तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- वळीते जे गाई । त्यासि फार लागे काही ।।
वळीते जे गाई । त्यासि फार लागे काही ।। १ ।।
निवे भावाचे उत्तरी । भलते एके धणीवरी ।। २ ।।
न लगती प्रकार । काही मानाचा आदर ।। ३ ।।
सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ।। ४ ।।
ओवी : वळीते जे गाई । त्यासि फार लागे काही ।। १ ।। निवे भावाचे उत्तरी । भलते एके धणीवरी ।। २ ।।
अर्थ : जे केवळ गाई वळणारे परम भाविक गोपाळ त्यांना देवाला प्रसन्न करण्याविषयी फारसे द्रव्य, गंध, फुले वैगेरे अलंकाराची जरूर पडली नाही. केवळ त्यांच्या भावाने भरलेल्या प्रेमपर शब्दाने हरी शांत होतात.
भावार्थ : या ओवीतून गोपाळांनी केलेली हरीची भक्ती किंवा पुजाविषयी तुकाराम महाराज सांगतात कि, जे गाई वळणारे गोपाळ आहेत त्यांना देवाला (हरीला) प्रसन्न करण्यासाठी द्रव्य, गंध, फुले वैगेरे अलंकाराची जरूर पडली नाही उलट गोपाळ देवाशी प्रेमाने चार शब्द बोलायचे व देवाबरोबर आनंदाने रहायचे. गोपाळ आपल्यातीलच एक असे मानून आपल्या घासातील घास हरीला द्यायचे. हरीसुद्धा गोपाळांनी दिलेला प्रेमाचा घास घेऊन व त्यांच्याबरोबर राहून तृप्त व्हायचे. गोपाळांचा प्रेमभाव बघून व अमृतबोल ऐकून हरी मनातून आनंदीत व्हायचे.
ओवी : न लगती प्रकार । काही मानाचा आदर ।। ३ ।। सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ।। ४ ।।
अर्थ : देवाला संतुष्ट करण्याला मान करणे किंवा आदरातिथ्य करणे हे सर्व प्रकार त्यांना करावे लागत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, देव आपल्यामधला मोठेपणा टाकून या दिनांच्या बरोबर असतात.
भावार्थ : गोपाळांचा प्रेमभाव बघूनच हरी आपल्यामधला मोठेपणा टाकून या गरीब गोपाळांबरोबर रहातो व त्यांच्याबरोबर आनंदाने जेवतो. यासाठी हरीला संतुष्ट करण्यासाठी मानसन्मानाची व आदरातिथ्याची गरज भासत नाही फक्त एक प्रेमभाव पुरेसा होतो. तुकाराम महाराजांना असे वाटते कि हरीची भक्ती करावी ती गोपाळांसारखी. भक्तीमुळे गोपाळ व हरी एकरूप झाले. दोघांमधील प्रेमभाव वाढू लागला. त्यामुळे हरी आपला मोठेपणा विसरून गरीब गोपाळांबरोबर खेळू लागला व जेवू लागला. त्यांच्यातीलच एक होवून गेला. आपणही जर गोपाळांसारखी भक्ती केली तर देव आपल्यावर संतुष्ट होवून आपल्याबरोबर राहील.
No comments:
Post a Comment