प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे !
"प्रेमात आणि युध्दात सारं काही क्षम्य असतं" हि म्हण पूर्वीपासून प्रचलित आहे. जसे घर बघावे बांधून, लग्न पाहावे करून तसेच या वाक्यात आणखी एक वाक्य घातले पाहिजे, ते म्हणजे प्रेम पाहावे करून. प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे अशी एक काव्यपंक्ती आहे. प्रेम हे फक्त प्रेमच असू शकतं त्यामुळे प्रेमाला कोणतीच उपमा देता येत नाही. कारण प्रेम हे देवाने दिलेली देणगी आहे. प्रेम हा कॉलेज युवक युवतींचा आवडता विषय आहे तसेच नाटक-सिनेमा दिग्दर्शक, लेखक, कवी यांचाही आवडता विषय आहे. यांनी प्रेम या विषयाची महती सांगण्याचा बराच प्रयत्न केला आहे. पण प्रेम म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच राहते. प्रेमाचा अर्थ हा जसा निघेल तसा आहे. प्रेम म्हणजे दोन मनांचे, हृदयाचे मिलन होय. प्रेम हे आई-मुलगा, भाऊ-बहीण, नवरा-बायको, युवक-युवती यांच्यात होते. पण प्रत्येकाच्या प्रेमात वेगवेगळया भावना दडलेल्या असतात. प्रत्येकाच्या प्रेमात वासना नसून चांगल्या भावना आहेत. प्रत्येकाच्या प्रेमाचे अर्थ निराळे आहेत. प्रेम हे पवित्र नाते मानले जाते. आणि या नात्याला कोणतीच उपमा देता येत नाही. हे प्रेमाचे नाते म्हणजे देवाघरची देणगी आहे.
प्रेम कुठेही, केव्हाही होऊ शकतं. प्रेम हे बस स्टॉप, ऑफिस, बाग-बगीचे, सिनेमा, नाटयगृहे, कॉलेज या ठिकाणी जमते. प्रेम जमण्याची ठिकाणे वेगळी असली तरी अर्थ एकच होतो, तो म्हणजे दोन मनांचे मिलन. जेंव्हा एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते, तेव्हाच प्रेम होते. त्यामुळेच कि काय "प्यार किया नहीं जाता, हो जाता हैं" असे हिंदी गाण्यात म्हणले आहे. प्रेमाची महती सांगणारी अनेक उदाहरणे आहेत. शिरी-फराह, लैला-मजनू, हिर-रांजा, बाजीराव-मस्तानी, मुमताज-शाहजहान, सलीम-अनारकली, अशी कित्येक उदाहरणे प्रसिध्द आहेत. यांच्या प्रेमात वासना दडलेली नव्हती. त्यामुळेच यांचे प्रेम आजही अमर आहे. त्यांनी प्रेम करताना जातपात, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला नाही.
प्रेमाची सुरवात हि तारूण्याच्या उंबरठयावर असतानाच होते. जेव्हा मुलगा आणि मुलगी वयात येतात तेव्हा त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते. चोरून एकमेकांकडे पाहणे, नेत्रकटाक्ष टाकणे, चोरून भेटणे इत्यादी प्रकार वयात आल्यावर घडतात. यातूनच काहीवेळा एकतर्फी प्रेमाची सुरवात होते. तो किंवा ती प्रेमाला प्रतिसाद देत नसेल तर आत्महत्या, खून, बलात्कार, जाळपोळ इत्यादी भीषण प्रकार घडतात. यात कुणालातरी आपले प्राण गमवावे लागतात. प्रेम हे त्यागातून, विरहातून निर्माण होते. जेव्हा आपण एखादया आवडत्या गोष्टीचा त्याग करतो तेव्हा त्या गोष्टीचे महत्व कळते. तसेच प्रेमाच्या बाबतीतही होते. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा त्याग करतो, तेव्हा होणाऱ्या दु:खामुळे त्या व्यक्तीबद्दल अधिकच प्रेम भावना निर्माण होतात. जी व्यक्ती प्रेम करू शकते, त्याच व्यक्तीला प्रेम विरहही सहन करता आला पाहिजे. तरच ती व्यक्ती खरी प्रेमी ठरू शकते.
प्रेमाच्या जोरावर सावित्रीने आपल्या नवऱ्याला यम दरवाजातून सोडवून आणले. प्रेमापुढे देव-दानव झुकले आहेत तर मानवाची काय कथा ? काही प्रश्न युध्दामुळे सोडविणे शक्य होत नाही, तेच प्रश्न प्रेमामुळे सोडविणे शक्य होते एवढे प्रेमात सामर्थ्य आहे. त्यामुळे प्रेमाला कोणतीच उपमा देता येत नाही. याचे कारण म्हणजे प्रेम हे देवाघरचे देणे आहे. देवाने दिलेली देणगी आहे.
संतोष वसंत जोशी,
वाई, जिल्हा सातारा