Friday, June 24, 2022

तुकाराम महाराज गाथा - अभंग - पंढरीसी जाय । तो विसरे मायबाप ।।

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - पंढरीसी जाय । तो विसरे मायबाप ।।

पंढरीसी जाय । तो विसरे मायबाप ।। १ ।।

     अवघा होय पांडुरंग । राहे धरूनिया अंग ।। २ ।।

न लगे धन मान । देहभावें उदासीन ।। ३ ।।

      तुका म्हणे मळ । नासी तात्काळ हे स्थळ ।। ४ ।। 

ओवी : पंढरीसी जाय । तो विसरे मायबाप ।। १ ।। अवघा होय पांडुरंग । राहे धरूनिया अंग ।। २ ।।

अर्थ : जो पंढरीस जातो, तो आपल्या आईबाप, गणगोत इ. ना विसरतो. तो सर्व पांडुरंगरूप होतो व त्याच अंगाने राहतो. 

भावार्थ : पंढरपूर, विठ्ठलाचे वसतीस्थान. तिथे आहे पांडुरंगाचा निवास. कटीवर कर ठेवून, प्रेमभावेने विठ्ठल आपल्या भक्तांकडे बघत युगानुयुगे विटेवर उभा आहे. त्याचे सावळे, सुंदर, मनोहारी रूप बघितले कि डोळे सुखावतात. धन्य झाल्यासारखे वाटते. गळ्यात तुळशीमाळा घातल्या आहेत, मस्तकावर मुकुट धारण केला आहे, कानात मकरकुंडले घातली आहेत, पीतांबर नेसला असून भरजरी शेला पांघरला आहे, कपाळावर कस्तुरी मळवट भरला आहे. असे विठ्ठलाचे विलोभनीय, मनोहरी रूप पहिले की भक्तजन विठ्ठलाच्या प्रेमात पडतात, त्याच्या रूपावर भाळतात. विलोभनीय रूप डोळ्यात साठवतात. आपल्या अंतर्मनात त्याच्या रूपाचा ठसा उमटवतात. देहभान विसरून स्वतःला, सर्व नातेवाईकांना म्हणजेच आईबाप, भाऊ-बहीण, बायको-मुलं, गणगोत इत्यादींना विसरून विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहत बसतात. त्या रूपाशी एकरूप होतात, विठ्ठलमय होऊन जातात (त्याच स्थितीत किंवा अंगाने राहतात). 

ओवी : न लगे धन मान । देहभावें उदासीन ।। ३ ।। तुका म्हणे मळ । नासी तात्काळ हे स्थळ ।। ४ ।। 

अर्थ : द्रव्य व मान ह्यांची इच्छा त्याच्यामध्ये राहत नाही, कारण तो देहाविषयी उदास असतो. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूर हे ठिकाण मळाचा तात्काळ नाश करणारे ठिकाण आहे. 

भावार्थ : पंढरपूरला आल्यावर व सावळया विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर भक्तजन देहभान हरखून जातात, स्वतःला विसरतात. त्यांच्यातील अहंकार, गर्व, 'मी' पणा गळून पडतो.(त्रिगुणमळाचा नाश होतो). ते फक्त विठ्ठलमय होतात. त्यांच्या मनात फक्त विठ्ठलाचेच भाव येतात. त्यांचे मन विठ्ठलभक्तीकडे, नामःस्मरणाकडे ओढले जाते. मनात वाईट विचार येत असतील तर ते निघून जातात. द्रव्याबद्दल (पैसा-अडका, संपत्ती, सुवर्णअलंकार इ.) तिटकारा वाटू लागतो. विठ्ठलभक्तीपुढे हे सारे कस्पटासमान वाटू लागते. विठ्ठलापुढे सारे भक्तजन सारखे आहेत. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही. त्यामुळे मान-अपमानाचा संबंध येत नाही. पंढरपूरमध्ये आल्यावर सर्व भक्तांना समान वागणूक मिळते. तिथे दुजाभावपणा, 'मी'पणा नाही, अहंकाराला थारा नाही तसेच क्रोध, मत्सर, लोभ, वासना इ. वाईट गोष्टींना थारा नाही. हे विचार आपोआपच मनातून निघून जातात. म्हणूनच तुकाराम म्हणतात कि, 'पंढरपूर हे ठिकाण त्रिगुणमळाचा नाश करणारे ठिकाण आहे.'





















 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...