तुकाराम महाराज गाथा
तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।।
भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।। १ ।।
शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ।। २ ।।
देवाविण भक्ता । कोण देतां निष्कामता ।। ३ ।।
तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ।। ४ ।।
ओवी : भक्ताविण देवा । कैचे रूप घडे सेवा ।। १ ।। शोभविले येर येरा । सोने एके ठायीं हिरा ।। २ ।।
अर्थ : भक्ताखेरीज देवाला साकारत्व कसे येईल व भक्तावाचून त्याची सेवा तरी कोणी करील ? जसे सोन्याची आंगठी आणि त्यातील हिऱ्याचे कोंदण हि एकमेकांच्या योगाने सुशोभित आहेत, तसे देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहेत.
भावार्थ : या अभंगात तुकाराम महाराजांनी देव आणि भक्ताचे नाते सांगितले आहे. भक्ताने जर देवाची अंतःकरणापासून भक्ती केली, त्याची सेवा केली तरच त्याला देवपण (साकारत्व) येईल, नाहीतर देव म्हणजे नुसता दगड होऊन बसेल. आपण दगडालाही देव मानतो, त्याची पुजाअर्चा करतो म्हणूनच दगडातही देव साकारतो व त्या दगडाचीही सेवा केली जाते. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात कि, भक्ताखेरीज देवाला साकारत्व (देवपण) येणार नाही व भक्तच त्याची सेवा करेल. देव आणि भक्त दोघेही एकच आहे. देवाला भक्ताने केलेली भक्ती, सेवा मनापासून आवडते व भक्ताला देवाची भक्ती करायला, त्याचे नामःस्मरण घ्यायला मनापासून आवडते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा हि संतमंडळी पांडुरंगाचे सतत नामःस्मरण घ्यायचे. त्याच्या भक्तीतच रंगून जायचे. त्यांना सगळीकडे पांडुरंग दिसायचा. त्यांच्या हृदयातच पांडुरंग होता. एवढी त्यांची पांडुरंगावर दृढ श्रद्धा, भक्ती होती. पांडुरंगसुद्धा त्यांना संकटात मदत करायचा. त्यांच्या हाकेला ओ द्यायचा. संत तुकाराम महाराजांनीही पांडुरंगाची भक्ती, सेवा केली. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, देव आणि भक्त हे परस्परांच्या योगाने शोभिवंत आहेत आणि यासाठी त्यांनी सोन्याची आंगठी आणि हिऱ्याचे उदाहरण दिले आहे. जसे सोन्याची आंगठी व त्यात बसविलेला हिरा यामुळे दोघांनाही शोभा येते तसेच देव आणि भक्त हे परस्परांच्या योगामुळे शोभिवंत होतात.
ओवी : देवाविण भक्ता । कोण देतां निष्कामता ।। ३ ।। तुका म्हणे बाळ । माता जैसे स्नेहजाळ ।। ४ ।।
अर्थ : देवाखेरीज भक्ताला निष्कामपद देणारा कोण आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, जसा मुलाचा आणि आईचा परस्पर संबंध आहे. ह्या दृष्टांताचा संबंध ध्रुव पदाशी आहे.
भावार्थ : भक्ताने देवाची अंतःकरणापासून व निस्वार्थभावनेने भक्ती, सेवा केल्यावर देव त्याला अशा ठिकाणी नेवून बसवतो कि तेथे मोह, माया, मत्सर, क्रोध, अहंकार, वासना या अवगुणांना थारा नाही. हे निष्कामपद म्हणजेच निरपेक्ष, निरासक्त, निर्मोही, वासनारहित पद देवाशिवाय भक्ताला कोणी देऊ शकत नाही. देव आणि भक्तात एवढे पवित्र नाते निर्माण झालेले असते कि, देवाला आपल्या भक्ताबाबत वात्सल्य, माया निर्माण झालेली असते. थोडक्यात देव भक्ताची माऊली झालेली असते. भक्त व देव यांचे नाते आई आणि मुलगा या पवित्र नात्यापेक्षाही उच्चं कोटीचे नाते निर्माण झालेले असते व या नात्याचा संबंध ध्रुव पदापर्यंत म्हणजेच अढळ स्थानापर्यंत पोचतो.
No comments:
Post a Comment