Friday, June 11, 2021

क्रिकेटचा कर्नल -- दिलीप वेंगसरकर

 क्रिकेटचा कर्नल -- दिलीप वेंगसरकर 

          ७ जून १९८६ रोजी म्हणजे बरोबर ३५ वर्षांपूर्वी लॉर्डसच्या मैदानावर एक इतिहास घडला तो म्हणजे लागोपाठ तीन शतके ठोकण्याचा विक्रम. हा विक्रम रचणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणजे दिलीप वेंगसरकर. 

          ३५ वर्षांपूर्वीचा काळ कसोटी क्रिकेटचा काळ होता. तेव्हा तंत्रशुद्ध व कलात्मक खेळाला महत्व होतं. जे फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाजी करायचे त्यांना क्रिकेट जगतात आदर दिला जायचा. सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ हे आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने क्रिकेट जगतात मानाचे स्थान पटकावून बसले होते. या यादीत आणखी एका खेळाडूचे नाव घेता येईल ते म्हणजे दिलीप बळवंत वेंगसरकर उर्फ 'कर्नल वेंगसरकर'. मुंबईचा हा उंचपुरा खेळाडू आपल्या कलात्मक व फलंदाजीतील नजाकतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचा. तो फलंदाजीला आला कि प्रेक्षकांना एक बहारदार खेळ पाहायला मिळायचा. त्याच्या खेळीत स्क्वेअर कट, स्ट्रेट ड्राइव्ह, हुक, पूल या सर्व फटक्यांचा समावेश असायचा. स्क्वेअर कटवर तर त्याची हुकूमत असायची. या फटक्याने चेंडू कधी सीमापार व्हायचा ते क्षेत्ररक्षकाला देखील कळायचे नाही. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. दडपणाखाली तर त्याचा खेळ आणखी बहरायचा. मितभाषी, कुठल्याही वादाच्या भोवऱ्यात न अडकणारा व प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. 

          दिलीप वेंगसरकारने ७ जून १९८६ रोजी म्हणजे बरोबर ३५ वर्षांपूर्वी एक इतिहास घडवला तो म्हणजे लॉर्डसवर लागोपाठ तीन शतके ठोकण्याचा विक्रम. या आधीही त्याने १९७९ आणि १९८२ साली शतके ठोकली होती. इंग्लंडमधील लॉर्डसला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते. या मैदानावर शतक ठोकण्याचे प्रत्येक खळाडूंचे स्वप्न असते. बिनीचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग यांना अजूनही हि कामगिरी करता आलेली नाही. परंतु वेंगसरकरने तब्बल तीन वेळा शतक झळकावून हा इतिहास रचला आहे. अशी दैदिप्यमान कामगिरी करणारा पहिला भारतीय व आशियायी खेळाडू म्हणून त्याचा मान आहे. तर जगातील अशी कामगिरी करणारा तो सहावा खेळाडू आहे. याआधी सर जॅक हॉब्स, सर लेन हटन, डेनिस कॉम्प्टन, जॉन एड्रीच आणि जेफ्री बॉयकॉट यांनी लॉर्डसवर तीन शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. हे सर्व महान फलंदाज होते आणि यांच्या पंक्तीत दिलीप वेंगसरकर बसला आहे. यावरूनच त्याची गुणवत्ता सिद्ध होते व या गुणवत्तेमुळेच त्याच्या तीन शतकांचा समावेश विस्डेनच्या यादीत करण्यात आला आहे. 

          त्याच्या या लॉर्ड्सवरील खेळीने सामन्याला महत्व प्राप्त झाले होते. या खेळीत त्याने नाबाद १२६ धावा झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. त्याची हि खेळी संपूर्ण तंत्रशुद्ध व कलात्मक होती. या त्याच्या खेळीमुळेच त्याला कर्नल हि पदवी देण्यात आली व त्याचा गौरव केला गेला. त्याची हि खेळी पाहणारे खरोखरच भाग्यवान होते. 














 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...