Sunday, November 25, 2018

उंच भरारी



उंच भरारी 

शिवरायांचे चरित्र, एक जीवन ध्यास,
नमविते माथा त्यांच्या चरणी,
त्यांचे जीवन एक उंच भरारी ।। १ ।। 

चाल रुबाबदार, गोड वाणी,
जरब ती डोळ्यात, शुद्धभाव अंतरी,
त्यांचे जीवन एक उंच भरारी ।। २ ।।

धडधडे काळीज शत्रूचे भितीपरी,
चढते मावळे गड झरझरी,
गनिमी काव्याने लढती, शत्रूला धडकी भरी,
त्यांचे जीवन एक उंच भरारी ।। ३ ।।

माथा नमितो त्यांचा जिजाऊंच्या पाऊली,
घडविला रयतेचा राजा तिने सिंहापरी,
शिवरायांना आता झुकुनि मुजरा करी,
त्यांचे जीवन एक उंच भरारी ।। ४ ।। 














Saturday, November 24, 2018

आम्ही दोघे





आम्ही दोघे 

मुलगी आमची युरोपात असते,
आणि मुलगा यूएस मध्ये असतो,
इथे मात्र आम्ही दोघेच असतो! ।। धृ ।।

मुलगा, जावई ऑफिसात राब राब राबतो,
मुली, सुनेचाही कामाने पिट्ट्या पडतो,
मदतीला या मदतीला या 
दोघींचाही आग्रह असतो,
चतुराईने आम्ही टाळतो कारण 
इथे मात्र आम्ही एन्जॉय करत असतो ।। १ ।।

हिच्या खूप हॉबीज आहेत 
दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो,
मला कसलीच आवड नाही 
मी राहिलेल्या झोपा पूर्ण करून घेतो,
कारण आम्ही दोघेच असतो! ।। २ ।। 

कधी संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो,
येताना बाहेरचं जेवून येतो, 
रोज रात्री मनसोक्त टीव्ही बघत 
चवीचवीने जेवण करतो,
कारण आम्ही दोघेच असतो! ।। ३ ।।

एकदा मुलाचा फोन येतो, 
एकदा मुलीचा फोन येतो, 
वेळ नाही अशी तक्रार करतात,
आमचाही ऊर भरून येतो,
परत आम्ही एन्जॉय करत असतो,
कारण आम्ही दोघेच असतो! ।। ४ ।।

नव्या नवलाईने सगळीकडे जाऊन आलो, 
स्वच्छ, सुंदर सगळं पाहून आलो,
इकडचं-तिकडचं दोन्ही जग एन्जॉय करतो,
कारण आम्ही दोघेच असतो! ।। ५ ।।

नाही जबाबदारी, नाही भांडण, नाही तंटे,
नाही तक्रार कसलीच इथे, 
वाद विसरुनी गट्टी करतो, 
संगनमताने तीही हसते...साथ देऊन मीही हसतो, 
कारण आम्ही दोघेच असतो!
कारण आम्ही दोघेच असतो!! ।। ६ ।।





















ती ...

ती ... 

डोळ्यात माझ्या बघितलं 
तिला वेगळच प्रेम दिसलं, 
मनात माझ्या काहूर माजलेलं होतं
ते तिच्या डोळ्यांनी ओळखलं ।। १ ।।

मी बोलायला तयार नव्हतो
कारण वाटत होती तिची भीती,
सांगितल्यावर नाही ना तोडणार
ती वेल आपल्या प्रीतीची ।। २ ।।

खूप वेळ बसलो होतो
आम्ही गप्प एकमेकांशेजारी,
पुढाकार घेतय कोण 
वाट बघत होतो त्याची ।। ३ ।।

शेवट घेतला तिनेच पुढाकार 
विचारलं तिने 
'करतोस का प्यार?' ।। ४ ।।

आता तिच्या डोळ्यात 
मी नीट बघितलं,
मनात माजलेलं काहूर 
तेव्हाच थांबलं ।। ५ ।।

डोळे पटकन पाण्याने भरले 
मनातले शब्द ओठांवर आले,
माझ्यावरच प्रेम बघून हरपून गेलो 
तिच्या डोळ्यात बघता बघता 
मी स्वतःलाच विसरून गेलो ।। ६ ।। 













Thursday, November 22, 2018

प्रेम




सांगा मला, 
कोणी केलं आहे का प्रेम?
होत असता हसवणारं, खुलवणारं, क्षणिक भुलवणारं,
रमता रमता रमत जाणारं,
खुदकन हसवणारं, अन मग!
जन्मभर रडवणारं ।। १ ।।
मन धरूनही मुठीत, अचपळ निसटणारं,
होकारात होकार मिसळून साथ देणारं,
प्रतीक्षेत काळालाही न जुमानणारं,
आठवणीत स्वतःला विसरणारं ।। २ ।।
काळ निघून जाईल हा, होतील साऱ्या विस्मृती,
परी वाट पाहीन मी, तुझी पाठमोरी आकृती,
हृदयात आठवणी जपून ठेवीन मी,
खरचं उलगडले आहे का 
कोणास प्रेम? 













Wednesday, November 21, 2018

काशिनाथ घाणेकर आणि "आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर...." एकदम कड...क



काशिनाथ घाणेकर आणि "आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर...." एकदम कड...क   

               आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट बघितला. एकदम 'कड...क' चित्रपट झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. काशिनाथ घाणेकरांची नाटकांबद्दल व त्यातील अभिनयाबद्दल असलेली तळमळ बघायला मिळाली. एखादा कलावंत एखाद्या कलाकृतीत किती जीव ओतून काम करतो हे घाणेकरांमुळे कळले. एखाद्या पात्राला आपल्या कलाकृतीतून जीवंत करायचे हे कसब एखाद्या मुरलेल्या कलावंताकडेच असते व ते कसब घाणेकरांकडे होते. रायगडाला जेंव्हा जाग येते मधील संभाजी असो, अश्रूंची झाली फुले मधील लाल्या असो कि गारंबीचा बापू मधील बापू असो त्यांनी प्रत्येक पात्रात आपला जीव ओतला व हि पात्रे रंगभूमीवर जीवंत केली; नव्हे अजरामर केली. प्रेक्षक त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला टाळ्या वाजवून दाद देत होती. 
          घाणेकर हे मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार ठरले. त्यांच्या प्रत्येक एंट्रीला, प्रत्येक वाक्याला टाळ्या पडायच्या. त्यांचे नाटकांचे प्रत्येक शो हाऊसफुल चालायचे. त्यांचा अश्रूंची झाली फुले मधील लाल्या व एकदम कडक हा डायलॉग ह्या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना इतक्या भावल्या कि या गोष्टीसाठी प्रेक्षक नाटकांसाठी गर्दी करू लागले. त्यांच्या नाटकांचे प्रत्येक शो हाउसफुल जात होते यातूनच त्यांची अभिनय क्षमता किती आहे हे दिसून आले. 
          घाणेकर यशाच्या शिखरावर होते तेंव्हा त्यांना प्रसिद्धीची, प्रेक्षकांच्या टाळ्यांची नशा चढली होती व हीच नशा त्यांचा घात करून गेली. शेवटी शेवटी प्रेक्षक त्यांना स्वीकारानासे झाले. त्यांच्या भूमिकेला दाद मिळेनाशी झाली तसेच टाळ्यांचा कडकडाट होईनासा झाला त्यामुळे ते नैराश्येच्या गर्तेत लोटले गेले व त्यातच त्यांचा अंत झाला. या चित्रपटात सुबोध भावेंच्या तोंडी एक वाक्य आहे, "प्रेक्षकांची पहिली टाळी हि शेवटची टाळी ठरते." 
          या चित्रपटात सुबोध भावेंनी डॉ घाणेकरांची भूमिका उत्तम रंगवली. ह्या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला. या चित्रपटात सुबोध भावे घाणेकर म्हणून इतके बेमालूमपणे वावरले कि चित्रपटात भावेंच्या जागी घाणेकरांनाच बघत आहोत कि काय असे वाटत होते. सुबोध भावेंनी जबरदस्त व कड्क अभिनय करून घाणेकरांना परत एकदा जिवंत केले. डॉ. काशिनाथ घाणेकर मराठी रंगभूमीवरील सुपरस्टार ठरले तर या चित्रपटामुळे सुबोध भावे मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार ठरले. ह्या चित्रपटामुळे डॉ. काशिनाथ घाणेकर परत एकदा लोकांसमोर आले. 



























Tuesday, November 20, 2018

कारगिल युद्ध -- एक यशोगाथा भाग 3 "ऑपरेशन विजय"





कारगिल युद्ध -- एक यशोगाथा 
                                   भाग ३
"ऑपरेशन विजय"  

भारतीय प्रत्युत्तर -- मागील ब्लॉगवरून पुढे चालू,
          भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई हि या युद्धातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलवर उशिरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्वाची लढाई होती. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजायला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक मृत्युमुखी पडले. 
          या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्लृप्त्यांचा चांगलाच वापर केला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरून हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यानी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रुपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमावल्या. बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांना रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवुन घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु यासाठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. जर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हते. जर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतरराष्ट्रीय सहानुभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती. 
          भारताने इ. स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या. 








































Saturday, November 17, 2018

मराठी कविता -- फक्त तूच



मराठी कविता -- फक्त तूच 

त्या नदीतीरी मी एकटीच बसलेले,
तू येशील या एका आशेवर ।
पाणीभरल्या डोळ्यांनी त्या,
पाण्याने भरलेल्या नदीकडे एकटक नजर ।। १ ।।

आठवतं मला तुझं बोलावणं नजरेने,
एकांतात बसण्या नदी किनारी ।
फक्त तूच करू शकतोस असे,
माहित होते तुला कोठेतरी ।। २ ।।

आशा निराशेच्या हिंदोळ्यावर,
झुलते आहे मी आता ।
शून्यात नजर अन,
फक्त तूच हवास, लागला मज तुझाच ध्यास ।। ३ ।।











Saturday, November 3, 2018

कविता -- मराठी कविता



कविता 

असताना तू दिसते डोळ्यात माझ्या 
नसताना तू असते स्मरणात माझ्या 
काळेभोर पाणेरी डोळे, डुंबावे त्याच्यात, 
एक प्रेमगीत तू कविता 
मी तुझ्यात, तू माझ्यात ।। १ ।।
जास्वदींच्या फुलासम मुक्त लाली पसरली 
व्याकुळ ओठांवर न कळत हलकी यावी,
अशी कविता तू प्रीत बनून जावी,
कशाला भेद तुझ्यात माझ्यात ।। २ ।।
सुरेख सुंदर यमकासह जमावी 
तरीही आकृतिबंधात न अडकवता यावी 
दूर कोठेतरी आकाशात भेटून 
न कळत कागदावर उतरावी,
अशी तू कविता माझी बनून रहावी ।। ३ ।। 













तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...