये."

ओवी : देव भाग्ये घरा येती । संपत्ती त्या सकळा ।। ३ ।। तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ।। ४ ।।

अर्थ : त्याच्या घरी देवाचे भाग्य आणि सकळ संपत्ती येतील. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पुरुषाचा देह केवळ देवाचे भांडारगृह आहे. 

भावार्थ : ज्याच्या मनात परमार्थ करण्याचा विचार आहे व जो माणूस दुसऱ्याचे धन व दुसऱ्याची स्त्री मिळवण्याबाबत विटाळ धरतो त्याचे मन पवित्र, निर्मळ असते. त्याच्या मनात लोभ, आशा, वासना असले विचार येत नाहीत. अशा माणसाच्या मनात नेहमी सतविचार (सात्विक किंवा चांगले विचार) येतात. अशी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे धन विषासमान व दुसऱ्याची स्त्री माऊलीसमान मानते. या व्यक्तींच्या मनात सतत दुसऱ्यांचे चांगले कसे होईल, आपल्या मदतीमुळे दीन-दुबळ्या, गरजू लोकांना आनंद कसा वाटेल, त्यांचे समाधान कसे होईल हेच विचार चाललेले असतात. या विचारांमुळेच त्यांचे अंतःकरण शुद्ध होते. देवालाही नेहमी अशाच व्यक्ती आवडतात. देव अशा व्यक्तींच्याच हृदयात वास करून राहतो. संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, सावतामाळी, नामदेव, एकनाथ, जनाई, मुक्ताई या संतांनीही कधीही धन, संपत्तीबाबत आशा बाळगली नाही कि मनात लोभ धरला नाही. त्यांनी प्रत्येक स्त्री हि माऊलीसमान मानली. या संतांच्या मनात नेहमी विठ्ठलभक्तीचेच विचार असायचे यामुळे आशा, लोभ, वासना, स्वार्थ या गोष्टींना थारा नसायचा. यांचे मन पवित्र, शुद्ध व निर्मळ असल्याने देवाने यांच्या हृदयात वास केला. 

          जे लोक या संतांप्रमाणे वागतील त्यांचे घरी देवाचे भाग्य व सुख, आनंद, समाधान, आत्मशांतता अशी सकळ संपत्ती येईल. यांच्या हृदयात देव वास करून राहील. यांचा देह म्हणजे देवाचे भंडारगृह होईल.









          

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...