काशिनाथ घाणेकर आणि "आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर...." एकदम कड...क
आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट बघितला. एकदम 'कड...क' चित्रपट झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. काशिनाथ घाणेकरांची नाटकांबद्दल व त्यातील अभिनयाबद्दल असलेली तळमळ बघायला मिळाली. एखादा कलावंत एखाद्या कलाकृतीत किती जीव ओतून काम करतो हे घाणेकरांमुळे कळले. एखाद्या पात्राला आपल्या कलाकृतीतून जीवंत करायचे हे कसब एखाद्या मुरलेल्या कलावंताकडेच असते व ते कसब घाणेकरांकडे होते. रायगडाला जेंव्हा जाग येते मधील संभाजी असो, अश्रूंची झाली फुले मधील लाल्या असो कि गारंबीचा बापू मधील बापू असो त्यांनी प्रत्येक पात्रात आपला जीव ओतला व हि पात्रे रंगभूमीवर जीवंत केली; नव्हे अजरामर केली. प्रेक्षक त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला टाळ्या वाजवून दाद देत होती.
घाणेकर हे मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार ठरले. त्यांच्या प्रत्येक एंट्रीला, प्रत्येक वाक्याला टाळ्या पडायच्या. त्यांचे नाटकांचे प्रत्येक शो हाऊसफुल चालायचे. त्यांचा अश्रूंची झाली फुले मधील लाल्या व एकदम कडक हा डायलॉग ह्या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना इतक्या भावल्या कि या गोष्टीसाठी प्रेक्षक नाटकांसाठी गर्दी करू लागले. त्यांच्या नाटकांचे प्रत्येक शो हाउसफुल जात होते यातूनच त्यांची अभिनय क्षमता किती आहे हे दिसून आले.
घाणेकर यशाच्या शिखरावर होते तेंव्हा त्यांना प्रसिद्धीची, प्रेक्षकांच्या टाळ्यांची नशा चढली होती व हीच नशा त्यांचा घात करून गेली. शेवटी शेवटी प्रेक्षक त्यांना स्वीकारानासे झाले. त्यांच्या भूमिकेला दाद मिळेनाशी झाली तसेच टाळ्यांचा कडकडाट होईनासा झाला त्यामुळे ते नैराश्येच्या गर्तेत लोटले गेले व त्यातच त्यांचा अंत झाला. या चित्रपटात सुबोध भावेंच्या तोंडी एक वाक्य आहे, "प्रेक्षकांची पहिली टाळी हि शेवटची टाळी ठरते."
या चित्रपटात सुबोध भावेंनी डॉ घाणेकरांची भूमिका उत्तम रंगवली. ह्या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला. या चित्रपटात सुबोध भावे घाणेकर म्हणून इतके बेमालूमपणे वावरले कि चित्रपटात भावेंच्या जागी घाणेकरांनाच बघत आहोत कि काय असे वाटत होते. सुबोध भावेंनी जबरदस्त व कड्क अभिनय करून घाणेकरांना परत एकदा जिवंत केले. डॉ. काशिनाथ घाणेकर मराठी रंगभूमीवरील सुपरस्टार ठरले तर या चित्रपटामुळे सुबोध भावे मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार ठरले. ह्या चित्रपटामुळे डॉ. काशिनाथ घाणेकर परत एकदा लोकांसमोर आले.
No comments:
Post a Comment