Monday, December 13, 2021

 

 तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- वळीते जे गाई । त्यासि फार लागे काही ।।

वळीते जे गाई । त्यासि फार लागे काही ।। १ ।।

निवे भावाचे उत्तरी । भलते एके धणीवरी ।। २ ।।

न लगती प्रकार । काही मानाचा आदर ।। ३ ।।

सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ।। ४ ।।

ओवी : वळीते जे गाई । त्यासि फार लागे काही ।। १ ।। निवे भावाचे उत्तरी । भलते एके धणीवरी ।। २ ।।

अर्थ : जे केवळ गाई वळणारे परम भाविक गोपाळ त्यांना देवाला प्रसन्न करण्याविषयी फारसे द्रव्य, गंध, फुले वैगेरे अलंकाराची जरूर पडली नाही. केवळ त्यांच्या भावाने भरलेल्या प्रेमपर शब्दाने हरी शांत होतात. 

भावार्थ : या ओवीतून गोपाळांनी केलेली हरीची भक्ती किंवा पुजाविषयी तुकाराम महाराज सांगतात कि, जे गाई वळणारे गोपाळ आहेत त्यांना देवाला (हरीला) प्रसन्न करण्यासाठी द्रव्य, गंध, फुले वैगेरे अलंकाराची जरूर पडली नाही उलट गोपाळ देवाशी प्रेमाने चार शब्द बोलायचे व देवाबरोबर आनंदाने रहायचे. गोपाळ आपल्यातीलच एक असे मानून आपल्या घासातील घास हरीला द्यायचे. हरीसुद्धा गोपाळांनी दिलेला प्रेमाचा घास घेऊन व त्यांच्याबरोबर राहून तृप्त व्हायचे. गोपाळांचा प्रेमभाव बघून व अमृतबोल ऐकून हरी मनातून आनंदीत व्हायचे. 

ओवी :  न लगती प्रकार । काही मानाचा आदर ।। ३ ।। सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ।। ४ ।।

अर्थ : देवाला संतुष्ट करण्याला मान करणे किंवा आदरातिथ्य करणे हे सर्व प्रकार त्यांना करावे लागत नाहीत. तुकाराम महाराज  म्हणतात, देव आपल्यामधला मोठेपणा टाकून या दिनांच्या बरोबर असतात. 

भावार्थ : गोपाळांचा प्रेमभाव बघूनच हरी आपल्यामधला मोठेपणा टाकून या गरीब गोपाळांबरोबर रहातो व त्यांच्याबरोबर आनंदाने जेवतो. यासाठी हरीला संतुष्ट करण्यासाठी मानसन्मानाची व आदरातिथ्याची गरज भासत नाही फक्त एक प्रेमभाव पुरेसा होतो. तुकाराम महाराजांना असे वाटते कि हरीची भक्ती करावी ती गोपाळांसारखी. भक्तीमुळे गोपाळ व हरी एकरूप झाले. दोघांमधील प्रेमभाव वाढू लागला. त्यामुळे हरी आपला मोठेपणा विसरून गरीब गोपाळांबरोबर खेळू लागला व जेवू लागला. त्यांच्यातीलच एक होवून गेला. आपणही जर गोपाळांसारखी भक्ती केली तर देव आपल्यावर संतुष्ट होवून आपल्याबरोबर राहील.












 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sunday, December 12, 2021

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- दाने कापे हाथ । नावडे तेविशी मात ।।

 


 

 तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- दाने कापे हाथ । नावडे तेविशी मात ।।

दाने कापे हाथ । नावडे तेविशी मात ।। १ ।।

           कथी चावटीचे बोल । हिंग क्षीर मिथ्या फोल ।। २ ।।

  न वजती पाय । तीर्था म्हणे वेंचो काय ।। ३ ।।

         तुका म्हणे मनी नाही । नये आकारते काही ।। ४ ।।

ओवी : दाने कापे हाथ । नावडे तेविशी मात ।। १ ।। कथी चावटीचे बोल । हिंग क्षीर मिथ्या फोल ।। २ ।।

अर्थ : ज्याचा हात काही दानधर्म करण्याचे वेळेस थरथर कापतो. दानधर्म करा असे कोणी त्याला सांगितले तर ती गोष्टही आवडत नाही. नेहमी चावटपणाची भाषणे कथन करतो, ज्याप्रमाणे हिंग दुधामध्ये घालणे तद्वतच ती भाषणे खोटी व फोलकट आहेत. 

भावार्थ : तुकाराम महाराजांनी या ओवीतून कंजूष व परोपकार न करणाऱ्या माणसाबद्दल सांगितले आहे कि, जो माणूस आपल्याकडे भरपूर संपत्ती असतानासुद्धा गोर-गरिबांना, लुळ्या-पांगळ्यांना, गरजू लोकांना मदत किंवा दानधर्म करत नाही. त्याच्याकडे कोणी मदत मागण्यासाठी गेले असता मदतीचा हात पुढे करत नाही. दानधर्म करण्याऐवजी गरिबांना दूर लोटतो. त्यांना वाट्टेलतसे बोलून त्यांचा अपमान करतो. त्याच्या हाताला दानधर्म करण्याचे वेळेस कंप सुटतो (थरथर कापतो). त्याला दानधर्म करण्याविषयी सांगितले तर ती गोष्ट आवडत नाही. तोंड वेडेवाकडे करतो. उलट दुसऱ्यांजवळ श्रीमंतीच्या बढाया मारतो, 'मी असे केले, मी तसे केले', असे खोटे खोटे सांगतो व आपला बडेजावपणा दाखवतो. ज्याप्रमाणे दुधामध्ये हिंग घालणे त्याप्रमाणे तुकाराम महाराजांना या बढाया (भाषणे) खोटया व निरर्थक (फोलकट) वाटतात. 

ओवी : न वजती पाय । तीर्था म्हणे वेंचो काय ।। ३ ।। तुका म्हणे मनी नाही । नये आकारते काही ।। ४ ।।

अर्थ : ज्याचे पाय तीर्थांकडे जातही नाहीत त्यास कोणी म्हणले, तू तीर्थयात्रा का करीत नाहीस तर त्याचे कारण सांगतो कि, मजजवळ खर्च करण्यास पैसा नाही. एखादी गोष्ट एखाद्याचे मनात नसेल तर कधीही त्याच्याकडून घडणार नाही. 

भावार्थ : तुकाराम महाराजांच्या मते जे कंजूष आहेत व ज्यांच्यासाठी पैसा प्रिय आहे असे लोक आपल्याजवळील पैसा खर्च होऊ नये म्हणून तीर्थयात्रा करत नाहीत. त्यांच्या मनातही कधी येत नाही कि देवदर्शनाला जावून देवाचे दर्शन घेवू. अशा लोकांना देवदर्शनाला येण्याबद्दल विचारले असता त्यांना आपल्याजवळील पैसा खर्च होईल असे वाटते म्हणून ते 'माझ्याकडे खर्च करण्यास पैसा नाही' असे खोटे सांगतात. अशा लोकांच्या हातून चांगल्या कामासाठी पैसा कधी सुटत नाही. अशा लोकांच्या मनात पैसा खर्च करून दानधर्म करावा किंवा तीर्थयात्रेला जावे असे कधीही येणार नाही व त्यांचेकडून असे कधीही घडणार नाही.














 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Saturday, December 11, 2021

कालिया -- घणाघाती संवादाचा नजराणा

कालिया -- घणाघाती संवादाचा नजराणा 

          हा चित्रपट २५ डिसेंबर १९८१ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते इकबाल सिंग असून टिनू आनंदने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा इंदर राज आनंद व टिनू आनंद यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून राहुल देव बर्मन यांनी संगीतबध्द केली आहेत. आशा भोसले, किशोर कुमार, मोहमद रफी यांनी स्वरबद्ध केली आहेत. 

          अमिताभ बच्चन, आशा पारेख, परवीन बॉबी, कादर खान, अमजद खान, प्राण यांच्या मुख्य भुमिका आहेत. ह्या एकमेव चित्रपटात अमिताभ आणि आशा पारेख यांनी एकत्र काम केले. 

          अमिताभच्या 'अँग्री यंग मॅन' च्या पठडीतला हा आणखी एक चित्रपट. या चित्रपटामुळे अमिताभला 'सुपरस्टार' बिरुदावली चिटकवली गेली. या चित्रपटातील 'जहाँ तेरी ये नजर है' हे गाणे लोकप्रिय झाले व त्याकाळात पार्टी व नाईट क्लब मध्ये वाजवले गेले. किशोर कुमार व आशा भोसले यांनी गायलेले व अमिताभ व परवीन बॉबीवर या चित्रपटात अमिताभ व प्राणची जुगलबंदी दाखवली आहे. अमिताभ पहिल्यांदा साधाभोळा दाखवला आहे तेव्हा तो कल्लू असतो व अपराधी दुनियेत जातो तेव्हा कालिया बनतो. प्राण जेलरच्या भूमिकेत दाखवला आहे. 

थोडक्यात कथानक

           कल्लू  ( अमिताभ बच्चन ) त्याचा मोठा भाऊ शामू ( कादर खान ), वहिनी शांती ( आशा पारेख ) आणि त्यांची धाकटी मुलगी मुन्नी यांच्यासोबत राहतो. तो आपला वेळ शेजारच्या मुलांसोबत खेळण्यात घालवतो. त्याचा मोठा भाऊ गिरणीत काम करताना हात गमावतो. त्याची नोकरी जाते आणि आता त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे. कालिया  भावाच्या बॉसजवळ म्हणजेच सहानी सेठजवळ  ( अमजद खान ) भावाच्या उपचारासाठी पैशाची भीक मागतो , पण तो नकार देतो. पैसे मिळवण्यासाठी कालिया सहानीच्या तिजोरीत शिरतो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि उपचाराअभावी भाऊ मरण पावतो. सहानी चोरीच्या गुन्ह्यासाठी कालियाला तुरुंगात पाठवतो. तेथे त्याला नऊ महिन्यांची शिक्षा झाली आहे. इथेच त्याला गुन्हेगारीच्या जगात नेणारे पुरुष भेटतात. जेल मधून सुटल्यानंतर कल्लूचा कालिया झालेला असतो. 

            तो आणि त्याचे साथीदार गिरणीच्या मालकाने तस्करीसाठी ठेवलेले सोने चोरतात. त्यानंतर भावाच्या मृत्यूचा बदला म्हणून तो गिरणी जाळतो. त्याला पुन्हा दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठवले जाते. त्याचे साथीदार त्याच्या वहिनीला पैसे देतात व खोटे बोलतात की तो तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठी अमेरिकेत खूप पैसे कमवत आहे. ते गरीबाकडून श्रीमंताकडे जातात. तुरुंगात, कालिया जेलर ( प्राण ) ला भेटतो, ज्याची मुलगी लहान असताना एका कैद्याने तिचे अपहरण केले होते. कालिया तुरुंगातून सुटल्यानंतर, तो बदला घेण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी एका महिलेला भेटतो ( परवीन बाबी) सह एकत्रित केले आहे. मिल मालक आता कालियाच्या भाचीचे अपहरण करतो आणि तिच्या आईला खुनाच्या खटल्यात कालियाविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडतो. त्याने न केलेल्या हत्येसाठी तो दोषी आढळतो आणि आपल्या भाचीला शोधण्यासाठी तुरुंगातून पळून जातो. सुरुवातीला, वॉर्डन कालियाच्या मागे जातो आणि जेव्हा त्याला त्याची खरी कहाणी कळते, तेव्हा तो त्याला मदत करण्याचा निर्णय घेतो. ते गिरणी मालकाच्या जागी जातात आणि त्यांना कळते की त्या चिमुरडीबरोबरच भाभीचाही मृत्यू होणार आहे. कालिया गुंडांबरोबर हाणामारी करतो आणि लहान मुलीला व भाभीला गुंडांच्या तावडीतून सोडवितात.

 

अमिताभचा जेलमधील सुपरहिट सीन --

          जेलमध्ये जेवण घेण्यासाठी कैद्यांची एक लाईन असते. कैदी नंबरप्रमाणे आपापले जेवण घेत असतात. त्यातीलच एक कैदी (प्यारेलाल) जेवण घेत असतो तेवढयात बॉब केष्टो येतो व म्हणतो, 'जीस थाली में हाथ रखा है, ओ थाली मेरी है', प्यारेलाल म्हणतो, 'तुम्हारी कैसी होगी, तुम तो लाइनमेही नही हो', बॉब केष्टो म्हणतो, 'हम जहाँ खडे होते है लाईन वहींसें सुरु होती है' असे म्हणून इतर कैदयांकडे बघतो. कैदी गुपचूप बॉब केष्टोच्या मागे येऊन उभे राहतात. बॉब केष्टो प्यारेलालला ढकलून देतो व दुसऱ्या कैद्याच्या हातातील थाळी हिसकावून घेतो तेवढयात अमिताभ येतो व बॉब केष्टोच्या हातातील थाळी घेतो व म्हणतो, ' इस थाली पे  तुम्हारा नाम नही, हमारा नाम लिखा है', बॉब केष्टो अमिताभला विचारतो, 'कौन हो तुम ?', अमिताभ त्याला म्हणतो, 'हमी भी ओ है, कभी किसीके पीछे खडे नहीं होते, जहाँ खडे हो जाते है लाईन वही सें शुरु होती है' नंतर दोघांमध्ये मारामारी होते. हा प्रसंग व यातील 'जहाँ खडे हो जाते है लाईन वही सें शुरु होती है' हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला. 

अमिताभचे दमदार संवाद --

          अमिताभचा सिनेमा म्हणलं कि त्यात दमदार संवाद आलेच. अमिताभच्या चित्रपटात संवाद नसेल तर तो चित्रपट कसला. संवादाविना अमिताभचे चित्रपट अपुरेच आहेत. अमिताभच्या चित्रपटात संवादाची खमंग फोडणी हवीच, ती या चित्रपटातही होती. अमिताभचे खमंग व दमदार संवाद पुढीलप्रमाणे 

१)  'हमी भी ओ है, कभी किसीके पीछे खडे नहीं होते, जहाँ खडे हो जाते है लाईन वही सें शुरु होती है' 

२) आप ने जेल कि दिवारों और जंजिरो का  लोहा देखा है जेलर साहब ... कालिया कि हिम्मत का फौलाद नही देखा 

३) ये सर किसी इन्सान के सामने नही झुक सकता जेलरसाब... झुकेगा तो उसकी चौकट पे... या उसकी दरबार मे झुकेगा 

४) तुम्हारा बाप सहानी कहाँ है... बीताओ वरना गोली चल गयी तो... सारा आता पता पूछ कर वापस आ जायेगी 

५) दुनिया से मुझे कुछ हिसाब चुकाने है... एक बार चूक जाये उसके बाद आराम हि आराम है

 

 

 


 अमिताभचा जेलमधील सुपरहिट सीन -- हम जहाँ खडे हो जाते है लाईन वही सें शुरु होती है

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 











Friday, December 10, 2021

सुहाग -- गाणी व नृत्याचा उत्कृष्ठ मिलाफ

 सुहाग -- गाणी व नृत्याचा उत्कृष्ठ मिलाफ

           हा चित्रपट १६ नोव्हेंबर १९७९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता प्रकाश त्रेहन, शक्ती सुभाष व रमेश शर्मा असून दिग्दर्शक मनमोहन देसाई आहेत. या चित्रपटाची कथा प्रयाग राज यांनी लिहिली असून पटकथा के के शुक्ला यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबध्द केली आहेत. मोहमद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, शैलेंद्र यांनी गाणी गायली आहेत. 

          अमिताभ बच्चन, रेखा, शशी कपूर, परवीन बॉबी, निरुपा रॉय, अमजद खान, जीवन, रंजित, कादर खान यांच्या प्रमुख भुमिका आहेत. 

           अमिताभने या चित्रपटात अशिक्षित गुंडाची भूमिका केली आहे तर शशी कपूरने पोलीस इन्स्पेक्टरची भुमिका केली आहे. एका प्रसंगानंतर दोघेही चांगले मित्र बनतात. शशी कपूरचे डोळे जातात तेव्हा अमिताभ गुंडांशी लढण्यासाठी शशी कपूरला सहकार्य करतो. अमिताभ व शशी कपूर यांच्या मैत्रीचा दाखला देण्यासाठी दोघांवर 'ये यार सुन यारी तेरी' हे गाणे चित्रित केले. शोलेतील 'ये दोस्ती हम नही तोडेंगे या गाण्यानंतर हे गाणे हिट झाले. 

          अमिताभ बच्चन, रेखा, शशी कपूर, परवीन बॉबी यांच्यावर चित्रित झालेले गाणे 'तेरे रब ने बना दि जोडी' हिट झाले. परवीन बॉबीच लग्न शशीकपूर सोबत व्हावं यासाठी शशी कपूरचं मन वळवण्यासाठी अमिताभ सरदार होतो व रेखा सरदारनी होते. या गाण्यात शिडशिडीत बांध्याचा अमिताभ अस्सल सरदार वाटतो. अमिताभने या गाण्यात सादर केलेला भांगडा अद्वितीय आहे. हे गाणे पंजाबी समूह नृत्यावर आधारित असून लंडन्स हैड पार्क  (London's Hyde Park) येथे चित्रित केले आहे. 

          दुर्गादेवीच्या मंदिरात 'ओ नाम रे, सबसे बडा तेरा नाम, ओ शेरो वाली माँ' या गाण्यात अमिताभ व रेखाने गरबा नृत्य सादर केले. या गरबा नृत्यातील रेखा व अमिताभने केलेला टिपऱ्यांचा खेळ अफलातून होता. हे गाणे नवरात्रीच्या दिवसात हमखास वाजवले जाते व या गाण्यावर गरबा नृत्य केले जाते तेव्हा अमिताभ व रेखा यांचे गरबा नृत्य डोळ्यासमोर येते. अमिताभ व रेखा यांच्यावर चित्रित झालेले गाणे 'अठरा बरस कि तू होने को आयी' हे गाणेसुद्धा हिट झाले. 

"कौनसी चप्पल है ?"

१) अमिताभ देवीचे मंदीर उभारण्यासाठी देणगी गोळा करत असतो. अमिताभ एका व्यापाराकडे जातो. व त्याच्याकडून देणगी मागतो. व्यापारी देणगी दयायला नकार देतो तेव्हा अमिताभ पायातील चप्पल काढून विचारतो, 'ये क्या है ?' व्यापारी उत्तरतो, 'चप्पल है' अमिताभ विचारतो, 'कौनसी है', उत्तर येते, 'कोल्हापुरी' अमिताभ विचारतो, 'क्या नंबर है' व्यापारी उत्तरतो, 'नौ नंबर'

२) मारामारीच्या प्रसंगातही अमिताभ गुंडांना चप्पल एकमेकांवर आपटून दाखवतो व विचारतो, ''ये क्या है ?' गुंड म्हणतात 'चप्पल है' अमिताभ परत विचारतो, 'कौनसी चप्पल है', गुंड उत्तरतात  'कोल्हापुरी है' अमिताभ विचारतो, 'नंबर क्या है' गुंड अमिताभकडे बघत बसतात तेव्हा अमिताभच उत्तरतो, 'अबे नौ नंबर कि है' असे म्हणून अमिताभ चपलेने गुंडांना मारू लागतो. 

          या दोन्ही प्रसंगात अमिताभने कोल्हापुरी चपलेचा वापर खुबीने करून घेतला. चप्पल बघितली तर साधी वस्तू पण अमिताभमुळे चप्पलीलाही महत्व प्राप्त झाले.   

थोडक्यात  कथानक 

          दुर्गा ( निरुपा रॉय ) आणि विक्रम कपूर ( अमजद खान ) यांचे लग्न झाले आहे. विक्रम गुन्ह्याच्या मार्गावर पाऊल ठेवतो आणि त्यासोबतच जग्गी या गुंडांपैकी एकाशी त्याचे वैर होते. दुर्गा दोन मुलांना जन्म देते, पण त्यातील एक जग्गी चोरतो  आणि पास्कलला विकतो. दुर्गा तिच्या एका मुलगा हरवल्यामुळे दु:खी आहे त्यातच  तिचा नवराही तिला सोडून जातो. मोठ्या अडचणींनंतर, दुर्गा तिच्या मुलाला किशनला  ( शशी कपूर ) वाढवते . किशन मोठा होऊन एक चांगला पोलीस अधिकारी बनतो. त्याच वेळी, पास्कल विकत घेतलेल्या मुलाला, अमितला ( अमिताभ बच्चन ) अशिक्षित ठेवतो आणि गुंड आणि मद्यपी बनवतो. किशन आणि अमित भेटतात तेव्हा ते खूप चांगले मित्र बनतात.

          विक्रमला ना त्याच्या दोन मुलांची माहिती आहे ना त्याच्या पत्नीच्या हयातीची माहिती आहे. आपली ओळख न सांगता तो अमितला नवरात्रीच्या दिवशी मंदिरात किशनला मारण्यासाठी सुपारी देतो. अमित हि बातमी त्याचा मित्र किशनला सांगतो. त्यांनी खऱ्या गुन्हेगाराला पकडण्याची योजना आखली, परंतु सर्व काही त्यांच्या योजनेनुसार होत नाही आणि किशनची दृष्टी गेली. आता या गुन्ह्यामागील खरा गुन्हेगार शोधण्याचे काम अमितवर आले आहे. अमित (अमिताभ बच्चन) किशनच्या (शशी कपूर) मदतीने खऱ्या गुन्हेगारांना पकडतो. 

          अमिताभ बच्चन व इतर कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे, लोकप्रिय गाणी, नृत्य व हाणामारी यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला.      

 

            


          अमिताभ, रेखा, शशी कपूर, परवीन बॉबी यांच्यावर चित्रित झालेले                                 सुपरहिट गीत 'तेरे रब ने बना दि जोडी'












Thursday, December 9, 2021

 

 नसीब 

          नसीब हा चित्रपट १७ मार्च १९८४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक मनमोहन देसाई होते. या चित्रपटाचे संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत. प्रयाग राज आणि के के शुक्ला यांनी कथा लिहिली आहे. आनंद बक्षी यांनी गाणी लिहिली असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबध्द केली आहेत. 

          अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, रिना रॉय, किम, प्राण, अमजद खान, कादर खान, अमरीश पुरी, प्रेम चोपडा, शक्ती कपूर यांनी भुमिका केल्या आहेत. 

          नसीब या चित्रपटाची कहाणी लॉटरीच्या तिकिटापासून सुरू होते. एक मद्यधुंद माणूस जो त्याच्या दारूसाठी पैसे देऊ शकत नाही: त्याने त्याचे तिकीट वेटर नामदेव ( प्राण ) याला विकण्याचा निर्णय घेतला. नामदेव आणि त्याचे तीन मित्र दामू ( अमजद खान ), रघु ( कादर खान ) आणि जग्गी ( जगदीश राज ) हे तिकीट खरेदी करतात. तिकीट कोणाला मिळेल हे ठरवण्यासाठी ते पत्ते खेळतात. जग्गी जिंकतो आणि तिकीट त्याच्याकडेच राहते. तिकीट विजेते ठरल्यावर दामू आणि रघू इतर दोघांकडे वळतात. ते जग्गीला मारतात आणि नामदेवला दोष देतात. नामदेव पळून जातो, पण रघु आणि दामूने हस्तक्षेप करून त्याला पुलावरून नदीत फेकून दिले. नामदेव मृत झाल्याचे मानले जाते तथापि, त्याला डॉन ( अमरीश पुरी ) ने वाचवले आणि तो जिवंत आहे हे कोणालाही माहिती नाही.

          वीस वर्षांनंतर, दामू आणि रघू त्यांच्या चोरीच्या लॉटरीतील पैसे आलिशान हॉटेल्स बांधण्यासाठी वापरतात आणि लाखो कमावतात. तो आता खूप यशस्वी उद्योजक बनला आहे. दामू त्याच्या पैशातील काही भाग त्याचा धाकटा मुलगा विकी ( शत्रुघ्न सिन्हा ) याला इंग्लंडमधील शाळेत पाठवण्यासाठी वापरतो. ते नामदेवचा मोठा मुलगा आणि विकीचा जिवलग मित्र जॉनी ( अमिताभ बच्चन ) यांना हॉटेलमध्ये वेटर म्हणून ठेवतात. योगायोगाने (किंवा नशिबाने!) जॉनी आणि विकी एकाच सुंदर गायिकेच्या, मिस आशा ( हेमा मालिनी ) च्या प्रेमात पडतात. विकी हा ज्युलीचा ( रीना रॉय) बालपणीचा मित्र आहे.  ज्युली विकीवर प्रेम करत असते, पण तो तिला फक्त एक मित्र म्हणून पाहतो. विकी आशावर प्रेम करतो हे जॉनीला कळल्यावर तो आणि ज्युली स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतात, विकी आणि आशा पुन्हा एकत्र येतील याची खात्री करण्यासाठी. त्याच वेळी, जॉनीचा धाकटा भाऊ सनी ( ऋषी कपूर ) आशाची धाकटी बहीण किम (किम) च्या प्रेमात पडतो. किम आणि आशा या जग्गीच्या मुली आहेत ज्यांची हत्या नामदेवनेच केली होती. नामदेव लवकरच परत येतो आणि दामू आणि रघूला त्याची मुले जॉनी आणि सनी यांच्यापासून वेगळे केल्याचा बदला घेण्याची योजना आखतो. या सर्व पात्रांचे आयुष्य एकमेकांत गुंफले जाते आणि प्रेम, मैत्री, त्याग, कपट, सूड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नशिबाची एक मजेदार कथा बनते.

          जॉन जानी जनार्दन हे गाणे अमिताभवर चित्रित झाले आहे. हे गाणे मोहमद रफी यांनी गायले आहे. या गाण्याचे वैशिष्ठय म्हणजे फिल्मी कलाकार एकत्र आले आहेत. राज कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना, राकेश रोशन, विजय अरोरा, वहिदा रेहमान, शर्मिला टागोर, माला सिन्हा, बिंदू, सिमी गरेवाल, हे कलाकार एकत्र आले आहेत. 

          'चल, चल मेरे भाय तेरे हात हाथ जोडता हूँ' हे गाणे अमिताभ व ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झाले आहे. ह्या गाण्याचे वैशिष्ठय म्हणजे मोहमद रफींबरोबर अमिताभ व ऋषी कपूर यांनीही आपला आवाज दिला आहे. दारूच्या नशेत अमिताभ बॉक्सिंग रिंगमध्ये बॉक्सरकडून मार खात असतो तेव्हा ऋषी कपूर तिथे येतो व बॉक्सरला मार देतो. बॉक्सरकडून मार खाल्लेल्या अमिताभला घरी चलण्याचा आग्रह करतो तेव्हा ऋषी कपूर हे गाणे म्हणतो. 

          'रंग जमाके जायेंगे' हे गाणे अमिताभ, ऋषी कपूर व शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर चित्रित झाले असून अमिताभने मेट्याडोर स्पॅनिश बुलफायटर, शत्रुघ्न सिन्हाने कझाक सेनानी व ऋषी कपूरने चार्ली चॅप्लिनची वेषभुषा केली होती. 

          सर्व कलाकारांच्या उत्कृष्ठ अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. ह्या चित्रपटाने एक करोडपेक्षाही जास्त धंदा केला. एक करोडपेक्षा  जास्त धंदा केलेल्या अमिताभच्या ९ चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. 


 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tuesday, December 7, 2021

'दस नंबरी' गोलंदाज

 


 'दस नंबरी' गोलंदाज 

          भारत न्यूझिलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस एका पराक्रमाने गाजला. या पराक्रमाचे साक्षीदार होते वानखेडे स्टेडियम व स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक. ज्या खेळाडूने याआधी हा पराक्रम केला होता तोही उपस्थित होता व त्याच्या डोळ्यादेखत हा पराक्रम घडत होता. ज्याने याआधी हा पराक्रम केला होता तो खेळाडू होता अनिल कुंबळे व त्याच्या डोळ्यादेखत पराक्रम करणारा होता न्यूझिलंडचा गोलंदाज एजाज पटेल. एजाज पटेलने भीमपराक्रम केला तो म्हणजे एकाच डावात भारताचे १० बळी टिपण्याचा. 

          मुळच्या मुंबईच्या असणाऱ्या व न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या पटेलने डावात १० बळी टिपण्याचा पराक्रम करून तिसरा खेळाडू ठरला. याआधी हा पराक्रम जिम लेकर व अनिल कुंबळे यांनी केला होता. आता पटेलने हा पराक्रम करून मानाचे स्थान पटकावले. एजाज पटेलने हा पराक्रम करावा हे बहुदा नियतीच्याच मनात असावे कारण त्याच्या फिरकीसमोर कोहली, पुजारासारखे अनुभवी खेळाडू बाद झाले. भारतीय फलंदाज सहसा फिरकी गोलंदाजांना कधीही शरण जात नाहीत परंतु एजाज पटेलच्या फिरकीसमोर दहाही भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. एजाज पटेलच्या स्वप्नातही नसेलकी आपल्या हातून एवढा मोठा पराक्रम घडेल. 

        भारताने हा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकली असली तरी एजाज पटेलने केलेला पराक्रम त्याच्या व वानखेडे स्टेडियमच्या स्मरणात नक्कीच राहील.

 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...