तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- दाने कापे हाथ । नावडे तेविशी मात ।।
दाने कापे हाथ । नावडे तेविशी मात ।। १ ।।
कथी चावटीचे बोल । हिंग क्षीर मिथ्या फोल ।। २ ।।
न वजती पाय । तीर्था म्हणे वेंचो काय ।। ३ ।।
तुका म्हणे मनी नाही । नये आकारते काही ।। ४ ।।
ओवी : दाने कापे हाथ । नावडे तेविशी मात ।। १ ।। कथी चावटीचे बोल । हिंग क्षीर मिथ्या फोल ।। २ ।।
अर्थ : ज्याचा हात काही दानधर्म करण्याचे वेळेस थरथर कापतो. दानधर्म करा असे कोणी त्याला सांगितले तर ती गोष्टही आवडत नाही. नेहमी चावटपणाची भाषणे कथन करतो, ज्याप्रमाणे हिंग दुधामध्ये घालणे तद्वतच ती भाषणे खोटी व फोलकट आहेत.
भावार्थ : तुकाराम महाराजांनी या ओवीतून कंजूष व परोपकार न करणाऱ्या माणसाबद्दल सांगितले आहे कि, जो माणूस आपल्याकडे भरपूर संपत्ती असतानासुद्धा गोर-गरिबांना, लुळ्या-पांगळ्यांना, गरजू लोकांना मदत किंवा दानधर्म करत नाही. त्याच्याकडे कोणी मदत मागण्यासाठी गेले असता मदतीचा हात पुढे करत नाही. दानधर्म करण्याऐवजी गरिबांना दूर लोटतो. त्यांना वाट्टेलतसे बोलून त्यांचा अपमान करतो. त्याच्या हाताला दानधर्म करण्याचे वेळेस कंप सुटतो (थरथर कापतो). त्याला दानधर्म करण्याविषयी सांगितले तर ती गोष्ट आवडत नाही. तोंड वेडेवाकडे करतो. उलट दुसऱ्यांजवळ श्रीमंतीच्या बढाया मारतो, 'मी असे केले, मी तसे केले', असे खोटे खोटे सांगतो व आपला बडेजावपणा दाखवतो. ज्याप्रमाणे दुधामध्ये हिंग घालणे त्याप्रमाणे तुकाराम महाराजांना या बढाया (भाषणे) खोटया व निरर्थक (फोलकट) वाटतात.
ओवी : न वजती पाय । तीर्था म्हणे वेंचो काय ।। ३ ।। तुका म्हणे मनी नाही । नये आकारते काही ।। ४ ।।
अर्थ : ज्याचे पाय तीर्थांकडे जातही नाहीत त्यास कोणी म्हणले, तू तीर्थयात्रा का करीत नाहीस तर त्याचे कारण सांगतो कि, मजजवळ खर्च करण्यास पैसा नाही. एखादी गोष्ट एखाद्याचे मनात नसेल तर कधीही त्याच्याकडून घडणार नाही.
भावार्थ : तुकाराम महाराजांच्या मते जे कंजूष आहेत व ज्यांच्यासाठी पैसा प्रिय आहे असे लोक आपल्याजवळील पैसा खर्च होऊ नये म्हणून तीर्थयात्रा करत नाहीत. त्यांच्या मनातही कधी येत नाही कि देवदर्शनाला जावून देवाचे दर्शन घेवू. अशा लोकांना देवदर्शनाला येण्याबद्दल विचारले असता त्यांना आपल्याजवळील पैसा खर्च होईल असे वाटते म्हणून ते 'माझ्याकडे खर्च करण्यास पैसा नाही' असे खोटे सांगतात. अशा लोकांच्या हातून चांगल्या कामासाठी पैसा कधी सुटत नाही. अशा लोकांच्या मनात पैसा खर्च करून दानधर्म करावा किंवा तीर्थयात्रेला जावे असे कधीही येणार नाही व त्यांचेकडून असे कधीही घडणार नाही.
No comments:
Post a Comment