तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी ३ ते ५)
अवघे जन गडी । घाला उडी भाईनो ।। ३ ।।
हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप आनंदाचे जळ ।। ४ ।।
अर्थ : अहो जनहो, तुम्ही माझे सवंगडी आहा पण या ठिकाणी उडी घालून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. कारण हरिनाम आनंदाचे बहुत पाणी सर्व काळ तुम्हाला प्राप्त होणारे नाही, म्हणजे मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात हा आनंद मिळणार नाही.
भावार्थ : तुकाराम महाराजांना असे म्हणायचे आहे कि, हरिनामाच्या आनंदाचा पूर आत्ताच आला आहे. या पुरात तुम्ही उडी मारून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. म्हणजेच विठ्ठलनामात तल्लीन व्हा, त्याचे सतत नामःस्मरण घ्या. व हे नामःस्मरण घेताना संसारातील सर्व पाश, मोह, माया, अहंकार या सर्व गोष्टी तिथेच टाकून द्या. या सर्व गोष्टींचा त्याग केल्यावर हरीनामाचा आनंद लुटता येतो. हा आनंद मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात घेता येणार नाही व मनुष्यजन्म एकदाच मिळतो. पण या जन्मात मनुष्य संसारातच गुरफटला जातो व त्याला हरीनाम घ्यायला वेळच मिळत नाही. म्हणजेच त्याला हरीनामाचा आनंद लुटता येत नाही. अशा लोकांना तुकाराम महाराज सांगतात कि, अहो जनहो, तुम्ही माझे सवंगडी आहा पण या ठिकाणी उडी घालून मजबरोबर भवसिंधुतून पार व्हा. कारण हरिनाम आनंदाचे बहुत पाणी सर्व काळ तुम्हाला प्राप्त होणारे नाही, म्हणजे मनुष्यजन्माखेरीज दुसऱ्या जन्मात हा आनंद मिळणार नाही.
तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ।। ५ ।।
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, जन्मजन्मांतरींच्या थोर पुण्याईमुळे ह्या भक्तीमार्गाचा ओघ आला आहे.
भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठलाची भक्ती करू लागले, विठ्ठलनामात अखंड बुडू लागले. भजन-कीर्तनात दंग होऊ लागले. त्यातच त्यांचे भान हरपून जाऊ लागले. ते विठ्ठलभक्तीत एवढे रममाण होत कि त्यांना जगाचा विसर पडत असे. त्यांनी संसारातील सर्व पाश, आशा, लोभ सोडले व विठ्ठलचरणी लीन झाले. विठ्ठलालाच त्यांनी सर्वस्व मानले. त्यांनी अंतःकरणापासून केलेली भक्ती बघून विठ्ठलही भारावला व त्याने तुकाराम महाराजांना दर्शन दिले. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, "जन्मजन्मांतरीच्या थोर पुण्याईमुळे हा भक्तीमार्ग सापडला." म्हणजेच तुकाराम महाराजांनी याचे श्रेय जे काही पुण्य केले असेल त्याला दिले आहे.
No comments:
Post a Comment