Thursday, July 22, 2021

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आज आहे एकादशी ।



तुकाराम महाराज गाथा -- अभंग - आज आहे एकादशी ।

आज आहे एकादशी । चला जाऊ पंढरीसी ।। १ ।।

चंद्रभागे करुनि स्नान । घेऊ देवाचे दर्शन ।। २ ।।

     वाळवंटी झाली दाटी । संत महंत होतील भेटी ।। ३ ।।

तुका म्हणे पंढरपूर । साधु संतांचे माहेर ।। ४ ।।

ओवी : आज आहे एकादशी । चला जाऊ पंढरीसी ।। १ ।। चंद्रभागे करुनि स्नान । घेऊ देवाचे दर्शन ।। २ ।।

अर्थ : आज एकादशी आहे त्यानिमित्ताने पंढरीला जाऊ. चंद्रभागेमध्ये स्नान करून देवाचे दर्शन घेऊ. 

भावार्थ : पंढरपुरात विठ्ठलाचे वास्तव्य आहे. तिथे विठोबा आपल्या भक्तांची वाट बघत विटेवर उभा आहे. कधी एकदा आपल्या भक्तांना डोळे भरून पाहतो असे विठ्ठलाला झाले आहे. तर भक्तांनाही विठ्ठलभेटीची आस लागलेली आहे. म्हणूनच भक्त लांबलांबहून चालत येवून एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. एकादशी हा पवित्र दिवस आहे. जो कोणी या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेईल त्याला विठ्ठल सुखीसमाधानी ठेवतो. त्याच्या अडीअडचणी दूर करतो. म्हणूनच असंख्य भाविक विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात गर्दी करतात. तुकाराम महाराजही एकादशीच्या दिवशी पंढरपुरात जावून विठ्ठलाचे दर्शन घेत होते. विठ्ठलाचे दर्शन झाल्याने त्यांना सुख प्राप्त होत होते. मन समाधानी, आनंदी होत होते. म्हणूनच ते म्हणतात कि, "आज एकादशी आहे त्यानिमित्ताने पंढरीला जाऊ. चंद्रभागेमध्ये स्नान करून देवाचे (विठ्ठलाचे) दर्शन घेऊ."

 ओवी : वाळवंटी झाली दाटी । संत महंत होतील भेटी ।। ३ ।। तुका म्हणे पंढरपूर । साधु संतांचे माहेर ।। ४ ।।

अर्थ : भाविकांची वाळवंटी दाटी झाली आहे. संत महंतांचीही भेट होईल. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूर हे साधु संतांचे माहेर आहे. 

भावार्थ : एकादशीच्या दिवशी असंख्य भाविक पंढरपुरात आले आहेत व त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. हे भाविक विठ्ठलाचे दर्शन मिळाल्याने वाळवंटात आनंदाने नाचत आहेत. तर काही वैष्णव टाळ-मृदूंगाच्या साथीत डोलत आहेत. सर्व वैष्णवांनी वाळवंटात एकच दाटी केली आहे व मुखाने हरीनामाचा गजर करीत आहेत. संपूर्ण वाळवंट हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. प्रत्येक भाविक विठ्ठलमय झाला आहे व प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. वाळवंट वैष्णवांच्या भक्तीरसाने फुलून गेले आहे. 

          या दिवशी संत महंतही विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेले आहेत. त्यांचे येण्याने पंढरपूर नगरी पावन झाली आहे. पंढरपुरात आल्यावर त्यांचीही भेट होईल. त्यांचा सहवास घडल्याने व त्यांचे उपदेशपर बोल ऐकल्याने मनाला समाधान प्राप्त होईल. त्यांच्यात देवाचा अंश असल्याने त्यांची भेट झाली म्हणजेच देवाची भेट झाल्यासारखेच आहे व त्यांची भेट होणे म्हणजे पुण्य कमावण्यासारखेच आहे. म्हणूनच एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन मिळणे व संत महंतांची भेट घडणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "एकादशीच्या दिवशी पंढरपुरात गेल्यावर विठ्ठलाबरोबरच संत महंतांचीही भेट होईल."

         जेव्हा मुलगी सासरहून माहेराला येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तिला तिचे आई-वडील, भाऊ, नातेवाईक भेटणार असतात. तसेच साधुसंतही विठ्ठलाला भेटणार असतात. म्हणूनच त्यांचे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. विठ्ठल त्यांची माउली आहे. माऊली आपल्या मुलांचा सांभाळ करते तसेच विठ्ठलही माऊली बनून साधुसंतांचा सांभाळ करतो. साधुसंतही विठ्ठलापुढे लहान मुलाप्रमाणे हट्ट करतात. मुलीला माहेरी आल्यावर आई-वडील भेटल्यावर जे सुख प्राप्त होते तसे सुख साधुसंतांना पंढरपुरात आल्यावर व विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर प्राप्त होते. साधुसंतांना पंढरपुरात जे सुख अनुभवता येते ते सुख त्यांना कुठेही अनुभवता येत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "पंढरपूर हे साधुसंतांचे माहेर आहे."

                                                                        

























 

 



No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...