तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- पूर आला आनंदाचा । (ओवी १ व २)
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ।। १ ।।
बांधू विठ्ठल सांगडी । पोहूनि जाऊं पैल थडी ।। २ ।।
अर्थ : हरीच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला आहे व हरीविषयीच्या प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. विठ्ठलनामाची सांगड बांधून संसारसागराच्या पार तरून जाऊ.
भावार्थ : हरीच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला आहे म्हणजेच विठ्ठलाचे भजन गायल्याने मनाला समाधान मिळते. विठ्ठलाच्या भजनातच इतका गोडवा आहे कि माणूस भजन गाताना तल्लीन होऊन जातो. त्याचे भान हरपून जाते. भजन गाणारा व ऐकणारा दोघेही आनंदी, समाधानी होतात. भजनाच्या गोडव्याने भजन ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात. हरीचे भजन गाणाऱ्याच्या मुखातून पवित्र, निर्मळ शब्द बाहेर पडत असतात तर हे शब्द ऐकणाऱ्याच्या कानामध्ये शिरत असतात. त्यामुळे दोघांनाही परमोच्य आनंद प्राप्त होत असतो. हरीचे म्हणजेच विठ्ठलाचे भजन चालू असते तेव्हा वातावरण भारावलेले असते. वातावरण पवित्र, शुध्द होते. जेथे भजन चालू आहे तेथे वाईट, अनिष्ट गोष्टींना पायबंद घातला जातो. मनात वाईट विचार सोडून चांगले विचार येत असतात. भजनाच्या गोडव्यामुळे हरीविषयी प्रेम वाटू लागते. सागराच्या लाटा जशा उसळतात तसे भजनातील शब्दाने मनात हरीविषयीच्या प्रेमाच्या लाटा उसळत असतात. म्हणजेच हरीविषयी वाटणारे प्रेम घट्ट होत जाते.
सर्वात जास्त पवित्र व निर्मळ कुठले नाम तर विठ्ठलनाम. अमृताहूनही गोड असे विठ्ठलनाम आहे. या नामात गोडवा आहे. हे नाम घेतल्याने मनाला सुख, समाधान मिळते. आनंद प्राप्त होतो. साऱ्या चिंता, विवंचना मिटून जातात. माणूस संकटात सापडला कि 'विठ्ठला, पांडुरंगा' असा धावा करतो. म्हणजेच माणसाला संकटातून सोडवण्याची ताकत(शक्ती, power) या नामात आहे. हे नाम घेतल्याने संसारातील सर्व पाश, आशा, आकांक्षा, लोभ, सर्व चिंता, विवंचना मिटून जातात. माणसाचे संपूर्ण जीवन विठ्ठलमय होऊन जाते. माणूस भक्तिमार्गाला लागतो. विठ्ठलनामामुळे संसाराचा अथांग सागर आहे तो सहज पार करून देवापर्यंत पोचतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "विठ्ठलनामाची सांगड बांधून संसारसागराच्या पार तरून जाऊ."
No comments:
Post a Comment