तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥
आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥
ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥
पुराणासी वाड श्रुति नेणती पार । ते झाले साकार पुंडलीका ॥३॥
तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ॥४॥
ओवी : आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥
अर्थ : जे ब्रह्म आनंदरूप, एकटे, अविनाश, निर्मळस्वरूप आहे व ज्या निजवस्तूचे योगीजन ध्यान करितात, ते विठ्ठलाचे रूप भीमेच्या तीराला समचरण जोडून कटावर कर ठेवून शोभिवंत दिसत आहे, ते तुम्ही पहा.
भावार्थ : तुकाराम महाराजांनी या अभंगात विठ्ठलाचे रूप छान वर्णिले आहे. ब्रह्म म्हणजेच विठ्ठल. तर हे ब्रह्मरूप कसे आहे तर आनंदरूप आहे. विठ्ठल म्हणजेच आनंद. विठ्ठलाचे रूप पाहिल्यावर मन आनंदी होते. मनाला सुख प्राप्त होते. त्याच्याजवळच आनंद ओसंडून वाहत असतो. म्हणूनच ते आनंदरूप आहे. विठ्ठल हा एकटा आहे म्हणजेच त्याच्याजवळ कोणतेही पाश नाहीत. त्याच्याजवळ कोणतीही अभिलाषा नाही. विठ्ठलरूप हे अविनाश आहे म्हणजेच ह्या रुपाला अंत नाही, हे रूप अनंत आहे. हे रूप कधीही नाश पावणार नाही. विठ्ठलरूप निर्मळस्वरूप आहे म्हणजेच या रुपाजवळ मोह, माया, क्रोध, वासना, लोभ, मत्सर हे दुर्गुण फिरकत नाहीत. उलट आनंद, शांती, समाधान, सुख हे सद्गुण ओतप्रोत भरलेले आहेत. हे रूप पाहिल्यावर मन प्रसन्न होते, आनंदी होते, समाधान पावते. म्हणूनच योगीजन व संत-महंत या रूपाचे ध्यान करितात.
हे विठ्ठलाचे रूप भीमेच्या तीराला समचरण जोडून व कटावर कर ठेवून (कंबरेवर हात ठेवून) विटेवर उभे आहे तसेच दोन्ही कानात मकरकुंडले घातली आहेत, डोक्यावर सोन्याचा मुकुट परिधान केला असून गळ्यात वैजयंती माळ घातली आहे तसेच तुळशीमाळा घातल्या आहेत. कपाळी कस्तुरी मळवट भरला आहे. कंबरेला पीतांबर नेसला असून अंगावर भरजरी शेला पांघरला आहे. असा हा शोभिवंत मदनाचा पुतळाच आहे. हे विठ्ठलाचे शोभिवंत, डोळ्यांना सुख देणारे रूप सर्वानी पाहावे असे तुकाराम महाराज सांगत आहेत.
ओवी : पुराणासी वाड श्रुति नेणती पार । ते झाले साकार पुंडलीका ॥३॥ तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात । ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ॥४॥
अर्थ : जे पुराणास कळले नाही व ज्याचे वर्णन वेदश्रुतीस होत नाही ते पुंडलिकरायाकरीता साकार झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या पांडुरंगाचे ध्यान सनकादिक करतात ते आमचे कुळदैवत आहे.
भावार्थ : विठ्ठल हा भक्तवत्सल आहे. त्याचे आपल्या भक्तांवर नितांत प्रेम आहे. आपल्या भक्तांसाठी तो माउलीसमान आहे. आपल्या भक्तांची तो काळजी वाहत असतो तसेच त्यांच्या हाकेला ओ देतो. विठ्ठल व भक्ताचे नाते प्रेमाचे, मायेचे, ममतेचे आहे. या नात्यामुळेच, प्रेमापोटी पुंडलिकाकरीता विठ्ठल सगुण साकार झाला. हे विठ्ठलाचे आनंदमय, अविनाश, निर्मळ असे स्वरूप पुराणासही कळले नाही व वेदश्रुतीतही तो सापडत नाही असे हे स्वरूप भक्तांसाठी धावून येणारे रूप आहे. म्हणूनच या पांडुरंगाचे ध्यान संत-महंत, सनकादिक करतात. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला आपले सर्वस्व मानले आहे. त्यांचे घरातच पहिल्यापासून विठ्ठलाची पूजा केली जायची, पंढरपूरची वारी केली जायची. तुकाराम महाराजही विठ्ठलाची पूजाअर्चा करू लागले, त्याचे नामस्मरण करू लागले. पंढरपूरच्या वारीला जावू लागले. विठ्ठलाची अखंड भक्ती करू लागले. विठ्ठलालाच त्यांनी आपले कुळदैवत मानले. म्हणूनच ते म्हणतात कि, पांडुरंग आमचे कुळदैवत आहे.