भाग ३
"ऑपरेशन विजय"
"ऑपरेशन विजय"
भारतीय प्रत्युत्तर -- मागील ब्लॉगवरून पुढे चालू,
भारताने जेव्हा महामार्गालगतच्या महत्वाच्या चौक्यांवर ताबा मिळवला तेव्हा भारतीय सैन्याने घुसखोरांना नियंत्रण रेषेपलीकडे पिटाळायचे धोरण आखले. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई हि या युद्धातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते. अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये मरण पावले. तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलवर उशिरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्वाची लढाई होती. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्न झाले. पाकिस्ताननेही खंदक वगैरे खोदून भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजायला लावले. सरतेशेवटी ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक मृत्युमुखी पडले.
या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्लृप्त्यांचा चांगलाच वापर केला. काही लढायांमध्ये भारतीय सैनिकांनी रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरून हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यानी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला त्यामुळे शत्रुपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमावल्या. बहुतांशी चौक्या या खूप उंचीवर होत्या व काश्मीरमधील हा भाग दगडी व रेताड आहे त्यामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. परंतु रात्रीच्या हालचाली ह्या वेळखाऊ होत्या. तसेच या उंचीवरील अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया ह्या सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या. या भागात सर्व चौक्यांना वेढा देऊन घुसखोरांना रसद पुरवठा तोडून कमी जोखमीचे युद्ध करणे भारताला शक्य होते तसेच पूर्णपणे हवाई हल्ले चढवुन घुसखोरांच्या ताब्यातील चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु यासाठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते. जर तसे केल्यास पूर्ण युद्ध होण्याची शक्यता होती व भारत सरकार यासाठी तयार नव्हते. जर असे झाल्यास या युद्धात मिळालेली आंतरराष्ट्रीय सहानुभूती भारत गमावेल अशी त्यांना भीती होती.
भारताने इ. स. १९९९ सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या.
No comments:
Post a Comment