Friday, December 10, 2021

सुहाग -- गाणी व नृत्याचा उत्कृष्ठ मिलाफ

 सुहाग -- गाणी व नृत्याचा उत्कृष्ठ मिलाफ

           हा चित्रपट १६ नोव्हेंबर १९७९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता प्रकाश त्रेहन, शक्ती सुभाष व रमेश शर्मा असून दिग्दर्शक मनमोहन देसाई आहेत. या चित्रपटाची कथा प्रयाग राज यांनी लिहिली असून पटकथा के के शुक्ला यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबध्द केली आहेत. मोहमद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, शैलेंद्र यांनी गाणी गायली आहेत. 

          अमिताभ बच्चन, रेखा, शशी कपूर, परवीन बॉबी, निरुपा रॉय, अमजद खान, जीवन, रंजित, कादर खान यांच्या प्रमुख भुमिका आहेत. 

           अमिताभने या चित्रपटात अशिक्षित गुंडाची भूमिका केली आहे तर शशी कपूरने पोलीस इन्स्पेक्टरची भुमिका केली आहे. एका प्रसंगानंतर दोघेही चांगले मित्र बनतात. शशी कपूरचे डोळे जातात तेव्हा अमिताभ गुंडांशी लढण्यासाठी शशी कपूरला सहकार्य करतो. अमिताभ व शशी कपूर यांच्या मैत्रीचा दाखला देण्यासाठी दोघांवर 'ये यार सुन यारी तेरी' हे गाणे चित्रित केले. शोलेतील 'ये दोस्ती हम नही तोडेंगे या गाण्यानंतर हे गाणे हिट झाले. 

          अमिताभ बच्चन, रेखा, शशी कपूर, परवीन बॉबी यांच्यावर चित्रित झालेले गाणे 'तेरे रब ने बना दि जोडी' हिट झाले. परवीन बॉबीच लग्न शशीकपूर सोबत व्हावं यासाठी शशी कपूरचं मन वळवण्यासाठी अमिताभ सरदार होतो व रेखा सरदारनी होते. या गाण्यात शिडशिडीत बांध्याचा अमिताभ अस्सल सरदार वाटतो. अमिताभने या गाण्यात सादर केलेला भांगडा अद्वितीय आहे. हे गाणे पंजाबी समूह नृत्यावर आधारित असून लंडन्स हैड पार्क  (London's Hyde Park) येथे चित्रित केले आहे. 

          दुर्गादेवीच्या मंदिरात 'ओ नाम रे, सबसे बडा तेरा नाम, ओ शेरो वाली माँ' या गाण्यात अमिताभ व रेखाने गरबा नृत्य सादर केले. या गरबा नृत्यातील रेखा व अमिताभने केलेला टिपऱ्यांचा खेळ अफलातून होता. हे गाणे नवरात्रीच्या दिवसात हमखास वाजवले जाते व या गाण्यावर गरबा नृत्य केले जाते तेव्हा अमिताभ व रेखा यांचे गरबा नृत्य डोळ्यासमोर येते. अमिताभ व रेखा यांच्यावर चित्रित झालेले गाणे 'अठरा बरस कि तू होने को आयी' हे गाणेसुद्धा हिट झाले. 

"कौनसी चप्पल है ?"

१) अमिताभ देवीचे मंदीर उभारण्यासाठी देणगी गोळा करत असतो. अमिताभ एका व्यापाराकडे जातो. व त्याच्याकडून देणगी मागतो. व्यापारी देणगी दयायला नकार देतो तेव्हा अमिताभ पायातील चप्पल काढून विचारतो, 'ये क्या है ?' व्यापारी उत्तरतो, 'चप्पल है' अमिताभ विचारतो, 'कौनसी है', उत्तर येते, 'कोल्हापुरी' अमिताभ विचारतो, 'क्या नंबर है' व्यापारी उत्तरतो, 'नौ नंबर'

२) मारामारीच्या प्रसंगातही अमिताभ गुंडांना चप्पल एकमेकांवर आपटून दाखवतो व विचारतो, ''ये क्या है ?' गुंड म्हणतात 'चप्पल है' अमिताभ परत विचारतो, 'कौनसी चप्पल है', गुंड उत्तरतात  'कोल्हापुरी है' अमिताभ विचारतो, 'नंबर क्या है' गुंड अमिताभकडे बघत बसतात तेव्हा अमिताभच उत्तरतो, 'अबे नौ नंबर कि है' असे म्हणून अमिताभ चपलेने गुंडांना मारू लागतो. 

          या दोन्ही प्रसंगात अमिताभने कोल्हापुरी चपलेचा वापर खुबीने करून घेतला. चप्पल बघितली तर साधी वस्तू पण अमिताभमुळे चप्पलीलाही महत्व प्राप्त झाले.   

थोडक्यात  कथानक 

          दुर्गा ( निरुपा रॉय ) आणि विक्रम कपूर ( अमजद खान ) यांचे लग्न झाले आहे. विक्रम गुन्ह्याच्या मार्गावर पाऊल ठेवतो आणि त्यासोबतच जग्गी या गुंडांपैकी एकाशी त्याचे वैर होते. दुर्गा दोन मुलांना जन्म देते, पण त्यातील एक जग्गी चोरतो  आणि पास्कलला विकतो. दुर्गा तिच्या एका मुलगा हरवल्यामुळे दु:खी आहे त्यातच  तिचा नवराही तिला सोडून जातो. मोठ्या अडचणींनंतर, दुर्गा तिच्या मुलाला किशनला  ( शशी कपूर ) वाढवते . किशन मोठा होऊन एक चांगला पोलीस अधिकारी बनतो. त्याच वेळी, पास्कल विकत घेतलेल्या मुलाला, अमितला ( अमिताभ बच्चन ) अशिक्षित ठेवतो आणि गुंड आणि मद्यपी बनवतो. किशन आणि अमित भेटतात तेव्हा ते खूप चांगले मित्र बनतात.

          विक्रमला ना त्याच्या दोन मुलांची माहिती आहे ना त्याच्या पत्नीच्या हयातीची माहिती आहे. आपली ओळख न सांगता तो अमितला नवरात्रीच्या दिवशी मंदिरात किशनला मारण्यासाठी सुपारी देतो. अमित हि बातमी त्याचा मित्र किशनला सांगतो. त्यांनी खऱ्या गुन्हेगाराला पकडण्याची योजना आखली, परंतु सर्व काही त्यांच्या योजनेनुसार होत नाही आणि किशनची दृष्टी गेली. आता या गुन्ह्यामागील खरा गुन्हेगार शोधण्याचे काम अमितवर आले आहे. अमित (अमिताभ बच्चन) किशनच्या (शशी कपूर) मदतीने खऱ्या गुन्हेगारांना पकडतो. 

          अमिताभ बच्चन व इतर कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे, लोकप्रिय गाणी, नृत्य व हाणामारी यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला.      

 

            


          अमिताभ, रेखा, शशी कपूर, परवीन बॉबी यांच्यावर चित्रित झालेले                                 सुपरहिट गीत 'तेरे रब ने बना दि जोडी'












No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...