Sunday, June 13, 2021

अवीट गोडीचे गाणे -- कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम

 अवीट गोडीचे गाणे -- कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम

          "कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम" हे भक्तीगीत देव पावला या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९५० साली प्रदर्शित झाला. हे गाणे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले असून माणिक वर्मा यांनी गायले आहे. पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गीत सुलोचना यांचेवर चित्रित झालेले आहे. 

          या गीतात देव आणि भक्त यांचे नाते सांगितले आहे. देव आपल्या भाबडया भक्तासाठी काहीही काम करायला तयार असतो. देव फक्त भक्ताची भाबडी भक्ती बघतो. या गीतातसुद्धा राम आपला भाबडा भक्त कबीर याला शेले विणायला मदत करत असतो. कबीराला हे माहीतच नसते. तो आपला रामनामात दंग असतो. कबीर रामनामाचे गीत गात असतो तर इकडे कौसल्येचा राम एकेक धागा गुंतत जातो. शेवटी रघुनंदन सर्व शेला विणून पूर्ण करतो व गुप्त होतो. कबीर जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला दिसते कि सर्व शेला रघुवीरने विणला आहे. कबीर धन्य होतो व रामाला वंदन करतो. 

          हे भक्तीगीत कानांना ऐकायला किती गोड वाटते. हे गाणे ऐकले कि मनात भक्तीभाव जागृत होतो व आपोआप डोळ्यासमोर राम उभा राहतो व रामाला हात जोडले जातात.  ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या ह्या अवीट गोडीच्या गाण्याचे माणिक वर्मा यांनी आपल्या सुरेल आवाजात गावून सोने केले आहे. 

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ
राजा घनश्याम

दास रामनामी रंगे, राम होई दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनश्याम

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
गुप्त होई राम

हळू हळू उघडी डोळे, पाही तो कबीर
विणोनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम  


 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...