Saturday, February 15, 2020

अवीट गोडीचे गाणे -- राधा कृष्णावरी भाळली


 अवीट गोडीचे गाणे -- राधा कृष्णावरी भाळली 

      हे गीत राधा कृष्ण यांच्या मनोमिलनाचे आहे. राधेचे कृष्णावर निखळ प्रेम आहे. दोघेही प्रीतीत अखंड बुडालेले असतात. कृष्ण आपल्या बासरी वादनाने राधेला मोहित करीत असतो. राधेला कृष्ण भेटीची ओढ लागलेली असते. कधी एकदा कृष्णाला बघते असे तीला झाले असते. दोघांच्या प्रीतीची माहिती गोकुळवासीयांच्या कानी पडते. त्यांच्यात कुजबुज चालू होते. 
         दोघांचे मनोमिलन होते तेव्हा सारी सृष्टी मोहरून उठते. झाडे, वेलींना टवटवी फुटते. फुलाफुलांतून सुगंध दरवळू लागतो. कोकीळ सुस्वरात गायला लागते. पक्षीही आपल्या मधुर किलबिलाटाने सारा आसमंत उजळून टाकतात. साऱ्या आसमंतात आनंद पसरलेला असतो. दोघांचे मनोमीलन बघण्यासाठी इंद्रपुरी अवतरली. 
           राधा कृष्णाच्या मीलनावर सुंदर असे गीत पी. सावळाराम यांनी लिहिले आहे. या गीताला संगीत वसंत प्रभू यांनी दिले आहे. आशा भोसले यांनी आपल्या सुस्वर आवाजात हे गीत गायले आहे.

राधा कृष्णावरी भाळली
गुजगुज उठली गोकुळी ।। धृ  ।।

अमृत वृक्षी फुलला मोहर
कोकिलकंठी फुटला सुस्वर
कुंजवानातून फुलाफुलांतून
नवलकथा दरवळली ।। १ ।।

वायूवेगे सुगंध वार्ता
कालिंदीच्या कानी पडता
हरिभक्तीची ओढ तियेची
नीळजळी थयथयली ।। २ ।।

अमरप्रीतीचे गीत लाघवी
हरि अधरीची वेणू वाजवी
राधामोहन बघण्या मीलन
इंद्रपुरी अवतरली ।। ३ ।।  


 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...